हुंड्यासाठी आणखी एका निष्पाप विवाहितेचा बळी! विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्यावरुन चौघांवर संगमनेरात गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हुंड्याच्या लालसेने विवाहितांची छळवणूक आणि त्यांच्या आत्महत्याच्या वार्ता संगमनेरकरांसाठी नित्याच्याच झाल्या असून सोमवारी सकाळी आणखी एका 23 वर्षीय विवाहितेने आपली जीवनयात्रा संपविली. पितृछत्र हरपलेल्या नुरेन नकीर सय्यद या तरुणीचे दोन वर्षांपूर्वीच रियाज नवाब इनामदार याच्याशी लग्न झाले होते. मात्र सासरच्या मंडळींनी सुरुवातीला फर्निचर आणि नंतर कार घेण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. मात्र सासरच्या मंडळींची लालसा पूर्ण करण्यास तिची आई असमर्थ असल्याने अखेर तिने सोमवारी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मयत विवाहितेच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिचा नवरा, सासू, मावस सासू व तिचा जावई अशा चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईदगाह मैदानाजवळील परिसरात राहणार्‍या नुरेन नकीर सय्यद या तरुणीचा दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये कोल्हेवाडी रोडवर राहणार्‍या रियाज नवाब इनामदार याच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह करण्यात आला. नवरा मुलगा मर्चन्ट नेव्हीमध्ये सेवेस असल्याने पितृछत्र हरपलेल्या नुरेनच्या आईने लग्न सोहळ्यात कोठेही कमतरता भासू दिली नाही. लग्नानंतर नवविवाहिता नुरेन, नवरा रियाज व सासू राशद नवाब इनामदार एकत्रितपणे राहू लागले. या दरम्यान अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे राहणारी राशदाची बहीण मुमताज पठाण आणि तिचा जावई इब्राहिम उर्फ बालम शेख हा देखील वारंवार त्यांच्या घरी येत व त्यांच्या सगळ्याच कौंटुंबिक निर्णयात सहभागी होत असत. विशेष म्हणजे सदरचे लग्न जमविण्यात बालम शेख याची महत्त्वाची भूमिका होता.

लग्न होवून अवघे तीनच महिने झालेले असतांना नुरेनची सासू राशद लग्नात फर्निचरच दिले नसल्याचे सांगत वारंवार तिला शारीरिक व मानसिक त्रास देवू लागली. त्यांच्या घरी नेहमीच वास्त्व्याला येणारी तिची बहिण मुमताज असे करण्यासाठी राशदला प्रोत्साहन देत ‘तु सुनेला लई लाडात घेवू नकोस, तिला चपलेजवळच ठेव, नाहीतर ती डोक्यावर बसेल’ वगैरे टोचूनही बोलत असे. यासर्व गोष्टी नुरेश मुकाटपणे सहन करीत आणि गुपचूप आपल्या आईला सांगत. याची कुणकूण लागल्यावर राशद व मुमताज यांनी नुरेनला मोबाईल वापरण्यास मनाई केली आणि तिची आई व तिच्या दोन बहिणांनाही ‘आमच्या घरी येवू नये’ असा सज्जड इशारा दिला. आपल्या मुलीचा सासरी छळ होतोय या विचाराने भांबावलेल्या अलमास नकीर सय्यद या माऊलीने याबाबत आपले दीर जमील सय्यद व रकीब सय्यद यांच्यासह जावा आरिफा, तबस्सूम व रेश्मा यांना सांगून मुलीच्या सासरच्या मंडळींची समजूतही काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

