मंत्री थोरात यांना मंत्रीपदाच्या शपथेचा विसर : सदावर्ते

नायक वृत्तसेवा, नगर
नांदेड जिल्ह्यातील एका कर्मचार्‍याने आत्महत्या केली, तेव्हा तेथील लोकप्रतिनिधींनी त्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची व आर्थिक मदतीची घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत दोघा एस.टी.च्या कर्मचार्‍यांनी आपला जीव दिला आहे, मात्र तरीही जिल्ह्याचे पालक व काँग्रेसचे मंत्री असलेले बाळासाहेब थोरात याबाबत काहीच बोलत नाहीत. मंत्रीपदाची शपथ घेतांना आपण जनतेसाठी वचनबद्ध असल्याचे वचन दिले होते होते, त्याचा आपणास विसर पडला आहे का? असा सवाल राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांची उच्च न्यायालयात बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी गेल्या चाळीस दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात सुरुवातीला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उतरले होते. मात्र राज्य सरकारने महामंडळाच्या कर्मचार्‍यांना पगारवाढ जाहीर केल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी या आंदोलनापासून स्वतःला वेगळे केले. तेव्हापासून आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते, ज्येष्ठ विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते या आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यासह मुंबई उच्च न्यायालयात आंदोलकांची बाजूही मांडीत आहेत.

त्या अनुषंगाने त्यांनी आज अहमदनगरमधील तारकपूर आगारात सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नांदेडमधील एका कर्मचार्‍याने आत्महत्या केल्यानंतर तेथील मंत्री व लोकप्रतिनिधी असलेल्या अशोक चव्हाण यांनी त्या कर्मचार्‍याच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यासह आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव आगारातील दोघा कर्मचार्‍यांनी आत्महत्या करुनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री बाळासाहेब थोरात याबाबत काहीच बोलायला तयार नसल्याची टीका त्यांनी केली. थोरात ज्येष्ठ आहेत, जिल्ह्याचे पालक आहेत. मंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी जनतेसाठी वचनबद्ध असल्याची शपथ घेतली होती. मात्र त्याचा त्यांना विसर पडल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

Visits: 9 Today: 1 Total: 115450

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *