बसस्थानकावरील सार्वजनिक कार्यक्रमांना व्यापार्यांचा विरोध! थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे; अवघ्या दोन हजार रुपयांच्या बदल्यात मिळते जागा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही वर्षात सार्वजनिक कार्यक्रमांसह राजकीय आंदोलनांचे केंद्र बनलेल्या संगमनेर बसस्थानकाच्या परिसरातून आता नाराजीसोबतच विरोधाचे सूरही उमटत आहेत. या भागात जवळजवळ रोजच सार्वजनिक कार्यक्रम होत असल्याने लाखों रुपये भरुन भाडेतत्वावर घेतलेल्या गाळाधारकांचे आर्थिक नुकसान होत आहे. परिवहन महामंडळाकडून अवघ्या दोन हजार रुपयांच्या बदल्यात अख्खा वाहनतळंच मिळत असल्याने कधीकाळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी होणारी आंदोलनं आणि कार्यक्रमांसाठी याच जागेला पसंदी मिळत असल्याने येथील व्यापार्यांना ग्राहकांच्या प्रतिक्षेत दिवस घालवावा लागत आहे. त्यातून गाळ्यासाठी खर्च केलेल्या रकमेचे व्याजही वसूल होत नसल्याने स्थानिक पातळीवर तक्रारी करुन थकलेल्या व्यापार्यांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांनाच या समस्येतून सुटका करण्याचे साकडे घातले आहे.
गावठाण आणि उपनगरांचा मध्य आणि पुणे-नाशिक महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या जागेतील टपर्या हटवून आठ-दहा वर्षांपूर्वी आकाराला आलेल्या संगमनेर बसस्थानकाच्या दर्शनीभागात दुमजली व्यापारी संकुल साकारण्यात आले आहे. या इमारतीसाठी करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च भागवण्यासाठी राज्य सरकारने ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या सूत्राचा वापर केल्याने बसस्थानकाचे बांधकाम करणार्या ठेकेदाराने दर्शनीभागातील गाळ्यांसाठी लाखों रुपयांची अनामत रक्कम घेतली आहे. प्रचंड वर्दळीचा भाग असल्याने अनेकांनी बँकांचे अथवा सावकारांचे कर्ज घेवून या संकुलात दुकानेही थाटली आहेत.
दोन भागात विभागलेल्या या व्यापारी संकुलासमोर ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय म्हणून प्रशस्त जागाही सोडण्यात आली आहे. मात्र त्याचा लाभ भलतेच घेत असल्याचे वारंवार समोर येवून व्यापार्यांमध्ये नाराजी निर्माण होत असतानाच आता अलिकडच्या काळात या जागेत सातत्याने होणार्या सामाजिक, राजकीय आंदोलनांसह विविध कार्यक्रमांमुळे व्यापार्यांच्या व्यवसायावरच परिणाम होवू लागल्याने व्यापारी धास्तावले आहेत. यातील काहींनी आपले गाळे अन्य व्यावसायिकांना भाडेकराराने देवून या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबला आहे, तर बहुतेकजण आज-उद्या सुधारणा होईल या आशेवर आलेला दिवस पुढे रेटण्याचे काम करीत आहेत. मात्र त्यांच्या अपेक्षेला रोजच हरताळ फासली जावू लागल्याने नोंदणीकृत असलेल्या येथील व्यापारी संघटनेने सुरुवातीला आगारप्रमुखांसह पालिकेला निवेदन देत येथील सर्व कार्यक्रम आणि आंदोलनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
मात्र स्थानिक प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने हतबल झालेल्या व्यापार्यांनी आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करुन त्यांनाच या गंभीर विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. लाखों रुपयांची अनामत रक्कम देवून घेतलेल्या गाळ्यांसमोर रोजच विविध शासकीय, निमशासकीय, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय आंदोलने, महापुरुषांच्या जयंत्या या सारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होवून दुकानांसमोरच मोठे मांडव आणि कर्णकर्कश आवाजातील साऊंड वाजवले जात असल्याने अशावेळी येथील दुकानांमध्ये ग्राहक येईनासे झाले आहेत. त्यामुळे सामान्य व्यापार्यांना मोठ्या आर्थिक अडचणी सोसाव्या लागत आहेत.
येथे आयोजित होणार्या कार्यक्रमांच्या बदल्यात परिवहन महामंडळ सर्रासपणे अवघ्या दोन हजार रुपयांच्या बदल्यात वाहनतळाची हवी तितकी जागा उपलब्ध करुन देत असल्याने अशा प्रकारांमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने कर्जबाजारी होवून घेतलेल्या दुकानांचे नुकसान होत असल्याने मुख्यमंत्र्यांनीच या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देवून या जागेत होणारे सर्वप्रकारचे कार्यक्रम कायमस्वरुपी बंद करावेत अशी विनंती करण्यात आली आहे. या पत्राच्या प्रति डझनभर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्यांना पाठवण्यात आल्या असून या समस्येतून तोडगा काढला गेला नाही तर पुन्हा पूर्वीप्रमाणे रस्त्याच्या कडेला टपर्या बसवण्याचा सज्जड इशाराही देण्यात आला आहे. त्यावर आता शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरुन काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील सर्वात प्रशस्त आगार समजलेल्या जाणार्या संगमनेर बसस्थानकाच्या परिसरातील व्यापारी संकुलामुळे या परिसरातील गजबज वाढली आहे. मात्र ठेकेदाराकडून वाहनतळासाठी सोडण्यात आलेल्या जागेचा योग्यप्रकारे वापर होत नसल्याने काही फळविक्रेते, फेरीवाले यांनी दर्शनीभागात आपले बस्तान टाकले आहे. त्यातून होणार्या नुकसानीचा हिशोब सुरु असतानाच गेल्याकाही वर्षात महामंडळाने सर्रास दोन हजारांच्या बदल्यात वाहनतळ भाड्याने देण्याचा उद्योग सुरु केल्याने येथील व्यापारीवर्ग अक्षरशः मेटाकुटीला आला असून भीक नको पण कुत्रं आवर असे ओरडून सांगण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावरुन आता राज्याच्या प्रमुखांनाच साकडे घातले गेल्याने काय बदल होतात याकडे येथील व्यापारी वर्गासह संगमनेरकरांचेही लक्ष लागले आहे.