भगव्या वातावरणातही ‘धर्मांतरण’ करण्याचा प्रयत्न! संगमनेरातील धक्कादायक प्रकार; नागरिकांनी चोप दिल्यानंतर तिघांवर गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रयागराज कुंभमेळ्यात एकवटलेल्या कोट्यवधी हिंदू समाजाबाबत जगभरात सुरु असलेल्या चर्चा, अभिनेता विकी कौशलच्या अभिनयातून साकारलेल्या छावा चित्रपटातून मनामनात जागलेला ‘धर्म’ आणि काल-परवा साजर्‍या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भगवे झालेले वातावरण असतानाही संगमनेरात धर्मांतरासाठी दबाव निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणावर फळविक्रीचा व्यवसाय करणार्‍या महिलेला ‘तुमच्या धर्मात काय ठेवलंय’ असे सांगत ‘आमचा धर्म स्वीकारा. तुम्हाला घर, पैसा, मुलांचे शिक्षण आणि त्यांना नोकरीही देवू’ असे आमिष दाखवित चक्क भगव्या ध्वजाच्या छायेत उभे राहूनच धर्मातरण करण्याची ‘ऑफर‘ दिली गेली. या प्रकाराने संतप्त झालेल्या ‘त्या’ रणरागिनीने रुद्रावतार धारण करताच आसपासच्या नागरिकांनी ‘त्या’ तिघाही धर्मांधांना बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रयत्नासह धमकावण्याच्या कलमान्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी (ता.18) दुपारी साडेचारच्या सुमारास नाशिकरोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ घडली. या घटनेत दोन महिलांसह एक व्यक्ति या परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करणार्‍या एका 42 वर्षीय महिलेजवळ येवून तिला ख्रिश्‍चन धर्मियांच्या बायबल या ग्रंथाबाबत माहिती देवू लागले. अचानक सुरु झालेल्या या प्रकाराने भांबावलेल्या त्या महिलेने ‘तुम्ही हे सगळं मला कशासाठी सांगत आहात?’ असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर त्या महिलांमधील एकीने ‘तुम्ही कोणत्या धर्माच्या आहात’ असा प्रतिप्रश्‍न करीत सदरची महिला हिंदू असल्याची खात्री करुन घेतली.


काहीच संबंध नसताना तिघांकडून अचानक धर्माबाबतची विचारणा ऐकून आश्‍चर्य निर्माण झालेल्या त्या महिलेला संभ्रमित अवस्थेतच त्या तिघांनी ‘तुम्ही आमचा ख्रिश्‍चन धर्म स्वीकारा, तुम्हाला घरं, पैसे, मुलांचे शिक्षण आणि त्यांना नोकरी सुद्धा देवू’ असे आमिषही दाखवले. त्यावर ‘त्या’ महिलेने ‘मी हिंदू आहे आणि मला माझ्या धर्माचा अभिमान आहे, तुम्ही येथून निघून जा’ असे सांगत त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र मार खाल्ल्या शिवाय मागे हटतील ते धर्मप्रसारक कसे? या म्हणीनुसार त्यातील एकीने ‘तुमच्या धर्मात काय ठेवलंय?’ असे म्हणत हिंदू धर्माचा अवमान केल्याने ‘त्या’ महिलेचा संताप अनावर होवून तिने रणरागिनीचा अवतार धारण केला.


तिचा रुद्रावतार पाहून ‘त्या’ तिघांच्याही पायाला ‘कंप’ सुटल्याने त्यार्ंीह धर्मांतरण फाट्याला सोडून तेथून काढता पाय घेतला. मात्र आता ‘त्या’ रणरागिनीचा पारा चढलेला असल्याने तिने एकामागून एक शिव्या हासडीत त्यांचा पाठलाग सुरु केल्यानंतर महामार्गाच्या मध्यातील प्रत्येक विद्युत खांबावरील भगव्या झालरी आणि ध्वजाच्या छायेने भगवेमय झालेल्या रस्त्यावरुन जाणार्‍यांनी त्या तिघांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ आडवून विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या आणि ‘त्या’ महिलेच्या बोलण्यातून ‘वास्तव’ समोर आल्यानंतर उपस्थितांमधील प्रत्येकाचे हात सळसळू लागले.


त्यातील काहींनी लागलीच आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देत हातही सैल केल्याने या क्षणाच्या पूर्वसंध्येला ज्या रस्त्यावर छत्रपतींच्या पोवाड्यांचे आवाज गर्जत होते, त्या रत्यावरुन कानफडात नगारे वाजल्याचे आवाज घुमू लागले. दरम्यानच्या काळात सदरील महिलेने शहर पोलिसांशी संपर्क साधून घडला प्रकार सांगितल्याने पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त नागरिकांच्या गराड्यातून दोन महिलांसह एका धर्मप्रसारकाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. तेथे ‘त्या’ 42 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन भारती शांतीलाल चितळे (वय 40), आशा धिरज चितळे (वय 30, दोघीही रा.विठ्ठलनगर, लोणी) व जीवन वामन सावंत (वय 48, रा.मुकुंदनगर, अहिल्यानगर) या तिघांविरोधात भारतीय न्यायसंहितेतील धार्मिक भावना दुखावण्याच्या कलम 302 सह फौजदारी धाकदपटशा निर्माण करणे व सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.


गेल्या सहा महिन्यात तुष्टीकरणाच्या राजकारणातून देशात मोठ्या प्रमाणात धार्मिक धु्रवीकरण झाले आहे. त्याचा परिणाम गेल्या महिन्यात प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभपर्वातून दिसल्यानंतर त्याच्या जगभरात चर्चा सुरु असतानाच अभिनेता विकी कौशलच्या अभिनयातून साकारलेल्या छावा चित्रपटाने देशभर धुमाकूळ घातला. त्यातून मनामनातला ‘धर्म’ जागला असतानाच त्याचे प्रतिबिंब छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंती सोहळ्यातूनही स्पष्टपणे बघायला मिळाले. संगमनेरात तर यंदा पहिल्यांदाच हा सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. शहरातील अंतर्गत रस्त्यांसह महामार्गाच्या मध्यातील दुभाजकांवर भगव्या झालरी, पडदे आणि असंख्य भगवे ध्वज लावले गेले होते. जे आजही कायम असल्याने शहर भगवेमय भासत असतानाच त्याच्या छायेतच चक्क हिंदू महिलेला ख्रिश्‍चन धर्म स्वीकारण्याची ‘ऑफर’ दिली गेल्याने शहरात संताप निर्माण झाला आहे.

Visits: 293 Today: 5 Total: 1112840

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *