काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षांचा ‘जय महाराष्ट्र’! फलकाच्या माध्यमातून सूचक इशारा; राजकीय भूमिका मात्र गुलदस्त्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून सावरत असलेल्या काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर तालुक्यात पहिल्यांदाच कारखान्याच्या माध्यमातून निवडणुकांचा बार उडाला असताना निवडणुकीचा निकाल मात्र बिनविरोधकडे झुकल्याने इच्छुक असूनही माघार घ्यावी लागणार्यांमध्ये काहीशी नाराजी निर्माण झाली आहे. त्याचे प्रतिबिंबही आता उमटू लागले असून माजी उपनगराध्यक्ष धनंजय डाके यांनी माळीवाड्यातील वार्ता फलकाच्या माध्यमातून ‘जय महाराष्ट्र’चा सूर आळवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. संगमनेरातील माळी समाजाचे नेतृत्व करणार्या दिलीप पुंड यांनी रमजान ईदच्या शिरखुर्म्यातून वेगळी वाट जोखली असताना त्यात आता डाकेंच्या नाराजीची भर पडल्याने स्थानिक काँग्रेसच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता आहे. अर्थात डाकेंनी ‘जय महाराष्ट्र’ घालताना आपली राजकीय भूमिका मात्र गुलदस्त्यात ठेवल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिसून आलेली नाही.

तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या निवडणुकीची यंदा रंगत असेल असे सुरुवातीचे चित्र होते. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर माजीमंत्री थोरात यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व गटांमध्ये आपल्या उमेदवारांची निवड करुन एकापेक्षा अधिक जणांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माजी नगराध्यक्ष मारुतीराव डाके यांचे नातू धनंजय डाके यांनीही तळेगाव गटातून उमेदवारी दाखल केली. त्यांच्या उमेदवारीला माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड सूचक असल्याने त्यावेळी तालुक्यात मोठी राजकीय चर्चाही झाली. मात्र सहकार क्षेत्रातील निवडणुका पक्षीय पातळीवर होत नसून सहकारात राजकारण करणार नसल्याचे सांगत ऐनवेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कारखाना निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे यंदाची निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्यता बळावली.

त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर थोरात यांनी अतिरीक्त दाखल केलेले अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यात धनंजय डाके यांनाही माघार घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यातून तळेगाव गटात थोरात समर्थक अंकुश ताजणे यांची बिनविरोध निवड झाली. डाके यांच्या तुलनेत ताजणे यांना कोणताही राजकीय अनुभव नसल्याने त्यातून डाकेंच्या मनात डावलल्याची भावना निर्माण झाली. त्याचे प्रतिबिंब माळीवाड्यातील महात्मा फुले मंडळाच्या वार्ता फलकाच्या माध्यमातून ठळकपणे उमटल्याने शहरातील राजकीय चर्चांना नव्याने ऊत यायला सुरुवात झाली आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर थोरात समर्थक मानल्या जाणार्या माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या सुपूत्राने थेट लोणीत जावून डॉ.सुजय विखे-पाटील यांचे अभिनंदन केले होते. त्याबाबतची छायाचित्रे सोशल माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर उठलेली राजकीय वावटळ खाली बसत असतानाच गेल्या महिन्यात रमजान ईदचे निमित्त साधून भाजपनेते जावेद जहागिरदार यांनी आयोजित केलेल्या शिरखुर्मा पार्टीत दिलीप पुंड यांनी थेट आमदार अमोल खताळ यांच्याशीच जवळीक साधल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुंवया उंचावल्या होत्या. या प्रकाराला जेमतेम पंधरवडा उलटला असताना आता पुंड यांचे समर्थक मानल्या जाणार्या माजी उपनगराध्यक्ष धनंजय डाके यांनी फलकाच्या माध्यमातून ‘जय महाराष्ट्र’ घातल्याने संगमनेरातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत धनंजय डाके यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्कही साधण्यात आला, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांची राजकीय दिशा अद्यापही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे माळीवाड्याच्या ‘त्या’ फलकावरील त्यांचा ‘जय महाराष्ट्र’ श्रेष्ठींना इशारा देणारा की दिलीप पुंड यांच्याप्रमाणे वेगळ्या वाटेवर घेवून जाणारा आहे याबाबत संभ्रम कायम आहे. असे असले तरीही शेकडो लोकांच्या नजरा खेचणार्या या फलकावरील घोषवाक्याने स्थानिक काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेलं नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे.

माजी उपनगराध्यक्ष धनंजय डाके यांना धडपड करणारा नगरसेवक म्हणून ओळखले जाते. सतत काहीतरी उपक्रमशील गोष्टी घडवणार्या डाकेंनी आजच्या डिजिटल युगातही वार्ता फलकाची संस्कृती टिकवून ठेवली आहे. वर्षभरातील विविध सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या आणि नेत्यांच्या वाढदिवसाला माळीवाड्यातील या फलकावर वैशिष्ट्यपूर्ण मजकूर लिहून येथील रस्त्यावरुन जाणार्या प्रत्येकाला काही क्षण थांबवणार्या या फलकावर आता अचानक ‘जय महाराष्ट्र’ असा मजकूर दिसू लागल्याने डाकेंची नाराजी उघड होण्यासह त्यांच्या भविष्यातील राजकारणाबाबतही तर्कवितर्क सुरु झाले आहेत.

