संगमनेरच्या आंतरराज्य हत्यार तस्करांना मध्यप्रदेशात अटक! घारगाव लव्ह जिहादचा सूत्रधार अडकला; खांडगाव व कोपरगावातील दोघांचाही समावेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्यावर्षी पठारभागात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौगुले याला त्याच्या दोन साथीदारांसह मध्यप्रदेशच्या सेंधवा जिल्ह्यात हत्यारांची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तिघे खासगी कारमधून मोठ्या प्रमाणात हत्यारे घेवून निघाल्याची माहिती वरला पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सौरभ बाथम यांनी आंतरराज्य सिमेवर सापळा लावला असता त्यांना पाहून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची कार झाडावर आदळल्याने बंद पडली आणि पोलिसांनी त्यांना वेढा घालीत सिनेस्टाईल ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीच्या पिस्टलसह चार गावठी कट्टे, चार काडतूस आणि ह्युंदई कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे. सेंधवा पोलिसांच्या या कारवाईत खांडगावच्या गणेश गायकवाडसह कोपरगावच्या राहुल आढाव यालाही अटक करण्यात आली आहे. आरोपी युसुफ चौगुले याला ‘घारगाव‘ प्रकरणात तब्बल नऊ महिन्यानंतर गेल्या महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता. या कारवाईने न्यायालयाच्या शर्तीचेही उल्लंघन झाल्याने त्याचा जामीन रद्द होणार आहे.

याबाबत मध्यप्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्याकाही दिवसांत महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात संशयास्पद हालचाली वाढल्याने जागोजागी नाकाबंदी करुन वाहनांच्या तपासणीसह गुन्हेगारी वृत्तींविरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून मध्यप्रदेशातून हत्यारांची तस्करी करणार्यांविरोधातही कडक पावले उचलल्यात आली होती. त्याचा परिणाम गुरुवारी (ता.15) सेंधवा पोलिसांनी वरला पोलीस ठाण्याच्या सिमावर्ती भागात पंजाबमधील हत्यार तस्करांच्या मुसक्या आवळीत दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातूनही पाच गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतूसे हाती लागल्याने पोलीस अधिक सतर्क झाले होते. वरला पोलिसांनी अशाप्रकारच्या तस्करांची पाळेमुळे शोधण्यासाठी कंबर कसताना खबर्यांचे जाळेही सक्रिय केले.

त्यातूनच महाराष्ट्रातील तिघे मोठ्या प्रमाणात शस्त्र घेवून खासगी वाहनाने जात असल्याची खबर सेंधवा जिल्ह्यातील वरला पोलीस ठाण्याचे निरीक्षक सौरभ बाथम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आवश्यक खबरदारी घेत उपनिरीक्षक रमेश चौहान, सहाय्यक फौजदार महेंद्रसिंह चौहान, पोलीस कर्मचारी नवीन मेहता, बळीराम अछाले, राहुल सोलंकी व आत्माराम यांच्यासह वरला-बलवाडी रस्त्यावरील सम्राट हॉटेलजवळ सापळा रचला. त्यानंतर काही वेळातच मिळालेल्या वर्णनाचे वाहन येताना दिसताच पोलिसांनी रस्त्यात अडथळा उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण पोलिसांच्या सापळ्यात फसत असल्याचे पाहून आरोपींनी नाकाबंदीच्या आधीच कार वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तयारीत असलेल्या पोलिसांनी लागलीच कारचा पाठलाग सुरु केला. या धावपळीत तस्करांच्या कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटून ते झाडावर जावून आदळले.

