युसुफ चौगुलेच्या डोक्यातील ‘षडयंत्रा’चा शोध घेण्याची गरज! घारगांव पोलिसांना मात्र गांभीर्यच नाही; इतका मोठा शस्त्रसाठा कोणत्या उद्देशासाठी?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील दोघांसह तिघांना गेल्या शुक्रवारी मध्यप्रदेश पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणात अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टलसह चार गावठी कट्टे आणि चार काडतूसे हस्तगत करण्यात आली. सध्या तिघेही वरला पोलिसांच्या कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे. या कारवाईत घारगावच्या युसुफ चौगुलेचे नाव समोर आल्याने गेल्यावर्षी पठारावर घडलेल्या लव्ह-जिहाद प्रकरणालाही हवा मिळाली आहे. या प्रकरणात सूत्रधार असलेल्या चौगुलेला इतक्या मोठ्या शस्त्रसाठ्यासह पकडण्यात आल्याने या कारवाईतून अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. इतकी शस्त्र त्याला कशासाठी पाहिजे होती?, त्याने एखादे षडयंत्र तर रचले नसेल ना?, त्याच्या डोक्यात काय आहे?, कोणाला संपवण्यासाठी त्याने हा सगळा प्रकार केला? अशा अनेक प्रश्नांची उकल होण्याची गरजही त्यातून समोर आली आहे. खरेतर घारगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्याला ‘सशर्त’ जामीन दिला आहे, त्यामुळे पोलिसांनी तत्काळ मध्यप्रदेश पोलिसांशी कागदोपत्री संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयालाही याबाबतची माहिती देण्याची आवश्यकता आहे. मात्र आरोपींना अटक होवून तीन दिवसांचा कालावधी होऊनही घारगाव पोलिसांनी अद्याप कोणतीही हालचाल केल्याची माहिती नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणात अजिबातच गंभीर नसल्याचेही दिसून आले आहे.

शुक्रवारी (ता.16) महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील वरला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाई करीत पांढर्या रंगाची व्हर्ना (एम.एच.17/बी.व्ही.5006) पकडली होती. त्यावेळी पोलिसांना पाहून सुरुवातीला आरोपींनी कारसह पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांची कार झाडावर आदळल्याने कारमधील तिघांनाही जागेवरच ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्यासह वाहनाच्या झडतीत दोन देशी बनावटीच्या पिस्टलसह चार गावठी कट्टे आणि चार काडतूस पोलिसांच्या हाती लागली. या कारवाईत मध्यप्रदेश पोलिसांनी युसुफ दादा चौगुले (रा.घारगाव), गणेश चंद्रभान गायकवाड (रा.खांडगाव) व राहुल वसंत आढाव (रा.कोपरगाव) या तिघांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. सध्या तिघेही वरला पोलिसांच्या कोठडीत आहेत.

गेल्यावर्षी जुलैमध्ये तालुक्याच्या पठारभागातील एका 19 वर्षीय तरुणीचे पुणे जिल्ह्यातील मंचरमधून बळजबरीने अपहरण करुन मुंबईत तिचे धर्मांतरण करण्यात आले होते. सदरील मुलगी अवघ्या 15 वर्षांची असताना युसुफ दादा चौगुले याने ‘लव्ह जिहाद’चा कट रचून तिला त्या वयात घारगावमधील शादाब रशीद तांबोळी (सध्या फरार) याच्याशी प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले होते. त्यावेळी मुलीच्या आणि गावच्या दबावात ‘तो’ प्रकार स्थागित केला गेला होता. मात्र या प्रकरणातील पीडित मुलगी शिक्षणासाठी संगमनेरला येताच चौगुलेने पुन्हा आपले षडयंत्र कार्यान्वीत करुन तिला शादाबच्या जाळ्यात अडकवले व नंतर दोन वर्षांनी ती पुण्यात शिक्षण घेत असताना बोलण्याचे निमित्त करुन शादाबकरवी तिला मंचरमध्ये बोलावून सुरुवातीला चाकणपर्यंत युसुफ चौगुलेच्या कारमधून व नंतर अन्य वाहनातून तिला मुंबईत पाठवण्यात आले होते.

या प्रकरणावरुन संगमनेरातील हिंदूत्त्ववादी संघटना संतप्त होवून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून पठारावरील वातावरण तापवल्यानंतर पोलिसांनी थेट युसुफ चौगुलेलाच ताब्यात घेत शादाब तांबोळी याला पीडित मुलीसह घारगाव पोलिसांसमोर हजर होण्यास भाग पाडले होते. या घटनेनंतर तब्बल 20 दिवसांनी 27 जुलै 2024 रोजी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सर्वात आधी युसुफ चौगुलेलाच अटक केली होती. तेव्हापासून 22 एप्रिल 2025 पर्यंत तब्बल नऊ महिने तोकारागृहात कैद होता. गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने त्याला कडक समज देत अटी व शर्तींच्या अधिन राहून कोणताही गुन्हा करणार नाही या बोलीवर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर अवघ्या 20 दिवसांतच त्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रांची तस्करी करताना मध्यप्रदेशात अटक झाल्याने एकंदरीत या प्रकारातून मोठे गांभीर्य उभे राहीले आहे.

दैनिक नायकला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार युसुफ चौगुले ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी कारागृहात असताना त्याने सोबतच्या काही कैद्यांकडे जामीन होताच आपल्याला फसवणार्यांचा काटा काढणार असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने काहींची नावे घेतल्याचीही चर्चा असून घारगाव पोलिसांनाही त्याची कल्पना आहे. त्यातच तो जामीनानंतर अवघ्या पंधरवड्यातच पुन्हा गुन्ह्यात अडकल्याने घारगाव पोलिसांनी हा प्रकार अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात एका जागेच्या व्यवहारातून त्याच्याकडे मोठी रक्कम आल्याचीही माहिती असून त्यातूनच त्याने स्वतः मध्यप्रदेशात जावून शस्त्र आणण्याचा निर्णय घेतला असावा. या निर्णयामागे त्याच्या मनात सुडाची भावना असल्याचेही ठळकपणे दिसून येत आहे. त्यामुळे शस्त्रतस्करी प्रकरणात त्याला जामीन मिळाल्यानंतर संगमनेर पोलिसांनी त्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचीही गरज आहे.

लव्ह जिहाद प्रकरणात एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल होवून युसुफ चौगुलेसह तिघांना अटक व सुटका झाली आहे. तर, प्रत्यक्ष पीडितेशी निकाह करुन तिच्यावर अत्याचार करणार्या शादाब तांबोळीसह घारगावचा कुणाला विठ्ठल शिरोळे आणि कुरकुंडीचा आयाज अजीम पठाण हे तिघे अद्यापही पसार असून ते नेपाळ अथवा त्यामार्गे देशाबाहेर गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तर, युसुफ चौगुले याला तब्बल नऊ महिन्यांनी कडक शर्तींच्या अधिन जामीन झालेला असतानाही त्याने जीव धोक्यात घालून स्वतः शस्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून त्यातून पीडितेसह तिचे कुटुंबिय व त्यांना मदत करणारे हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशावेळी घारगाव पोलिसांनी तत्काळ वरला (जि.सेंधवा) पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घारगाव पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याची व त्यात त्याला सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीनात नमूद अटी व शर्तींची माहिती देण्याची गरज आहे. शिवाय तेथील न्यायालयालाही याबाबत कळवणे आवश्यक आहे, ज्या ज्यायोगे त्याला शस्त्रतस्करी प्रकरणात जामीन दुर्मीळ होवू शकतो. शिवाय सदरील आरोपीने सर्वोच्च न्यायालयाच्या शर्तींचा भंग केल्याचा मुद्दाही लवकरात लवकर त्या न्यायालयाच्या निर्दशनास आणून देत त्याचा जामीन रद्द करण्याची कारवाई पुढे नेण्याचीही आवश्यकता आहे. मात्र या कारवाईला तीन दिवसांचा कालावधी उलटूनही घारगाव पोलिसांनी अद्याप वरला पोलिसांशी कोणताही संपर्क केल्याची माहिती उपलब्ध नाही, त्यावरुन पोलीस या प्रकरणात किती गंभीर आहेत हे देखील स्पष्टपणे समोर आले आहे.

एका आरोपीने ओळख लपवली?
मध्यप्रदेश पोलिसांनी केलेल्या शस्त्रतस्करीच्या कारवाईतून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला तिसर्या क्रमांकाचा आरोपी राहुल वसंत आढाव हा अतिशय सराईत गुन्हेगार असून त्याने मध्यप्रदेश पोलिसांनाही चकवा देत आपले खरेनाव दडवले आहे. त्याचे मूळनाव अजित अरुण ठोसर उर्फ करमाळ्या असे असल्याची व त्याच्यावर संगमनेर शहरासह तालुका पोलिस ठाण्यात दीड डझनहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तो संगमनेर तालुका पोलिसांकडे दाखल जबरी चोरीच्या एका प्रकरणात फरार असल्याने संगमनेर पोलिसांना त्याचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी संगमनेरच्या पोलीस उपअधिक्षकांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आवश्यक आदेश देण्याची गरज आहे.

मध्यप्रदेश पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या संगमनेरच्या शस्त्रतस्करांकडे दोन देशी बनावटीच्या पिस्टल आणि चार गावठी कट्ट्यांसह अवघे चारच काडतूस असल्याचे आढळले. त्यावरुन काहीसा संशय निर्माण झाला असून काडतुसांपेक्षा शस्त्रांची संख्या अधिक कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपींनी पोलिसांना पाहून पळून जाताना काही काडतूसं फेकून तर दिली नाहीत?, काडतूसे फेकली मग पिस्टल आणि कट्टे का फेकले नाहीत?, की सेंधवा पोलिसांनी जप्त केलेल्या कारची अद्याप कसून तपासणीच झाली नाही असे कितीतरी प्रश्न आणि शंकाही आता निर्माण झाल्या आहेत. संगमनेर पोलिसांनी त्याच्याकडून एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वीच त्याची चौकशी करुन एकंदरीत सत्य समोर आणण्याची आवश्यकता आहे.

