पंचनाम्यांचा गोंधळ थांबवून नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट मदत द्यावी!
पंचनाम्यांचा गोंधळ थांबवून नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट मदत द्यावी!
किसान सभेची राज्य सरकारकडे मागणी; केवळ उभ्या पिकांचेच पंचनामे होत असल्याने गोंधळ
नायक वृत्तसेवा, अकोले
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकर्यांना सहाय्य करण्यासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकर्यांना हे अर्थसहाय्य मिळावे यासाठी नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र या अंतर्गत केवळ उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असल्याने नुकसान भरपाई अत्यंत थोड्या शेतकर्यांना मिळेल व बहुसंख्य शेतकरी भरपाई पासून वंचित राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे अखिल भारतीय किसान सभेने समोर आणले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारने पंचनाम्यांचा हा गोंधळ थांबवावा व शेतकर्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
परतीच्या पावसाने भिजून खराब झालेल्या पिकाचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकर्यांनी उभ्या पिकांची तातडीने काढणी, मळणी केली. पावसाने भिजलेला, काळवंडलेला हा निकृष्ट शेतमाल सावलीला नेण्याचा प्रयत्न केला. परिणामी नुकसान होऊनही शेतकर्यांची ही पिके आज उभी दिसत नसल्याने या नुकसानीची नोंद केली जात नसल्याने शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी यामुळे मोठ्या प्रमाणात भरपाई पासून वंचित राहत आहेत. फळ पिकांच्याबाबत केवळ फळे लागलेल्या बागांच्याच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत. अनेक शेतकर्यांच्या फळावर न आलेल्या बागांचे राज्यात अतोनात नुकसान झालेले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने डाळिंब, द्राक्ष, संत्री, मोसंबी, आंबे उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत. अति पावसाने ऊस व कपाशीचेही मोठे नुकसान झाल्याने ही पिकेही धोक्यात आली आहेत.
पंचनामे करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने, पंचनामे करताना कागदपत्रांच्या पूर्तता करण्यात खूप वेळ जात आहे. शिवाय कोरोना साथीमुळे प्रत्यक्ष पंचनाम्यांना मर्यादा येत आहे. परिणामी शेतीतील पाणी आटून गेल्यावर व शेतकर्यांची पिकांची काढणी, मळणी करून झाल्यावर अधिकारी पंचनामे करण्यासाठी शेतात पोहोचत आहेत. यामुळे पंचनाम्यांमध्ये नुकसानीच्या खर्या स्वरूपाची नोंद होत नाही. अशा परिस्थितीत सरकारने पंचनाम्यांचा हा गोंधळ थांबवावा व शेतकर्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी डॉ.अशोक ढवळे, जे.पी.गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ.अजित नवले आदिंनी केली आहे.