तब्बल चाळीस तासानंतर बुडालेला विद्यार्थी सापडला! मृतदेह पाहून त्याच्या नातेवाईक व मित्रांना शोक अनावर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या मंगळवारी (ता.16) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या यश कृष्णा आडेप या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर तब्बल चाळीस तासांनंतर आज सकाळी खराडीनजीक तरंगतांना आढळून आला. स्थानिक गावकर्यांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर कायदेशीर सोपस्कार उरकून शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींना शोक अनावर झाला होता.

गेल्या काही वर्षात प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने प्रवरेचे पात्र अत्यंत धोकादायक बनले आहे. त्याचा परिणाम दरवर्षी उन्हाळी आवर्तनात सुट्टीच्या निमित्ताने संगमनेरात येणार्या पाहुणे मंडळींसह स्थानिकांना भोगावा लागत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. अनियमित झालेल्या नदीपात्रात अचानक उथळ तर अचानक खोल स्वरुपाचे पाणी असल्याने पोहण्यासाठी पात्रात उतरणार्यांच्या जीवाला नेहमीच धोका असतो अशी आजची अवस्था आहे. आजवर दरवर्षी उन्हाळी आवर्तनात अशा अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत.

गेल्या मंगळवारी (ता.16) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पद्मनगरमध्ये राहणारा आणि सह्याद्री विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणारा यश आडेप हा आपल्या मित्रमंडळीस संगमनेर खुर्दनजीकच्या छोट्या पुलाजवळ आंघोळीसाठी गेला होता. यावेळी पोहोत असतांना त्यातील दोघे गटांगळ्या खाऊ लागल्याने यश आडेप त्यांना वाचवण्यासाठी गेला, मात्र या गडबडीत तोच बुडाला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काहींनी गटांगळ्या खाणार्या ‘त्या’ दोघांना वाचवले, मात्र यश पाण्याखाली गेला तो पुन्हा वरती आलाच नाही.

तेव्हापासून प्रशासन, त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी संगमनेर खुर्दपासून ते ओझर बंधार्यापर्यंत दिवस-रात्र त्याचा शोध घेत होते. त्यासाठी निष्णात पोहणार्यांची मदत घेवून नदीपात्रात जागोजागी बुड्या घेवून त्याचा शोधही घेतला गेला. मात्र तो कोठेही आढळून आला नव्हता. या घटनेला तब्बल 40 तासांचा कालावधी लोटल्यानंतर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास खराडीनजीक त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला. स्थानिकांनी तो पाण्यातून बाहेर काढला, त्याच दरम्यान त्याचे नातेवाईक व मित्र तेथे पोहोचले. याबाबतची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर कायदेशीर सोपस्कार उरकून यश आडेप या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या कुटीर रुग्णालयात आणण्यात आला.

त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत गरीब कुटुंबातील यश हा खुप होतकरु आणि कष्टाळू मुलगा होता. बसस्थानकाजवळील एका सुपर शॉपीमध्ये काम करुन तो आपले शिक्षण करण्यासोबतच वडिलांनाही आर्थिक हातभार लावत होता. परिसरात त्याने मित्रांचा मोठा संचही केला होता. त्याच्या अशा अकस्मात अपघाती मृत्यूने त्याच्या कुटुंबियांसह मित्रांनाही धक्का बसला असून त्याचा मृतदेह सापडल्यापासूनच या सर्वाना शोक अनावर झाला होता.

गेल्या काही वर्षातील प्रचंड वाळू उपशामुळे संगमनेरच्या प्रवरानदीचे पात्र अनियमित आणि अत्यंत धोकादायक बनले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आपल्या मामाच्या गावी येणार्या चिमुकल्यांसह संगमनेरकर फिरण्यासाठी एकमेव ठिकाण असलेल्या प्रवराकाठी येतात. यावेळी काही जणांना पोहण्याचाही मोह होतो. अशावेळी अशा दुर्दैवी घटनांची शक्यता शंभर टक्के असते. आजवर दरवर्षी अशा चार ते पाच घटना समोर आल्या आहेत. यावर्षीच्या पहिल्याच उन्हाळी आवर्तनात यश आडेप या विद्यार्थ्याचा बळी गेल्याने पालकांनी अधिक सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

