छत्रपतींच्या स्मारकाबाबत काँग्रेस शहराध्यक्षांचा खोटारडेपणा! जावेद जहागिरदार यांची टीका; आमदार सत्यजीत तांबे यांनीच उघडे पाडल्याचाही घणाघात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारो संगमनेरकरांच्या अस्मितेचा मुद्दा असलेल्या संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी शहर भाजपाने पालिकेची सत्ता दिल्यास छत्रपतींना साजेशे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना शहर काँग्रेसने शिवरायांची अश्वारुढ प्रतिमा असलेले स्मारक उभारण्याचा ठराव पालिकेत झाल्याचे सांगत भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन तापलेले राजकारण थंड होत असतांनाच आता आमदार सत्यजीत तांबे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सरकारचे नियम आणि स्मारकांबाबतचे धोरण लक्षात घेता अश्वारुढ प्रतिमा उभारणे अशक्य असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा धागा धरुन शहर भाजपाचे सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी काँग्रेसवर टीका केली असून भाजपाच्या प्रस्तावावर शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी जनतेची दिशाभूल करीत खोटे वक्तव्य केल्याचे म्हंटले आहे. काँग्रेसचा हा खोटारडेपणा आमदार सत्यजीत तांबे यांनीच उघडा पाडल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे संगमनेरात एकमेव अर्धाकृती प्रतिमा असलेले स्मारक आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील शिवप्रेमींकडून बसस्थानक परिसरात शिवरायांची अश्वारुढ प्रतिमा उभारण्याची मागणीही होत आहे. त्यातच जुन्या स्मारकाच्या मागील बाजूस असलेल्या जागा मालकाने बांधकाम सुरु केल्याने शिवप्रेमींनी त्याला विरोध करीत शिवस्मारकासाठी किमान 20 फूट जागा सोडण्याची मागणी केली होती. संगमनेर नगरपालिकेनेही जनभावना लक्षात घेत सदरील बांधकाम बंद पाडले होते. काही महिने हा वाद पेटता राहिल्यानंतर संबंधित जागा मालकाने स्मारकासाठी आणखी पाच फूट जागा सोडून आपले बांधकाम उरकले.

या दरम्यान शहर भाजपाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे संगमनेरकरांनी पालिकेत भाजपाला एकहाती सत्ता दिल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला साजेशे एक एकर जागेत स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. तीन दशकांपासून पालिकेत एकहाती सत्ता असतानाही काँग्रेसला जे जमले नाही, ते भाजपा करुन दाखविल असा दावाही त्यावेळी करण्यात आला होता. त्यावरुन संगमनेरचे राजकारण तापलेले असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करुन भाजपाच्या आश्वासनाला उत्तर देताना पालिकेने एक एकराच्या जागेत अश्वारुढ प्रतिमेसह भव्य स्मारक उभारण्याचा ठराव यापूर्वीच केल्याचे सांगितले होते. त्यावेळी भाजपाने सदरची जागा कोठे आहे? असा सवाल उपस्थित केल्याने संगमनेरातील वातावरण ढवळून निघाले होते.

त्याची राळ खाली बसत असतानाच विधान परिषदेचे नूतन सदस्य, आमदार सत्यजीत तांबे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज्यात कोठेही छत्रपती शिवरायांची पूर्णाकृती अथवा अश्वारुढ प्रतिमा उभारण्याबाबत शासनाचे कठोर धोरण असल्याने त्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे सांगत सध्या आहे त्याच ठिकाणी आकर्षक स्मारक उभारणार असल्याचे सांगितले. त्यांचा हाच मुद्दा पकडून शहर भाजपाने पुन्हा एकदा शिवस्मारकाचा मुद्दा तापवण्यास सुरुवात केली असून यापूर्वी त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एक एकरच्या परिसरात शिवरायांची अश्वारुढ प्रतिमा आणि संग्रहालय उभारण्याच्या वक्तव्याचा पुनःरुच्चार केला आहे.

सध्या केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. आगामी कालावधीत संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत संगमनेरकरांनी भाजपाच्या हाती सत्ता दिल्यास सहा महिन्यांच्या आत आपण दिलेला शब्द पूर्ण करण्याची ग्वाही भाजपाचे शहर सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी दिली आहे. स्मारकांबाबत शासनाचे नियम आम्हाला माहिती असून जी गोष्ट काँग्रेसला तीस वर्षांच्या राजवटीत जमली नाही, ती आम्ही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर करुन दाखवू असा विश्वासही जहागिरदार यांनी व्यक्त केला आहे.

त्यासोबतच आमदार तांबे यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी संगमनेरकरांची दिशाभूल केल्याचा व ते खोटे बोलल्याचा आरोप करताना त्यांचा हा खोटारडेपणा त्यांच्याच नेतृत्त्वाने उघडा पाडल्याचा घणाघातही जहागिरदार यांनी केला आहे. तांबेंच्या या वक्तव्याने भाजपाने त्यावेळी मांडलेली भूमिका योग्य होती यावरही शिक्कामोर्तब झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमदार तांबे यांच्या ‘या’ वक्तव्याने शिवस्मारकाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा मिळाली असून भाजपाकडून हा मुद्दा तापवला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