त्याचवेळी पोलीस पथकाने ह्युंदई कंपनीच्या पांढर्या व्हर्ना कारला (क्र.एम.एच.17/बी.व्ही.5006) वेढा घालून आरोपींवर बंदुका ताणल्या व अगदी सिनेस्टाईल त्यांना ताब्यात घेतले. यावेळी वाहनाची झडती घेतली असता त्यात दोन देशी बनावटीचे पिस्टल, चार गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी सेंधवा पोलिसांनी आरोपी युसुफ दादा चौगुले (रा.घारगाव), गणेश चंद्रभान गायकवाड (रा.खांडगाव, दोघेही ता.संगमनेर) व राहुल वसंत आढाव (रा.खडकी, ता.कोपरगाव) या तिघांवर भारतीय हत्यार कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. त्यांना आज (ता.17) न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्यांची पोलीस कोठडी घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक बाथम यांनी सांगितले.

गेल्यावर्षी जुलै महिन्यात पठारभागातील एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचे पुणे जिल्ह्यातील मंचरमधून बळजबरीने अपहरण करुन तिला मुंबईत नेण्यात आले होते. तेथे तीन दिवस तिच्यावर शारीरिक अत्याचारासह धर्मांतरणही करण्यात आले. 7 जुलैरोजी घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी 10 जुलैरोजी पीडितेला मुंबईतून घारगावला आणून तिला तिच्या पालकांच्या सुपूर्द केले. धमक्या, दमबाजी आणि अत्याचारामुळे भेदरलेल्या त्या विद्यार्थीनीवर वैद्यकीय उपचार झाल्यानंतर 27 जुलैरोजी तिने घारगाव पोलिसांत जावून घडला प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी अपहरण, अत्याचार, धमक्या, बळजबरीने धर्मांतरण करण्यासह पोक्सोतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करुन त्याच दिवशी मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौगुले याला अटक केली होती. त्या प्रकरणात शादाब रशीद तांबोळी, कुणाल विठ्ठल शिरोळे (दोघेही रा.घारगाव), आयाज अजीम पठाण (रा.कुरकुंडी, तिघेही फरार), आदील शब्बीर सय्यद (रा.घनसोली, नवी मुंबई) व अमर मेहबुब पटेल (रा.साकूर, दोघांनाही अटक व सुटका) अशा सहजणांवर गुन्हा दाखल झाला होता.

घारगावचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी अतिशय बारकाईने तपास करताना या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार युसुफ दादा चौगुले असल्याबाबतचे सविस्तर पुराव्यांसह आरोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यामुळे त्याला जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत कोठूनही दिलासा मिळाला नव्हता. मात्र गेल्या महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने तब्बल नऊ महिन्यानंतर त्याची सशर्त जामीनावर सुटका केली. त्याचा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने एखाद्याही गुन्हेगारी कारवाईत आढळल्यास तत्काळ जामीन रद्द होईल अशी अटही घातली आहे. त्यामुळे घारगाव पोलिसांनी सेंधवा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहितीची देवाण-घेवाण सुरु केली आहे. पोलिसांकडून आता त्याच्यावर मध्यप्रदेशात दाखल गुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला जाणार असल्याने त्याचा जामीन रद्द होवून घारगाव प्रकरणात त्याला निकाल लागेपर्यंत कारागृहात रहावे लागण्याची शक्यता आहे. या वृत्ताने ‘युसुफ फॅन क्लब’मध्ये खळबळ माजली आहे.

सेंधवा पोलिसांनी हत्यारांच्या अवैध तस्करीचे पाळेमूळे उखडण्याची मोहीम सुरु केली असून गेल्या दोन दिवसांत 11 गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतूसे आणि लाखों रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुरुवारी पंजाबच्या दोघा आंतरराज्य शस्त्र तस्करांना अटक केल्यानंतर शुक्रवारी गोपनीय माहितीच्या आधारावर महाराष्ट्रातील तिघांना दोन देशी पिस्टल, चार गावठी कट्टे आणि काडतूसांसह रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. यातील युसुफ चौगुले व गणेश गायकवाड या दोघांवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी शस्त्र तस्करीसह अन्य गुन्हे दाखल असून आम्ही घारगाव पोलिसांच्या संपर्कात आहोत.
सौरभ बाथम
पोलीस निरीक्षक, वरला पोलीस ठाणे (मध्यप्रदेश)

