प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या आशा पुन्हा जागल्या! खासदार राजाभाऊ वाझेंचे प्रयत्न; रेल्वेमंत्र्यांकडून ‘पुनर्विचारा’चे संकेत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘जीएमआरटी’ प्रकल्पाची बाधा आल्याने जवळजवळ गुंडाळण्यात आलेल्या ‘पुणे-नाशिक’ सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत दिलासादायक वृत्त हाती आले. सरळमार्गाने प्रस्तावित असलेल्या या मार्गात बदल करण्याचे आदेश मिळाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठी नाराजी निर्माण झाली होती. त्यातून रेल्वेमंत्रालयावरील दबावही वाढत असतानाच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केलेली मागणी मान्य करण्यात आली असून त्याबाबतचे पत्रही मध्यरेल्वेला पाठवण्यात आले आहे. त्यानुसार प्रस्तावित जुन्या रेल्वेमार्गाबाबतची सद्यस्थिती, निर्माण झालेले अडथळे आणि उपाय या गोष्टींचे संशोधन करुन त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे या रेल्वेमार्गाबाबतच्या आशा पुन्हा एकदा जागल्या असून तिनही जिल्ह्यातील जनरेट्याला यश येत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्याला जोडणारा आणि औद्योगिक व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाचा ठरणारा हा प्रकल्प गेल्या डिसेंबरमध्ये रद्द केल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात केली होती. गेल्या तीन दशकांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारही आग्रही असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदरचा प्रकल्प मेट्रोच्या धर्तीवर राबवण्याचा निर्णय घेताना त्याचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हपमेंट कार्पोरेशन (महारेल) द्वारा पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या संपादनाला गती येवून तीनही जिल्ह्यात थेट खरेदीखताद्वारे शेतकर्यांच्या जमिनीही घेतल्या गेल्या व त्याबदल्यात कोट्यवधी रुपयांचा मोबदलाही दिला गेला. मात्र त्यानंतर अचानक खोडदजवळील ‘जीएमआरटी’ प्रकल्पाचा अडथळा सांगत प्रस्तावित मार्गच गुंडाळला गेल्याने शेतकर्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती.
लोकांच्या मनातील तीव्र भावनांचा विचार करुन रेल्वेमंत्र्यांच्या या निर्णयाला शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे, पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे व अमोल खताळ यांनी विरोध करीत लोकप्रतिनिधींची एकजूट करुन जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वेमंत्रालयावरील दबाव वाढत होता. या राजकीय मंडळींनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेत त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला. खासदार वाझे यांनी गेल्या महिन्यात रेल्वेमंत्र्यांची भेट घेत प्रस्तावित प्रकल्पासाठी भूसंपादीत झालेल्या जमीनी, त्या बदल्यात अदा केलेले कोट्यवधी रुपये, मध्यंतरी जीएमआरटीच्या वरीष्ठ शास्त्रज्ञांनी प्रकल्पाबाबत दाखवलेली सकारात्मकता आदी गोष्टींचा ऊहापोह करीत त्यांनी याबाबत पुनर्विचार करण्याची विनंतीही त्यांना केली होती.
त्यांच्या या मागणीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवली असून रेल्वेच्या मध्यविभागाला प्रस्तावित मार्गाबाबतची वस्तुस्थिती, त्यात निर्माण झालेले अडथळे, त्यावरील उपाय, या प्रकल्पाला झालेला उशीर आणि प्रकल्प खर्च याबाबतचे संशोधन करुन नव्याने सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या या कारवाईने प्रस्तावित मार्गाचा नव्याने प्रकल्प अहवालही (डीपीआर) तयार होणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेमंत्रालयाने दाखवलेल्या या सकारात्मक निर्णयाची माहितीही त्यांच्या कार्यालयाकडून खासदार वाझे यांना लेखी स्वरुपात देण्यात आल्याने जवळजवळ गुंडाळलेल्या या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा आशा निर्माण झाल्या आहेत.
प्रस्तावित रेल्वेमार्गावर कृषी गोदामे, शितगृहे आणि औद्योगिक गोदामांची निर्मिती होणार असल्याने त्याद्वारे या तिनही जिल्ह्यातील कृषी उत्पादनांना महानगरांच्या बाजारपेठा उपलब्ध होणार आहे. या शिवाय पुणे व नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीही जोडल्या जाणार असल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या मार्गासाठी नागरिकांसह लोकप्रतिनिधीही प्रचंड आग्रही असल्याने मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी सुरु झाली होती. मात्र आता रेल्वेमंत्र्यांनी पुनर्विचाराचा निर्णय घेतल्याने आगामी काळात ‘जीएमआरटी’ला वळसा घालून जुन्या मार्गाचा विचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातून या तिनही जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील अविकसित तालुक्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. त्यातून कृषी व औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल होण्याची अपेक्षा असल्याने आपण सातत्याने जुन्यामार्गासाठी आग्रही आहोत. याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून त्यांना या रेल्वेमार्गाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न सुरु असून त्याला आता यश येत असल्याचे दिसत आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी आपण आग्रही आहोत.
– राजाभाऊ वाझे
खासदार, नाशिक लोकसभा मतदारसंघ