यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा ः तांबे
यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा ः तांबे
अधिकारी, पदाधिकारी व गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांची संयुक्त बैठक
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना हे मानवजातीवरील मोठे संकट असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. आगामी काळात येऊ घातलेला गणेशोत्सव सर्वांनी घरगुती व साध्या पद्धतीने साजरा करावा, गर्दी करु नये असे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.

संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व विविध गणेश मंडळ यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षिका दीपाली काळे, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, अभय परमार, पप्पू कादरी, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांसह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, कोरोना हे संपूर्ण जगावरील संकट आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करीत आहे. परंतु प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. गर्दी टाळणे, समारंभ टाळणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे हा कोरोना रोखण्यासाठीचा चांगला उपाय आहे. आगामी काळामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र कोरोनाच्या संकटकाळात सर्वांनी अत्यंत साधेपणाने व घरगुती गणेश पूजन करावे. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळांनी गणेश स्थापना करताना प्रशासनाची परवानगी घ्यावी. अगदी छोटा मंडप टाकावा, मंडपामध्ये दररोज निर्जंतुकीकरण करावे, मंडपामध्ये येणार्या प्रत्येकाच्या शारीरिक तापमानाची तपासणी करावी, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा. याचबरोबर गणेशोत्सव काळामध्ये कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम व गर्दी होणारे कार्यक्रम करू नये. तसेच महाप्रसाद, कीर्तन यांचेही आयोजन करू नये. गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. प्रत्येक नागरिकाने व गणेश मंडळाने गणेशाचे विसर्जन हे आपल्या जवळ असलेल्या संकलन केंद्रावर करावे. या काळामध्ये ध्वनी प्रदर्शन करू नये, गुलालाची उधळण करू नये, आरोग्याची काळजी घ्यावी, लहान मूल, वयोवृद्ध नागरिक यांचीही काळजी घ्यावी. त्याप्रमाणे गणेश पूजनातील निर्माल्य एका ठिकाणी जमा करावे. स्वच्छतेचे पालन करावे भपकेबाज व मोठे आरस करण्यापेक्षा आरोग्य प्रबोधन विषयक आरस करावे. ज्याठिकाणी रुग्ण आढळलेला असेल अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येते तेथे सर्वांनी नियमांचे पालन करावे.

