थोरात कारखान्याचा साखर वाटप कार्यक्रम जाहीर
थोरात कारखान्याचा साखर वाटप कार्यक्रम जाहीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना सालाबादप्रमाणे दीपावली निमित्त मोफत 15 किलो साखर वाटप करण्यात येणार असून कोरोना साथीच्या आजारामुळे सर्व सभासदांची साखर बिले 31 ऑक्टोबरपर्यंत घरपोहोच दिली जाणार आहेत. सर्वांनी 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर, 2020 या काळात आपली साखर कारखाना गोडावूनमधून घेवून जावी असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रेसर असलेला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सभासदांना 15 किलो साखरेचे वाटप केले जाणार आहे. संचालक मंडळाने 30 सप्टेंबर, 2020 अखेर मंजूर प्रती शेअर्सला 15 किलो साखर देण्याचे धोरण घेतले आहे. मात्र कोरोना संकटामुळे गर्दी टाळण्याकरिता सर्व सभासदांची साखर बिले ही 31 ऑक्टोबरपर्यंत घरपोहोच केली जाणार असून सर्वांनी आपली साखर कारखाना गोडावून क्र.13 मधून 1 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर, 2020 या काळात दिली जाणार आहे. यासाठी साखर घेण्यासाठी अधिकार पत्र देताना त्यावर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. तसेच सभासदाने स्वत: शासकीय ओळखपत्र बरोबर आणणे आवश्यक आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सभासदांची 30 सप्टेंबर, 2019 अखेर जमा असलेली परतीची ठेव क्रमांक 1 व रुपांतरीय ठेव क्रमांक 1 वरील 12 टक्के व्याज तसेच रुपांतरीय ठेव क्रमांक 2 वरील 6 टक्क्यांप्रमाणे होणारे व्याज हे सभासदांच्या बचत खात्यात 2 नोव्हेंबरपर्यंत जमा केले जाणार आहेत. तरी सर्व सभासद बंधू-भगिनींनी साखर वाटप कार्यक्रमाप्रमाणेच साखर घेऊन जावी व साखर वाटपाबाबत सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

