शहराचे हृदय असलेली पाच एकर जमीन ‘वक्फ’ मालमत्ता नाही! उपविभागीय दंडाधिकार्यांचा सलग दुसरा निर्णय; घुलेवाडीच्या सर्व्हे क्रमांकाने झाली होती नोंद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुकेवाडीच्या श्री कान्होबा देवस्थानाच्या जागेवर ‘वक्फ’चा अधिकार नसल्याचा निकाल लागून आठवडा उलटला असतानाच आता शहराचे हृदय (सिटी ऑफ हर्ट) समजल्या जाणार्या तब्बल पाच एकर जागेबाबतचा निर्णयही समोर आला आहे. ताजणेमळा म्हणून ओळख असलेल्या आणि असंख्य रुग्णालये, आस्थापना, बँका व रहिवाशी संकुलांनी गजबजलेल्या नवीन नगर रस्त्यावरील कोट्यवधी रुपयांची मिळकत ‘दर्गाह पीर हजरत फखरुल्लाह शाह उर्फ बारामसी’ यांची इनाम जमीन असल्याचा दावा करण्यात आला होता. वक्फ बोर्डाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयानेही सदरची मिळकत ‘वक्फ’ असल्याने त्यावरील कोणत्याही हस्तांतरणास मनाई आदेश बजावला होता. त्या विरोधात तेथील मालमत्ता धारकांनी संगमनेरच्या उपविभागीय दंडाधिकार्यांकडे पुनर्लोकन याचिका दाखल करुन दाद मागितली होती. त्यावरील सविस्तर सुनावणीत सन 1929 पासूनच्या कागदपत्रांच्या पडताळणीसह दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सदर जागेवर ‘वक्फ’चा कोणताही अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिला आहे. विषेष म्हणजे यापूर्वीच्या दंडाधिकार्यांनी ‘वक्फ’चा दावा मान्य करण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे. या निकालाने गेल्या दीड दशकांपासून आपल्या मालकी हक्काच्या जागेसाठी अविरत संघर्ष करणार्या असंख्य मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संगमनेर शहरातील जंगली महाराज रस्ता अशी ओळख असलेल्या आणि असंख्य रुग्णालये, बँका, आस्थापने, दुकाने, कार्यालयांसह रहिवाशी संकुलांनी गजबजलेल्या नवीन नगर रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक 149 वर ‘दर्गाह पीर हजरत फखरुल्लाह शाह उर्फ बारामसी’ यांच्यावतीने अब्दुल गफ्फार अब्दुल लतीफ यांनी दावा केला होता. कोणतीही ठोस कागदपत्रे नसतानाही सदरची मालमत्ता महाराष्ट्र वक्फ मंडळाची असल्याबाबतची नोंदही त्यांनी केली होती. सदरील दर्ग्याचे संरक्षक अब्दुल गफ्फार यांनी सन 2021 मध्ये वक्फच्या माध्यमातून पालिकेच्या मुख्याधिकार्यांसह या परिसरातील 140 मालमत्ता धारकांना नोटीसाही बजावल्या होत्या. त्या विरोधात सदरील जागेचे मूळ मालक अरुण ताजणे व डॉ.अशोक इथापे यांच्यासह 180 जणांनी उपविभागीय दंडाधिकार्यांकडे धाव घेत न्याय मिळवण्यासाठी दावा केला.

तर, याच परिसरात असलेल्या डॉ.प्रदीप कुटे यांच्या बांधकामास आक्षेप घेतला गेल्याने त्यांनीही 2022 मध्ये राज्य वक्फ मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षांसह अब्दुल गफ्फार शेख, आयुब कादर इनामदार, सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन, मंडलाधिकारी व तलाठ्यांच्या विरोधात उपविभागीय दंडाधिकार्यांकडे स्वतंत्रपणे याचिका दाखल केली होती. या सर्वांची एकत्रित सुनावणी संगमनेरचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्यासमोर झाली. यावेळी त्यांनी सन 1929 पासूनची विविध कागदपत्रे, महसूल व वेगवेगळ्या शासकीय विभागात असलेल्या नोंदी, इनाम रजिस्टर, फेरफार, कोर्टाचा निकाल व ऐतिहासिक दस्ताचे अवलोकन केले असता सर्व्हे क्रमांक 149/803 या मिळकतीचा देवस्थान इनाम जमीन म्हणून कोठेही उल्लेख आढळून आला नाही. शेख अब्दुल गफ्फार व वक्फ मंडळाने दावा केलेला सर्व्हे क्रमांक 163/580 याचा सदरील जमीनीशी दुरान्वये संबंध नसल्याचे आणि सदरचा सर्व्हे क्रमांक घुलेवाडी हद्दितील असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

या दरम्यान ‘दर्गाह पीर हजरत फखरुल्लाह शाह उर्फ बारामसी’ यांच्यासह तीनही पक्षांना सविस्तर म्हणणे सादर करण्याची वेळोवेळी संधी देण्यात आली. त्यात दर्ग्याच्या वतीने कोणतीही ठोस कागदपत्रे सादर करता आली नाहीत. उलट 1929 पासून सदरील मिळकतीचे वारंवार हस्तांतरण, पोट हिस्से, बिगरशेती, गहाण व्यवहार, खरेदी-विक्री आणि अधिकृत परवानगी घेवून बांधकामे झाल्याचे आढळून आले. यापूर्वी 21 फेब्रुवारी 2021 रोजी तत्कालीन उपविभागीय दंडाधिकार्यांनी चुकीच्या पद्धतीने या मालमत्तेला वक्फ संपत्ती घोषित करण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला. सोबतच महाराष्ट्र वक्फ मंडळाने पारीत केलेला आदेश एकतर्फी असल्याचे निरीक्षण नोंदवताना इनाम जमीन म्हणून नोंद असलेला सर्व्हे क्रमांक घुलेवाडी हद्दित असल्याने ‘दर्गाह पीर हजरत फखरुल्लाह शाह उर्फ बारामसी’ यांच्यावतीने दाखल असलेले सर्व दावे फेटाळण्यात आले.

या निर्णयाने संगमनेर शहराचे हृदय समजल्या जाणार्या आणि जुन्या पोस्ट कार्यालयापासून डॉ. अशोक इथापे यांच्या रुग्णालयापर्यंतच्या जवळपास पाच एकर जागेवरील महाराष्ट्र वक्फ बोर्डाची नोंद बेकायदा ठरली असून त्यासाठी अविरत संघर्ष करणार्या 181 जणांसह या भागातील असंख्य मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालानंतर गुरुवारी (ता.17) सायंकाळी परिसरातील मालमत्ता धारकांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सवही साजरा केला.

संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी-घुलेवाडी गावाच्या हद्दितील श्री कान्होजीबाबा उर्फ कानिफनाथ देवस्थानच्या 23 एकर जागेवरही महाराष्ट्र वक्फ बोर्डाने दावा ठोकून सदरची मिळकत मंडळाच्या मालकीची असल्याबाबत नोंद केली होती. गेल्याच आठवड्यात उपविभागीय दंडाधिकार्यांनी वक्फ मंडळाचा दावा फेटाळताना सदरची संपूर्ण मिळकत श्री कान्होबा देवस्थानची असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर आता नवीन नगर रस्त्यावरील कोट्यावधी रुपयांचे मूल्य असलेल्या तब्बल पाच एकर जागेबाबतही तसाच निर्णय समोर आल्याने संगमनेरात वक्फच्या मनमानीला चाप लागला आहे.

