मेंढपाळाच्या पालावर सशस्र दरोडा! मारहाणीत चौघे जखमी; दागिन्यांसह रोकड पळवली

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर 
नगर तालुक्यातील विळद शिवारात असलेल्या नारुंडी तलावाजवळील मेंढपाळाच्या पालावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ७ ते ८ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत चौघांना बेदम मारहाण केली. तसेच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडेखोरांच्या मारहाणीत लक्ष्मण विठ्ठल सूळ, प्रकाश लक्ष्मण सूळ, सुमन लक्ष्मण सूळ आणि शीतल पोपट होडगर हे जखमी झाले असून, त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी पोपट बन्सी होडगर  यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, फिर्यादी होडगर व त्यांचे मेव्हणे लक्ष्मण सूळ हे विळद जवळील पिंप्री घुमट येथील रहिवासी असून ते मेंढपाळ आहेत. त्यांचा मेंढ्यांचा तळ विळद शिवारातील नारुंडी तलावाजवळ होता. फिर्यादी व इतर सर्वजण सोमवार दि. ९ जून रोजी रात्री जेवण करून मेंढ्यांच्या तळावर पालात झोपलेले होते. मंगळवार दि.१० जून रोजी मध्यरात्री १.२० च्या सुमारास काळे कपडे घातलेले ७ ते ८ अनोळखी दरोडेखोर हातात काठ्या व चाकू घेवून त्यांच्या तळावर आले. त्यांनी फिर्यादीला काठीने मारले असता त्यांनी त्यांच्या कडील कांबळ एका दरोडेखोराच्या अंगावर फेकून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांनी त्यांना पकडले व एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीची पत्नी जागी झाली व मदतीसाठी आरडा ओरडा करू लागली असता त्यांनाही दरोडेखोरांनी काठीने मारहाण करत चाकू दाखवून धमकी दिली. त्यानंतर तुमच्या जवळील पैसे व दागिने काढून द्या नाहीतर एकालाही जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत फिर्यादीची पत्नी शीतल होडगर, मेव्हणा लक्ष्मण सूळ, प्रकाश सूळ, सुमन सूळ यांना काठीने बेदम मारहाण करत चाकूने वार केले. तसेच त्यांच्या कडील ७० हजारांची रोकड, सुमारे पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने असा १ लाख ५१ हजारांचा ऐवज घेवून तेथून पोबारा केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी  करीत आहेत.
Visits: 139 Today: 3 Total: 1106379

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *