साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची काल्याच्या कीर्तनानंतर सांगता
साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची काल्याच्या कीर्तनानंतर सांगता
रुढी परंपरेनुसार प्रतिकात्मक भिक्षा झोळीत साईभक्तांकडून भरभरुन दान
नायक वृत्तसेवा, शिर्डी
येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने 24 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता सोमवारी (ता.26) काल्याच्या कीर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून झाली.
उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे 04.30 वाजता काकड आरती, त्यानंतर पहाटे 05.20 वाजता श्रींचे मंगल स्नान व ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती झाली. सकाळी 06.30 वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व त्यांच्या सुविद्य पत्नी संगीता बगाटे यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली ठाकरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्यात आली. सकाळी 10.00 वाजता मंदीर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे गोपाळकाला कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर दुपारी 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी 06.00 वाजता श्रींची धुपारती तर रात्रौ 10.30 वाजता शेजारती झाली.
श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या प्रतिकात्मक भिक्षा झोळीत साईभक्तांनी भरभरुन दान दिले. यामध्ये गहू, तांदुळ, बाजरी, ज्वारी, तुरदाळ, मुगदाळ, मसूरदाळ, हरभरा, हरभरादाळ, रवा, शेंगदाणा, गुळ, साखर, शुद्ध देशी तुप व खाद्यतेल आदिंद्वारे 2 लाख 85 हजार 272 रुपये व रोख रक्कम 70 हजार 308 रुपये अशी एकूण 3 लाख 55 हजार 580 रुपये इतकी देणगी भिक्षा झोळीद्वारे प्राप्त झाली. तसेच श्री पुण्यतिथी उत्सवाच्या औचित्यावर हैद्राबाद येथील साईभक्त सुनील शहा यांनी 1515 ग्रॅम वजनाची सुमारे 91 हजार रुपये किंमतीची चांदीची परडी संस्थानला देणगी स्वरुपात दिली.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.