विरोध केला जीव गमावला! चोरट्याच्या चापटीत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी येथील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्सजवळ मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत झोपलेल्या एका व्यक्तीच्या खिशातून पाकीट चोरण्याचा प्रयत्न करतांना चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या कानशिलात जोरदार चापट मारली. त्या मारामुळे तो पेव्हर ब्लॉकवर पडून जखमी झाला आणि काही क्षणात जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती खंडोबा कॉम्प्लेक्सच्या बंद असलेल्या दुकानांसमोर झोपलेला असताना, किरण नंदकुमार काळे (रा. नांदुर-शिंगोटे, ता. सिन्नर, जि. नाशिक), विजय राजू जाधव (रा. निमगाव, ता. राहाता), आणि ऋषिकेश शिवाजी अंधारे (रा. गंगापूर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) या तिघांनी त्याच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.या वेळी झोपेतून जागे झालेल्या व्यक्तीने प्रतिकार केला. त्यातून झालेल्या झटापटीत ऋषिकेश अंधारे याने त्या व्यक्तीच्या कानशिलात जोरदार थप्पड मारली. या जोरदार धक्क्याने तो व्यक्ती मागे कोसळला आणि डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच बेशुद्ध झाला. काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे आणि त्यांचे गस्तीपथक खंडोबा मंदिराजवळ हमसफर ट्रॅव्हल्स ऑफिसच्या समोर गस्त घालत असताना सुमारे ४५ वर्षीय एक अनोळखी पुरुष पेव्हर ब्लॉकवर पडलेला दिसून आला. पाहणी केली असता तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे लक्षात आले आणि त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली होती.त्याला तत्काळ साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून पाकीट काढताना दिसून आले.त्यानंतर त्या व्यक्तीने जागे होऊन विरोध करताच तिघांमध्ये झोंबाझोंबी झाल्याचे दिसले. त्यात एकाने दिलेल्या हाताच्या चापटीमुळे मयत व्यक्ती थेट डोक्यावर पडल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींना ओळखले आणि अटक केली.सीसीटीव्ही पुराव्याच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली असून, किरण नंदकुमार काळे, विजय राजू जाधव, आणि ऋषिकेश शिवाजी अंधारे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५, ३०९ (४), ३(५) अन्वये शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तो भिक मागणारा किंवा स्थलांतरित मजूर असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात करण्यात आले आहे.
Visits: 164 Today: 1 Total: 2124200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *