भाजप खासदाराने मंत्रालयात काय शिजतं ते विषद करावं ः तनपुरे
भाजप खासदाराने मंत्रालयात काय शिजतं ते विषद करावं ः तनपुरे
के के रेंज प्रश्नासंदर्भात खासदारांनी केलेल्या विधानावर मांडली भूमिका
नायक वृत्तसेवा, राहुरी
‘के के रेंज प्रश्नासंदर्भात जी वस्तुस्थिती आहे ती मी तुम्हांला सांगितली आहे. आता त्याच्यापुढे अजून काय असेल तर ते भाजपचे खासदार आहेत, त्यांनी मंत्रालयात काय शिजतं हे विषद करावं,’ असे वक्तव्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले व एकप्रकारे खासदार डॉ.सुजय विखे यांना आव्हानच दिले.
‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौर्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवायचा की नरेंद्र मोदी यांच्यावर हे जनतेनेच ठरवावे. भविष्यकाळात कोण खरे ठरते, हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य नुकतेच खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले होते. याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘विखे यांच्या वक्तव्यावर मला फार भाष्य करायचे नाही. मला एवढेच माहिती आहे, शरद पवार हे राजनाथ सिंह यांच्याकडे गेले होते. आमदार नीलेश लंके हे देखील त्यांच्यासोबत होते. मी त्यावेळी कोरोनामुळे आजारी असल्याकारणाने जाऊ शकलो नाही. मात्र, त्या बैठकीत पवार साहेबांनी वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर वरती काय चक्र फिरले, मला माहिती नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात संरक्षण विभागाच्या स्थानिक अधिकार्यांनी येऊन सांगितले की आम्ही जमीन अधिग्रहण करणार नाही. आता जिल्हाधिकार्यांना लष्कराचे अधिकारी सांगत असतील, तर के के रेंज प्रश्नासंदर्भात संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.’
के के रेंज प्रश्नासंदर्भात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकारण सुरू केलयं का, असे तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी आपले माझे बघत असतो. कोण काय बोलते, यामध्ये मला जास्त रस नाही. जी वस्तुस्थिती आहे, ती मी सांगितली आहे. आता याच्यापुढे अजून काय असेल तर ते भाजपचे खासदार आहेत. त्यांनी मंत्रालयात काय शिजतं, हे विषद करावं.’