भंडारदरा परिसरातील पर्यटनासाठी पर्यटकांना बंदी! कोविडच्या पार्श्वभूमीवर वन विभागासह गावकर्‍यांचा निर्णय

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील भंडारदरा पर्यटन स्थळासह परिसरातील महत्वाच्या निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी घालण्यात आल्याचा निर्णय मंगळवारी (ता.11) वन विभागाने घेतला असून राज्य शासनाचे पुढील आदेश येऊपर्यंत हा निर्णय कायम राहणार असल्याचे वन विभागाने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा हे महत्वाचे निसर्ग पर्यटन समजले जाते. या पर्यटन क्षेत्रात अर्थात भंडारदरा धरणाच्या रिंगरोडवर सांदणदरी, रतनगड, अमृतेश्वर मंदिर, घाटघरचा कोकणकडा, अलंग-कुलंग-मलंग हे किल्ले वन्यजीव विभागाच्या कळसूबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यात येत असून काही महिन्यांपूर्वी पर्यटनास खुले करण्यात आले होते. भंडारदर्‍याचा टेंट व्यवसायही जोमाने पुन्हा सुरु होऊन पर्यटनाची भरभराटी होऊ लागली होती. स्थानिकांची रोजीरोटी पुन्हा उभारी धरु लागली होती. पंरतु कोरोनाची तिसरी लाट पुन्हा डोके वर काढू लागल्याने तिला आवर घालण्यासाठी राज्य शासनाकडून पर्यटनास पुन्हा बंदी घातली गेली. तसे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले असल्याने शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मंगळवारी भंडारदरा वन विभागाच्या विश्रामगृहावर वन्यजीव कळसूबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांच्या अधिपत्याखाली परिसरातील अभयारण्य क्षेत्रातील सरपंच, वन कमिटी सदस्य, टेंटधारक व पत्रकार बांधवांच्या उपस्थित बैठक पार पडली.

या बैठकीत कोविडची लाट ओसरण्यासाठी सर्वांकडून सहकार्य होण्याची गरज असल्याचे मत अमोल आडे यांनी व्यक्त करत राज्य शासनाकडून पर्यटनास असलेल्या बंदीच्या आदेशाचे पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य असल्याचे सांगितले. अभयारण्यात असलेल्या पर्यटनस्थळावर कोणत्याही पर्यटकास प्रवेश मिळणार नाही. टोलनाक्यांपासून सर्व पर्यटकांना परत पाठविले जाईल. तरीही पर्यटक अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करुन गेलाच तर ज्याठिकाणी पर्यटक किंवा त्यांची गाडी आढळून येईल त्या गावातील वन कमिटी पर्यटकांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करणार आहे. शिवाय तेथून परत पर्यटकांना माघारी पाठविले जाईल. या बैठकीस वनपाल रवींद्र सोनार, सचिन धिंदळे, भास्कर मुठे, महिंद्रा पाटील, रतनवाडीचे सरपंच संपत भांगरे, संजय सोनवणे, लक्ष्मण पोकळे यांच्यासह अनेक टेंटधारक उपस्थित होते.

भंडारदरा परीसरात आदिवासी बांधवांचे वास्तव्य असून त्यांची पर्यटन व्यवसायावर उपजीविका अवलंबून आहे. दोन वर्षांपासून कोरोनाने कहर केल्यापासून या आदिवासी बांधवांना उपजिविकेसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासनाने आदिवासी बांधवांचा विचार करुन पर्यटनासंबंधी नियमात शिथिलता आणावी. ज्या पर्यटकांच्या लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले आहे. त्यांना आरोग्य खात्याच्या सर्व नियमांचे पालन करत पर्यटनास परवानगी देण्यात यावी.
– दिलीप भांगरे (सरपंच, शेंडी)

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण असून पर्यटकांचा ओढा शिखरावर मोठ्या प्रमाणात असतो. कळसूबाई शिखर चढाईसाठी बुधवारी गावपातळीवर विशेब बैठकीचे आयोजन केले गेले असून कळसूबाई बंदचा निर्णय बैठकीतच घेतला जाईल.
– तुकाराम खाडे (सरपंच-बारी)

Visits: 14 Today: 1 Total: 119185

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *