कोरोना संकटामुळे ठिकठिकाणी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी शहरभर फिरुन प्रशासकीय अधिकार्यांचे नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगभर थैमान घालणार्या कोरोना महामारीचे सावट अद्यापही कायम आहे. राज्यातील रुग्णसंख्येतही रोज नव्याने वाढ होत असल्याने शासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला पूर्वीच्याच कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आदेश निर्गमित केलेले आहे. त्यानुसार गर्दी होवून कोरोना संक्रमणाला बळ मिळत असल्याने यंदाच्या सार्वजनिक शिवजयंती उत्साहावर निर्बंध आलेले आहे. अशातच घरोघरीच अनेकांनी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी केल्याचे पहायला मिळाले. तर प्रशासनातील सर्वच अधिकार्यांनी कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शहरभर फिरुन नागरिकांना मास्क लावा, गर्दी टाळा, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवा अथवा सॅनिटायझरचा वापर करण्याच्या प्रबोधनात्मक सूचना देत आवाहन केले.

एरव्ही शिवजयंती म्हटले की, दोन-तीन दिवसांपूर्वीच तरुणाई तयारीला लागते. यासाठी मंडप टाकणे, ज्योत आणणे, मिरवणूक, रॅली आदिंचे नियोजन केले जाते. मात्र, काही दिवसांची विश्रांती घेतलेल्या कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्याने शासन अधिक सतर्क झाले आहे. संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाला पूर्वीच्याच कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे दरवर्षीप्रमाणे शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी साजरी होणारी सार्वजनिक शिवजयंती, मिरवणूक, रॅली, प्रतिकात्मक देखावे, प्रात्यक्षिके, लेझीम, झांज आदिंवर निर्बंध आले आहेत. प्रशासनाच्या कोरोना लढाईला बळ देण्यासाठी शिवप्रेमींनी घरोघरीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्याचे दिसून आले.

शहरात साजर्या होणार्या शिवजयंतीमध्ये नेहमीप्रमाणे सहभागी होणार्या प्रशासनातील अधिकार्यांनी यावर्षी पालिकेत छत्रपतींना अभिवादन करुन सामूहिकरित्या शहरभर फिरुन कोरोना नियम पाळण्याबाबत नागरिकांना आवाहन करताना दिसले. गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असून अनेकांना बाधा करत असल्याचे रोज समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी नियमांच्या कडक अंमलबजावणीचे आदेश संबंधितांना दिलेले आहे. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांसह इतर अधिकारी व कर्मचारी कोरोना नियम पाळण्याबाबत प्रबोधनात्मक सूचना देत होते. यावरुन दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात साजरी होणारी शिवजयंती यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने जरी साजरी झाली तरी शिवप्रेमींच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलचा आदर, सन्मान, प्रेरणा, विचार कायम असल्याची भावना दिसली.

संगमनेर पालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीनिमित्त आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर आदिंसह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकार्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शिवजयंती साजरी केली.
