चार वर्षानंतर नगरपालिका निवडणुकांचा ‘शंखनाद’! शासनाकडून कालबद्ध कार्यक्रम जाहीर; संगमनेरात द्विसदस्यीय पंधरा प्रभाग..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांच्या वाटेतील अडसर बाजूला सारुन कालबद्ध मर्यादेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा करताच निवडणूकपूर्व तयारीला वेग आला आहे. शासनाने राज्यातील बहुतेक सर्व महापालिका, नगरपालिका आणि मुदत संपलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभागरचना करण्याच्या सूचना प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या 48 तासांतच राज्यातील महापालिकांपासून नगरपंचायतींपर्यंतच्या प्रभागरचनेचे कालबद्ध वेळापत्रक जाहीर करीत निवडणुकांचा ‘शंखनाद’ केला आहे. त्यानुसार बुधवारपासून प्रगणक गटाची मांडणीही सुरु झाली असून 22 ऑगस्टरोजी अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध होईल. यावेळी संगमनेर नगरपालिकेच्या पूर्वीच्या प्रभागरचनेत फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्येतही वाढ केल्याने यावेळी शहरातील 15 प्रभागांमधून 30 सदस्य निवडावे लागणार असून नगराध्यक्षांची निवड मात्र जनतेतून होणार आहे.

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य करताना चार आठवड्यात निवडणुकांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासह चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनेची जबाबदारी असलेल्या राज्य शासनाने मंगळवारी (ता.10) राज्यातील 29 महानगरपालिका, 248 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक आदेश काढले असतानाच अवघ्या 48 तासांतच आज (ता.12) शासनाच्या नगरविकास विभागाने सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून पुढील दोन महिने विधानसभेच्या मतदारयाद्यांचे विभाजन करुन प्रभागरचनेचा कार्यक्रम सुरु राहणार आहे.

नगरविकास विभागाच्या आदेशानुसार बुधवारपासून (ता.11) सोमवारपर्यंत (ता.16) मुख्याधिकारी प्रगणक गटांची मांडणी करतील. प्रारुप प्रभागरचनेच्या अनुषंगाने 17 व 18 जूनरोजी जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, 19 ते 23 जूनपर्यंत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणे, 24 ते 26 जून दरम्यान गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, 27 ते 30 जूनपर्यंत नकाशावर दर्शवल्याप्रमाणे प्रभागाच्या हद्दि जागेवर जावून तपासणे, 4 ते 8 जुलै या दरम्यान प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला पाठवणे. 15 ते 21 जुलै या कालावधीत प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध करुन त्यावर हरकती मागवणे, 22 ते 31 जुलै पर्यंत जिल्हाधिकार्यांनी त्यावर सुनावणी घेणे, 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेवून अंतिम केलेली प्रारुप प्रभागरचना निवडणूक आयोगाला सादर करणे. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली अंतिम प्रभागरचना अधिसूचनेद्वारा प्रसिद्ध करणे या प्रकारे हा दोन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

यावेळच्या नगरपालिका निवडणुकीत राज्य शासनाने 25 जानेवारी 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बहुसदस्यीय नव्हेतर द्विसदस्यीय रचनेनुसारच प्रभागांची निर्मिती होणार आहे. याच तारखेच्या अन्य एका अध्यादेशानुसार ‘ब’ वर्ग नगरपालिकांची किमान सदस्यसंख्या 25 असेल आणि 40 हजारपेक्षा अधिक लोकसंख्येवरील प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक सदस्याची वाढ होईल. त्यानुसार संगमनेर नगरपालिका हद्दिची 2011 सालनुसार लोकसंख्या 65 हजारांपेक्षा अधिक असल्याने पालिकेच्या नगरसेवकांमध्ये 40 हजारांवरील प्रत्येक पाच हजारांमागे एक याप्रमाणे पाच सदस्य वाढून सभागृहात निवडून जाणार्या एकूण सदस्यांची संख्या 30 होणार आहे. त्यासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघ फोडून त्यातून 15 प्रभाग निर्माण केले जाणार असून प्रभागातील सदस्यसंख्या कायम असली तरीही नगराध्यक्षांची निवड मात्र थेट जनतेतूनच होणार आहे.

डिसेंबर 2021 मध्ये संगमनेर नगरपालिकेची मुदत संपली. तेव्हापासून पालिकेवर प्रशासकांचे राज्य आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर येणार्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असून कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे. राज्य शासनाने प्रभागरचना अंतिम करण्याचे काम हाती घेतल्याने राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