दोन वर्षांपूर्वी तर तिचा नवरा, सासू व मावस सासू यांनी ‘तुझे मामा तर चारचाकी वाहनांमध्ये फिरतात, मग आम्हालाही एक कार घ्यायला तुझ्या आईकडून पैसे घेवून ये’ असे म्हणत अधिक त्रास देवू लागले. त्यावेळी ती गर्भवती असूनही तिला मारहाण व शिवीगाळ केली जात असल्याने अखेर ती त्या अवस्थेत आपल्या आईकडे आली. त्यानंतर तिला मुलगी झाल्यानंतर दोन महिन्यांनी ती पुन्हा नांदायला सासरी गेली. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा पहिल्यासारखाच त्रास होवू लागल्याने 20 डिसेंबर 2020 रोजी नुरेन आपल्या तान्ह्यामुलीला सोबत घेवून रडतरडत पायी चालतच आपल्या माहेरी आली. या उपरांतही अलमास सय्यद यांनी आपले दीर जमील व दिलमिल यांना मुलीच्या सासरी पाठवून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र उपयोग झाला नाही. या महिन्यात 7 मार्च रोजी मुलीचा नवरा, सासू व बालम शेख हे तिघेही अलमासच्या घरी आले व त्यांनी आम्ही नुरेनला चांगले वागवू असे म्हणत तिला सासरी नेले. त्यानंतर 21 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रियाज इनामदार याने अलमास सय्यद यांना फोन करुन ‘तुमच्या मुलीला घेवून जा, तिला आम्ही नांदवणार नाही, नाहीतर आम्ही तिला मारुन टाकू’ असे तो म्हणू यावेळी नुरेन मोठ्याने रडत असल्याचा आवाजही येत होता. त्यामुळे आपल्या मुलीच्या काळजीपोटी त्या माऊलीने रात्री दहा वाजता आपल्या दोन्ही मुलींना दुचाकीवरुन नुरेनच्या घरी पाठविले, तेव्हा त्यांच्यासमोरही रियाजने नुरेनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दुसर्‍या दिवशी (ता.22) सकाळी रियाज इनामदारने अलमास यांना पुन्हा फोन करुन ‘तुम्ही ताबडतोब घरी या..’ असे सांगितल्याने घाबरलेल्या अलमास आपला मुलगा विराद याच्यासह रयाजच्या घरी गेले. तेव्हा नुरेनची सासू एकटीत घरात बसलेली होती. तिच्याकडे नुरेनबाबत विचारणा केली असता तिने घरात फाशी लावून घेतली असून तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगीतले. ते ऐकूण धक्का बसलेल्या अलमास तशाच रुग्णालयात धावल्या तेव्हा आपली मुलगी नुरेन मयत झाली असून तिचे शव विच्छेदनासाठी कॉटेजमध्ये पाठविल्याचे त्यांना समजले.

गेल्या दोन वर्षात नुरेनचा तिच्या सासरच्या मंडळींनी केलेला छळ, त्यातून वारंवार तिला झालेली मारहाण यामुळेच आपल्या मुलीने आत्महत्या केली असल्याचे सांगत मयत नुरेनची आई अलमास सय्यद यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत वरीलप्रमाणे फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रियाज नवाब इनामदार (नवरा), राशद नवाब इनामदार (सासू), मुमताज पठाण (मावस सासू, रा.समशेरपूर) व इब्राहिम उर्फ बालम शेख (जावई, रा. मालदाड रोड) यांच्यावर नुरेन इनामदार हिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात विवाहितांच्या आत्महत्येची एकामागून एक प्रकरणे समोर आली आहेत. आजच्या आधुनिक युगातही हुंड्यासाठी निष्पाप मुलींचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने समाजातील काही घटकांची मानसिकता झिंग आणणारी ठरत आहे. मयत नुरेन इनामदार ही बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिकलेली सुस्वभावी मुलगी होती. वडिलांच्या निधनानंतरही तिने आपल्या आईसोबत राहून जिद्दीने नियतीचा सामना केला, मात्र सासरच्या छळापुढे तिला झुकावं लागलं आणि एका हुशार मुलीचा असा अंत झाला. तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांना तत्काळ अटक करावी अशी सतंप्त प्रतिक्रीयाही आता समाजातून समोर येत आहे.

Visits: 143 Today: 2 Total: 1105610

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *