गटारमिश्रीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांत तीव्र संताप
गटारमिश्रीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांत तीव्र संताप
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गेल्या 2 दिवसांपूर्वी कोपरगाव नगरपालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत देशात 18 वे तर राज्यात 17 वे मानांकन मिळाले आहे. तर दुसरीकडे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्ग परिसरातील प्रभाग पाचमध्ये होणार्या पाणी पुरवठा व्हॉल्ववर जमा होणार्या गटारीच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तर परिसरातील नागरिकांना गटारमिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने नरसिंह प्रतिष्ठानचे गणेश लकारे यांनी पालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

देशात मानांकन मिळविलेल्या नगरपालिकेने मिरविण्यापेक्षा सामान्य जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावे. जेणेकरून मानांकन मिळाल्याचे सार्थ होईल. म्हणून प्रभाग पाचमधील पाण्याच्या पाईपलाईनवरील उघड्या व्हॉल्वमधून परिसरातील गटारीचे पाणी पाईपलाईनमध्ये मिसळते. यामुळे परिसरातील नागरिकांना नळाद्वारे गटार मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच या उघड्या पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. यातून रोगराई वाढू शकते. त्यामुळे मानांकन मिळविणार्या पालिकेने लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करून काम मार्गी लावावे. अन्यथा पुढील होणार्या परिणामास तयार रहावे, असा इशारा नरसिंह प्रतिष्ठानचे गणेश लकारे यांनी दिला आहे. तसेच रहिवाशांनी पालिका पाणी पुरवठा अभियंता ऋतुजा पाटील यांच्याशी अनेकदा फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

