बनावट ॲप घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिंगणापुरात धरणे

नायक वृत्तसेवा, नेवासा
शनिशिंगणापूर मधील बनावट ॲप घोटाळ्याची तातडीने चौकशी करून कारवाई व्हावी, यासाठी काँग्रेस व विविध संघटनांकडून शिंगणापूर देवस्थान आवारात धरणे आंदोलन करण्यात आले.

शनीशिंगणापूरमध्ये काही कर्मचाऱ्यांनी, पुजाऱ्यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲपच्या ऐवजी बनावट ॲप तयार करून ऑनलाईन पूजेच्या माध्यमातून तसेच बनावट देणगी पावती व बनावट क्यू आर कोडच्या माध्यमातून करोडो रुपयांचा घोटाळा करून हा निधी आपल्या खाजगी खात्यावर वळवून घेतला. यात देवस्थानची व देशभरातील शनिभक्तांची मोठी लूट या घोटाळा बहाद्दरांनी केली. याविरोधात काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक व धर्मदाय उपायुक्त यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली.तर देवस्थान प्रशासनाकडे त्यांनी परवानगी दिलेल्या ॲपबद्दल माहिती मागण्यात आली होती.

यामध्ये धर्मदाय आयुक्त यांचे परवानगी पत्र, ट्रस्टचा ठराव, करारनामा अशी माहिती मागण्यात आली होती. देवस्थान प्रशासनाने हि माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने व घोटाळे बहाद्दरांना पाठीशी घातल्याने इतर ॲपची माहिती दाबण्याचा प्रयत्न केल्याने सोमवारी देवस्थान आवारात काँग्रेस व विविध संघटनाकडून भर उन्हामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी या घोटाळ्याचा तीव्र गतीने तपास करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी देवस्थान प्रशासनाने फक्त तीन ॲपवर कारवाईची मागणी करून इतर ॲपवाल्याना व बनावट पावती पुस्तकं घोटाळे बहाद्दरांना पाठीशी घालणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत पूर्ण कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे स्पष्ट केले. शेतकरी संघटनेचे अशोक काळे यांनी या घोटाळ्यात देवस्थानचे कर्मचारी, पुजारी, अधिकारी सहभागी असल्याचा आरोप करत भाविकांच्या श्रद्धेला गंडा घातल्याचा आरोप केला. हरीश चक्रनारायण यांनी देवस्थान आता सरकार जमा करण्याची वेळ आली असून प्रशासकाची याठिकाणी गरज आहे.

त्याशिवाय भ्रष्टाचार दूर होऊन कारभार सुरळीत होणार नाही. तसेच यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल,महिला अध्यक्षा शोभा पातारे, स्वाभिमानी संघांचे गणपत मोरे,बहुजन वंचितचे विजयसिहं गायकवाड, संजय वाघमारे यांनी देखील या विरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनात संजय होडगर, कानिफ जगताप, सुमित पटारे, संदीप मोटे, सतीश तऱ्हाळ, गोरक्षनाथ काळे, आदीसह शनिभक्त सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना निवेदन देण्यात आले.यात पुढील आठ दिवसात योग्य तपास न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Visits: 90 Today: 2 Total: 1100677
