डॉक्टर सुधीर तांबे यांचे काँग्रेस मधून निलंबन! ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा निर्णय; चौकशी होईपर्यंत पक्ष कार्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 12 जानेवारी रोजी नाशिक पदवीधर मतदार संघात घडलेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाचक्की झालेल्या काँग्रेसने कारवाईचे पहिले पाऊल उचलले आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होवूनही उमेदवारी दाखल न केल्याने शिस्तभंगाचा ठपका ठेवून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने डॉ. सुधीर तांबे यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईनंतर डॉक्टर तांबे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नसून निलंबित करुन काँग्रेसने एकप्रकारे तांबे कुटुंबाशी राजकीय संबंध खंडीत केले आहेत. यानंतर तांबे पिता-पुत्र कोणता राजकीय निर्णय घेतात याकडे संपूर्ण नाशिक पदवीधर मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

येत्या 30 जानेवारी रोजी नाशिक पदवीधर मतदार संघातील सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात उमेदवारीवरुन मात्र शेवटच्या क्षणापर्यंत विविध राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात दोन वेळा सार्वजनिक मंचावरून डॉक्टर सुधीर तांबे यांचे सुपुत्र व काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांचे कौतुक केले होते. तेव्हापासूनच त्यांच्या फडणवीसांशी जवळीकीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्याचे प्रतिबिंब भाजपकडून तीन नावांची चर्चा होवूनही पक्षाने अधिकृतपणे कोणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. तर काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नावाची अधिकृत घोषणा उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली.

अर्ज भरण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना डॉक्टर सुधीर तांबे आपले सुपुत्र सत्यजित व स्नुषा मैथिली तांबे यांच्यासह अर्ज दाखल करण्यासाठी हजर झाले. अर्ज दाखल करून ते परत येईपर्यंत बाहेर अडखळून पडलेल्या माध्यमांना आत काय घडत आहे याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. काही वेळानंतर तांबे पिता-पुत्र उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर करूनही डॉक्टर सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल केली नसल्याचे व त्या बदल्यात त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी पक्षाकडून व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केल्याचे माध्यमांसमोर सांगितले. त्यांच्या या निर्णयाने राज्यात एकच खळबळ उडाली. या संपूर्ण घडामोडी नंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हा पक्षाचा विश्वासघात असल्याचे सांगून एक प्रकारे सत्यजित तांबे यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यास नकार दर्शविला. त्याचबरोबर या संपूर्ण घडामोडीं बाबत केंद्रीय समितीला सविस्तर माहिती दिल्याचेही त्यांनी वारंवार माध्यमांना सांगितले.

दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी स्वपक्षांसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष व विरोधी भाजपाच्या नेत्यांना भेटून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याने या संपूर्ण घडामोडींच्या साखळ्या एकमेकांना जोडीत तांबे परिवाराने भाजपशी संधान साधल्याच्या राजकीय चर्चा पेरल्या गेल्या. त्यातून अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यासारख्या नेत्यांनी थेट काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पक्षनिष्ठेवरच संशय घेतल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले. त्यात कमतरता म्हणून की काय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘आपण काहीतरी घडत असल्याची पूर्ण कल्पना थोरात यांना दिल्याचे’ सांगून एकप्रकारे तांबे पिता-पुत्रांनी केलेल्या कृतीत थोरात यांनाही खेचण्याचा प्रयत्न केला.

तेव्हापासून थोरात यांच्या विरोधातील स्वपक्षातील एक लॉबी सक्रिय होऊन डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर कारवाईसाठी आग्रही होती. त्याची परिणीती अखेर आज झाली. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे केंद्रीय सचिव तारीक अन्वर यांनी याबाबतचे पत्र जाहीर करून डॉक्टर सुधीर तांबे यांनी अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होवूनही उमेदवारी दाखल न केल्याने घडल्या प्रकाराची चौकशी करण्याचा निर्णय केंद्रीय समितीने घेतल्याचे व तोपर्यंत त्यांना पक्षातून निलंबित करण्याचे केल्याचे सांगितले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे डॉक्टर तांबे महाविकास आघाडी पासून दुरावले असून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे सत्यजित तांबे आता भाजपचा हात धरतात की अन्य पर्याय निवडतात याकडे नाशिक पदवीधर मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

डॉक्टर सुधीर तांबे यांनी पक्षाने अधिकृत उमेदवारी देवूनही अर्ज दाखल न करण्याची कृती पक्ष शिस्तीचा भंग असल्याने त्यांची चौकशी आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सत्यजित तांबे यांच्याबाबत मात्र पक्षाने अद्यापही कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पक्षाकडून सत्यजित तांबे यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता अजूनही कायम आहे. यावर प्रदेश काँग्रेससह ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची भूमिका मात्र स्पष्टपणे समोर आलेली नाही.

Visits: 84 Today: 1 Total: 435414