कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याबाबत संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन
कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याबाबत संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन
केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची जोरदार मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना संकटात हवालदिल झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या आत्मघातकी निर्णयाविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस समितीच्यावतीने आज (बुधवार ता.16) आंदोलन करण्यात आले असून केंद्र सरकार विरोधात निवेदन देण्यात आले आहे.
प्रांताधिकारी कार्यालयजवळ सुरक्षित अंतराचे पालन करुन हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय फटांगरे, बाबा ओहोळ, रोहिदास पवार, भारत मुंगसे, शिवाजी जगताप, निसार शेख, अवधूत आहेर, अॅड.नानासाहेब शिंदे, भारत मुंगसे, सचिन खेमनर, मुश्ताक शेख आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी निवेदन स्वीकारले.
याप्रसंगी आमदार डॉ.तांबे म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र कोरोना संकटामुळे त्याने मोठ्या कष्टाने उत्पादित केलेला कांदा अपेक्षेपोटी साठवून ठेवला. या कांद्याच्या माध्यमातून चांगले पैसे आले तर शेती पुन्हा उभी करता येईल. सततचा पाऊस व अनेक दिवस राहिलेल्या टाळेबंदीमुळे शेतकरी आर्थिक संकटात गेले. मात्र केंद्र सरकारने या नुकसानीत निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय अतिशय आत्मघातकी ठरला असून शेतकर्यांसाठी मोठा मनःस्ताप करणारा आहे. जर हा निर्णय घेतला तर शेजारील पाकिस्तान राष्ट्रातील शेतकर्यांचा कांदा निर्यात करतील. परिणामी पाकिस्तानचे शेतकरी तुपाशी आणि भारतातील शेतकरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी असे आवाहन आमदार तांबे यांनी केले आहे. तरी शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल असा इशाराही शेवटी दिला.
शेतकरी हा सर्व बाजूने त्रस्त झालेला आहे; त्याच्या उत्पादनांना हमीभाव मिळत नाही. अशातच केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी ही अतिशय अडचणीत आणणारी आहे. यामुळे शेतकर्यांना मोठा तोटा होणार आहे.
– शंकर खेमनर (सभापती, बाजार समिती-संगमनेर)