शासन तमाशा कलावंतांच्या बाबतीत संवेदनशील ः देशमुख

शासन तमाशा कलावंतांच्या बाबतीत संवेदनशील ः देशमुख
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा कलाकारांच्या बाबतीत महाराष्ट्र शासन संवेदनशील आहे. रघुवीर खेडकर आणि इतर काही मंडळींच्या शिष्टमंडळाने 23 सप्टेंबरला मुंबईत येऊन आपल्या मागण्या आणि म्हणणे मांडावे, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.


महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी शासनाचे तमाशा कलाकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील निवडक तमाशा फडमालकांसह तमाशा पंढरी नारायणगाव येथे एक दिवसीय उपोषण केले. त्यावेळी खेडकर यांच्याशी मंत्री देशमुख यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. मागील सहा महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने मागील वर्षीचा तमाशाचा हंगाम कार्यक्रमाविना गेला. त्यामुळे तमाशा कलाकारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यासंदर्भात शासनाने पावले उचलावीत म्हणून हे उपोषण करण्यात आले. यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या उपस्थित सांस्कृतिक मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर आमदार बेनके यांनी खेडकर यांना स्वतःच्या हातानेफळांचा रस देऊन उपोषणाची सांगता केली. तमाशा कलाकारांचे प्रश्न आणि मागण्या महाराष्ट्र तमाशा अभ्यास परिषदेचे अध्यक्ष डॉ.संतोष खेडलेकर यांनी मांडल्या. अनेक तमाशा कलाकारांनी आपल्या व्यथा भाषणातून मांडल्या. यावेळी महाकला मंडळाचे लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना वर्षा संगमनेरकर, मुसा इनामदार, मालती इनामदार, कैलास नारायणगावकर, राजू बागुल, विनायक महाडिक, संजय महाडिक, सुधाकर पोटे, सीमा पोटे, अमर पुणेकर, संभाजी संक्रापूरकर, शांताबाई संक्रापूरकर, शिवकन्या बडे, महादेव देशमुख, जयसिंगराव पवार, महेश पिंप्रीकर, मंदा पाटील, वामनराव मेंढापूरकर आदी तमाशा फडमालक उपस्थित होते.

Visits: 127 Today: 2 Total: 1108171

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *