श्रीरामनवमीच्या पहाटे नामांकित डॉक्टरचा विद्यार्थिनीवर बलात्कार! संगमनेरातील संताप जनक घटना; फरार डॉक्टरला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आज भल्या पहाटेपासून संपूर्ण देशात श्रीराम नवमीचा उत्साह ओसंडून वाहत असताना संगमनेर शहरातून अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन दिवसांपूर्वी सदरच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या ग्रामीणभागातील एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर चक्क रुग्णालयाच्या डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीवरुन संगमनेरातील डॉ.अमोल करपे याच्यावर बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पोक्सो) विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच सदरचा नराधम प्रसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा माग काढीत नाशिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरनेच रुग्णाच्या रुपात दाखल अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने संतापही व्यक्त केला जात आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.6) पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास शहरातील डॉक्टर करपे याच्या रुग्णालयात घडली. दोन दिवसांपूर्वी (ता.4) शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने महाविद्यालयातील शिक्षकांनी तिला डॉक्टर अमोल करपे याच्या रुग्णालयात दाखल करुन त्याबाबतची माहिती मुलीच्या पालकांना दिली. गेल्या दोन दिवसांपासून सदरच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते.

आज (ता.6) पहाटे चारच्या सुमारास डॉक्टर अमोल करपे हा पीडित रुग्णाकडे आला व ‘तुला आता कसे वाटते?’ अशी विचारणा केली. त्यावर पीडितेने ‘आता बरं वाटतंय’ असे उत्तर दिले. त्यानंतर मनात रावण जागलेल्या आणि यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये चर्चेत आलेल्या डॉक्टर अमोल करपे याने पीडितेला खोलीच्या बाहेर येण्यास सांगितले. डॉक्टर म्हणजे देवदूत समजला जात असल्याने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून पीडित विद्यार्थिनी दाखल असलेल्या खोलीतून बाहेर आली. त्यानंतर डॉक्टर करपे याने तिला रुग्णालयाच्या गच्चीवर नेले.

यावेळी बोलताबोलता त्या नराधम डॉक्टरने अचानक पीडितेला मिठी मारल्याने ती घाबरली व आरडाओरड करु लागली. त्यावर डॉक्टर करपे याने ‘ओरडू नकोस, नाहीतर तू काय केलंय, हे तुझ्या आई-वडिलांना सांगेल’ असा दम भरला. त्यामुळे सदरची मुलगी रडू लागली. त्याचाही त्या नराधमावर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने तिच्या सातत्याच्या विरोधानंतरही तिच्यावर बळजबरी व धमक्या भरीत अत्याचार केला. त्यानंतर त्याने पीडितेला खाली जाण्यास सांगितले व जाताजाताही ‘घडला प्रकार कोणाला सांगितला तर, जीवे ठार मारण्याची धमकी दिली.’ या घटनेने प्रचंड घाबरलेल्या त्याची चिमुरडीने तिची आई दवाखान्यात आल्यानंतर पहाटे घडलेला प्रकार सांगितला. या घटनेने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या त्या माऊलीने लागलीच आपल्या पतीला ही घटना सांगितल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला.

घटनेनंतर पीडितेच्या गावातील काहीजणांसह तिचे नातेवाईक डॉक्टर अमोल करपे याच्या रुग्णालयात धावले. मात्र तोपर्यंत आपले बिंग फुटल्याची कुणकुण लागल्याने नराधम डॉक्टर तेथून पसार झाला. आज दुपारी मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या काही नातेवाईकांसह शहर पोलीस ठाण्यात यवून सदरचा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टर करपे याच्या रुग्णालयात जावून त्या मुलीचा जवाब नोंदविला. त्यावरुन शहरातील नामांकित समजल्या जाणाऱ्या डॉक्टर अमोल करपे याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64 (2), (3), 68 (डी), 351 (3) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम 4, 6, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या डॉक्टर अमोल करपे याचा तात्काळ शोध घेवून नाशिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. त्याला संगमनेरात आणण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे.

कोविड संक्रमणाच्या काळात चांगले काम केल्याने प्रकाशझोतात आलेल्या डॉक्टर अमोल करपे याच्या अनेक रंगित चर्चा सध्या शहरात सुरु आहेत. त्याने यापूर्वीही काही महिलांशी लगड करण्याचे प्रकार केले. मात्र प्रत्येकवेळी माफी मागून त्याने वेळ मारुन नेली. यावेळी मात्र या नराधमाने आपल्या मुलीच्या वयाच्या सोळावर्षीय विद्यार्थिनीलाच आपल्या वासनेचे शिकार बनवल्याने संगमनेर शहरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित डॉक्टरला कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणीही होऊ लागली आहे. ऐन रामनवमीच्या दिनी अवघा देश राममय झालेला असताना डॉक्टरच्या वेशातील रावणाने एका अल्पवयीन मुलीवर हात घातल्याने जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातही एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 402 Today: 2 Total: 1107541
