शेतकरी व कामगारांच्या मागण्यांसाठी अकोलेत ‘माकप’चा मोर्चा एक महिन्यात प्रश्न न सोडविल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा
नायक वृत्तसेवा, अकोले
शेतकरी व कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर अकोले येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शेतकरी व कामगारांचा गुरुवारी (ता.26) मोर्चा काढण्यात आला.
शहरातील वसंत मार्केट येथील पक्षाच्या कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातून फिरून अकोले तहसील कार्यालयावर नेण्यात आला. अकोले तालुक्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसानीची भरपाई सर्व शेतकर्यांना द्या, भेदभाव न करता सर्व आदिवासींना खावटी अनुदान द्या, आशा-अंगणवाडी-अर्धवेळ परिचर-आहार कर्मचार्यांना किमान 15 हजार रुपये वेतन द्या, बांधकाम कामगारांना विविध योजनांचे लाभ द्या, निराधार-विधवा-परित्यक्ता-अपंगांना तातडीने देय असलेले मानधन द्या, केंद्राचे शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, वन जमिनी कसणारांच्या नावे करा, कामगार विरोधी कायदे मागे घ्या. या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
परतीच्या पावसाने तालुक्यातील सर्वच शेतकर्यांचे नुकसान झालेले असताना केवळ मोजक्याच शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्यांवर यामुळे अन्याय झाला आहे. खावटी अनुदानातही निकष लावून तालुक्यातील हजारो गरीब आदिवासींना वंचित ठेवण्यात आले आहे. निराधार विधवांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून थकविण्यात आले आहे. मोर्चात याबाबत संताप व्यक्त करण्यात आला असून हे प्रश्न पुढील एक महिन्यात न सोडविल्यास तालुक्यात अत्यंत आक्रमक आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे, एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर काकड, तुळशीराम कातोरे, आशा घोलप, भारती गायकवाड, छाया कुळधरण, अस्मिता कोते, सविता काळे, नंदू गावंडे, अविनाश धुमाळ, संदीप शिंदे आदिंनी आंदोलनाचे नेतृत्व केले.