नेवासा व श्रीरामपूर येथील पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षात!
नेवासा व श्रीरामपूर येथील पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षात!
भारतीय पोलीस सेवेतील दोघा अधिकार्यांकडे पुढील तीन महिने असणार पदभार
नायक वृत्तसेवा, नेवासा
जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचे आणि गुन्हेगारांचे प्रमुख केंद्र म्हणून कुपरिचित असलेल्या नेवासा आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भारतीय पोलीस सेवेतील दोघा परिविक्षाधीन अधिकार्यांना प्रशिक्षण कालावधी म्हणून तीन महिन्यांचा स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे. या कालावधीत या दोन्ही अधिकार्यांकडून तेथील गुन्हेगारीचा बिमोड होणे अपेक्षित असल्याने या दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
गुन्हेगार आणि गुन्हेगारी यासाठी नेवासा फाटा आणि श्रीरामपूर पोलीस ठाणी जिल्ह्यात नेहमीच चर्चेत राहिली आहेत. काही वर्षांपूर्वी गुन्हेगारांच्या टोळ्या आणि जिल्ह्यातील बेकायदा गावठी कट्टे यामुळे प्रकाशझोतात आलेले नेवासा आणि अलिकडच्या काळात जिल्ह्यातील गुटखा तस्करी विरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांनी केलेली कारवाई, आणि नंतर जिल्ह्यातील ठोक व्यापार्यांची चौकशी आणि त्यात निर्माण झालेले संशयाचे वलय यामुळे तेथील पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट चर्चेत आले होते.
गुटखा प्रकरणावरुन पो.नि.बहिरट यांची बदली हमखास मानली जात होती. त्यातही जिल्ह्यातील पुढील कार्यकाळ त्यांना नियंत्रण कक्षातच घालवावा लागेल असे सांगत अनेकांनी पैंजाही लावल्या होत्या. त्या आता सत्यात उतरल्या असून भारतीय पोलीस सेवेतील अधिकार्यांच्या निमित्ताने अखेर वादग्रस्त ठरलेल्या श्रीरामपूरच्या पोलीस निरीक्षकांना बुधवारी (ता.28) नियंत्रण कक्षात हजर होण्याचे फर्मान जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी काढले आहे.
भारतीय पोलीस सेवेत निवड झालेले व शारीरिक प्रशिक्षण करुन प्रत्यक्ष पदभार घेण्यासाठी सज्ज असलेले अभिनव त्यागी व आयुष नोपाणी हे दोन परिविक्षाधीन तरुण पोलीस अधिकारी पुढील तीन महिन्यांसाठी जिल्ह्याच्या आस्थापनेवर हजर झाले आहेत. पोलीस अधीक्षक पाटील यांनी त्यागी यांना नेवासा पोलीस ठाण्याचा तर नोपाणी यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. 26 ऑक्टोबर ते 20 जानेवारी या कालावधीतच हे दोन्ही अधिकारी त्या-त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेणार आहेत.
भारतीय प्रशासन सेवेतील काही अधिकारी गेल्या कालखंडात जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी आले होते. त्यातीलच एक असलेल्या प्राजित नायर यांनी संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार स्वीकारला होता. आपल्या प्रशिक्षण कालावधीत त्यांनी धडाकेबाज कारवाई करीत संगमनेर अतिक्रमण मुक्त करण्याच्या दृष्टीने मोठी कारवाई केली होती. कोणताही दबाव नाकारणार्या या अधिकार्यांकडून अशाच धडक कारवाईची अपेक्षा असल्याने आता नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात मुख्यालयानंतर सर्वाधिक प्रगतशील तालुका म्हणून संगमनेरचा उल्लेख केला जातो. येथील लोकसंख्या, उद्योग व व्यापार उदीम यामुळे संगमनेर तालुक्यात समृद्धी खळाळते. साहजिकच जेथे समृद्धी तेथे गुन्हेगारी आढळणारच. मात्र गेल्या काही वर्षांत येथील गुन्हेगारी प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली असून अंमली पदार्थ्यांच्या तस्करीत अनेक नवीन चेहरे उतरले आहेत. त्यामुळे संगमनेरातील गुन्हेगारांमध्येही मोठी वाढ झाली असून अशाच एखाद्या प्रशिक्षणार्थी धडाकेबाज अधिकार्याची संगमनेरातही नियुक्ती व्हावी व त्यांच्याकडून येथील गुन्हेगारीचे निर्दालन व्हावे अशी अपेक्षा संगमनेरकरांना आहे.