साईबाबा संस्थानच्या ‘सीईओं’ची जाहीर माफी! वादग्रस्त वक्तव्याने साईभक्तांचा संताप; माफीनाम्यानंतर वातावरण निवळले

नायक वृत्तसेवा, शिर्डी
जागतिक श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांविषयी एका खासगी कार्यक्रमात केलेले वक्तव्य अंगलट आल्यानंतर साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पदभार स्वीकारल्यापासून घडलेल्या काही घडामोडींमुळे त्या चर्चेत असतानाच गेल्या बुधवारी त्यांनी मुंबईतील एका खासगी कार्यक्रमात साईबाबा एका विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख करीत बाबांच्या सर्व धर्म समभाव या तत्त्वालाच हरताळ फासला होता. त्यांच्या याच वक्तव्यावरुन शिर्डीच्या ग्रामस्थांसह जगभरातील साईभक्तांचा संताप झाला. शिर्डी ग्रामस्थांनी तर या वक्तव्याचा निषेध म्हणून व्यवहार बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र संस्थानचे नूतन अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्यानंतर बानाईत यांनी ‘आपण केलेले ‘ते’ वक्तव्य चुकीच्या माहितीच्या आधारे केले, त्यामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो’ असे सांगत माफी मागितल्याने या वादावर आता पडदा पडल्याचे बोलले जात आहे.

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी गेल्या बुधवारी (8 डिसेंबर) मुंबईत एका वृत्तपत्राच्या खासगी कार्यक्रमात बोलताना साई बाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. बाबांच्या जीवनाविषयी माहिती देतांना त्यांनी साईबाबा एका विशिष्ट धर्माचे (मुस्लीम) होते असाही उल्लेख केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन शिर्डीच्या ग्रामस्थांसह जगभरातील बाबांच्या कोट्यावधी भक्तांचा संताप झाला. बानाईत यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे व साईभक्तांची माफी मागावी अशीही मागणी त्यातून पुढे आली. त्यातच त्यांनी ‘त्या’ कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ समाजिक माध्यमात व्हायरल झाल्याने शिर्डीच्या ग्रामस्थांसह साईभक्त आक्रमक झाले होते. याबाबत शिर्डीकरांनी साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे नूतन अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे यांची भेट घेवून संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करुन जगभरातील साईभक्तांच्या आणि शिर्डीकरांच्या भावना दुखावल्याचे त्यांना सांगितले. बानाईत यांनी या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही शिर्डीतील व्यवहार बंद ठेवू असा इशाराही दिला होता.

अध्यक्ष काळे यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांना याबाबत खुलासा करण्याची सूचना त्यांनी केली. त्यावर बानाईत यांनी ‘आपणास काही लोकांकडून चुकीची माहिती देण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारावरच आपल्याकडून अनावधानाने ‘ते’ वक्तव्य केले गेले. मात्र त्यातून साईभक्तांच्या आणि शिर्डीकरांच्या भावना दुखावल्या गेल्याने आपण दिलगिरी व्यक्त करीत आहोत’ असे जाहीर प्रतिक्रीया त्यांनी दिली. या माफीनाम्यासोबतच आपणास चुकीची माहिती देणार्यांवरही चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. त्यामुळे शिर्डीकरांनी जाहीर केलेला बंद मागे घेतला असून या वादावर एकप्रकारे पडदा पडला आहे.
![]()
यापूर्वीच्या कालावधीतही काही जणांनी साईबाबांविषयी जाणीवपूर्वक विधाने करुन साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, मात्र प्रत्येकवेळी शिर्डीच्या ग्रामस्थांनी त्याला कडाडून विरोधही केला आहे. या प्रकरणात तर खुद्द साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनीच वादग्रस्त वक्तव्य केले. मात्र शिर्डीकर ग्रामस्थ आणि साईबाबांच्या असंख्य भक्तांनी त्याला कडाडून विरोध करीत त्यांना या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडले आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांविषयी सार्वजनिक मंचावर भाष्य करताना जबाबदार व्यक्तींकडून अशाप्रकारचे वादग्रस्त वक्तव्य होवू नये अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
