शिवजयंती निमित्त संगमनेरातून निघणार दोन मिरवणूका! शिवसेनेसह खासगी मंडळाचा समावेश; दोघांमध्ये दोन तासांचे अंतर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बदललत्या राजकीय स्थितीत सार्वजनिक उत्सवांचे स्वरुपही बदलत असल्याचे चित्र सध्या संगमनेरात बघायला मिळत असून दोन्ही बाजूच्या राजकीय दबावात प्रशासन मात्र भरडून निघत आहे. बसस्थानकाच्या मोक्याच्या जागेवर आमचाच देखावा असावा यावरुन गेली आठ दिवस राजकीय धुळवड साजरी झाल्यानंतर आता त्याचे ओघळ पारंपरिक मिरवणुकीपर्यंतही पोहोचले आहेत. त्यातून मार्ग काढताना पोलिसांनी दोन्ही विषयाच्या वादात ‘पारंपरिक’ला फाट्यावर सोडून ‘तडजोडीचा’ मार्ग अवलंबल्याचे दिसत असून बसस्थानकाच्या जागेची दोन भागात विभागणी केल्यानंतर आता सायंकाळी निघणार्या मिरवणुकीचेही दोन भाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सायंकाळी पालिकेच्या प्रवेशद्वारापासून शिवसेनेसह हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाकडून शिवप्रतिमेची ‘स्वतंत्र’ शोभायात्रा काढली जाणार असून दोघांमध्ये दोन तासांचे अंतर ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरात राजकीय परिवर्तन झाल्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्षाला चांगलीच धार चढत आहे. सध्या सुरु असलेल्या तीथीनुसारच्या शिवजयंती उत्सवाच्या तयारीत त्याचा अनुभवही सामान्य माणूस घेताना दिसतोय. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर संगमनेर मतदारसंघात सक्रिय झालेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी पहिल्यांदाच तीथीनुसार शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेत बसस्थानकावरील जागेवर दावा करण्यासाठी 20 जानेवारीलाच परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. या दरम्यान शिवसेनेकडूनही त्याच जागेची मागणी करण्यात आल्याने प्रशासन दबावात आले. त्यातच दोन्ही आमदारांनी बसस्थानकाच्या जागेचा विषय प्रतिष्ठेचा केल्याने संगमनेरात नवा राजकीय संघर्ष निर्माण होवून प्रशासनाला शांतता व सुव्यस्थेच्या दृष्टीने ती जागा ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करावी लागली.
आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनासोबत बैठक घेत त्यातून तोडगा काढताना प्रतिबंधित क्षेत्र सोडून दोन्ही बाजूला दोघांना जागा देण्याचा पर्याय दिल्यानंतर प्रशासनाने मूळजागा सोडून महायुतीला उत्तरेकडील तर महाविकास आघाडीला दक्षिणेकडील जागा देत त्यावर तोडगा काढला गेला. त्यामुळे या विषयावरुन सुरु झालेला राजकीय संघर्ष शांत होत असतानाच शिवसेनेकडून निघणार्या पारंपरिक मिरवणुकीचा प्रलंबित विषय समोर आला. त्यातून मार्ग काढताना वारंवार बैठका, चर्चा होवूनही तोडगा निघत नसल्याने पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली आहे.
राज्यात तारखेनुसार आणि तीथीनुसार दोनवेळा शिवजयंती साजरी होण्यास सुरुवात झाल्यापासून तीथीनुसारच्या शिवजयंतीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र यंदा शिवसेनेसह हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळानेही गेल्या दहा वर्षाचा दाखला देत पारंपरिक मिरवणुकीवर दावा केल्याने नवा ‘पेच’ निर्माण झाला आहे. येथेही पोलिसांनी दबावात येत ठाम निर्णय घेण्याचे सोडून तडजोडीचा मार्ग स्वीकारल्याचे दिसत असून शिवजयंतीच्या पारंपरिक मिरवणुकीवर शिवसेनेचा हक्क कायम ठेवतानाच ठाकरे मंडळाकडून दाखल झालेल्या अर्जालाही मिरवणुकीची परवानगी दिली आहे.
मात्र या दोन्ही मिरवणुका स्वतंत्रपणे काढण्याचे निर्देश असून सायंकाळी पाच वाजता शिवसेनेकडून पालिका प्रवेशद्वारापासून बाजारपेठ, तेलिखुंट, गवंडीपूरा, मेनरोड, चावडीमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या मार्गावरुन पारंपरिक मिरवणूक निघेल. त्यानंतर दोन तासांनी ठाकरे मंडळाची मिरवणुकही याच मार्गाने छत्रपतींच्या स्मारकाजवळ येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी संगमनेरच्या शिवजन्मोत्सवाचा इतिहास बदलला जाणार असून त्यात नव्याने दोन अध्याय जोडले जात आहेत.
शांतता समितीच्या बैठकीतच दोनगटात राडा!
सोमवारी साजर्या होत असलेल्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज शांतता समितीची बैठक बोलावली होती. मात्र यंदाची मिरवणूक कोणाची याचा अद्यापही निर्णय नसल्याने त्यावरुनच आजच्या बैठकीत खडाजंगी सुरु झाली. यावर्षी पारंपरिक मिरवणुकीसाठी शिवसेनेसह हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाचा अर्ज दाखल आहे, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मात्र कोणतीही परवानगी मागण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून त्यावर निर्णय जाहीर होणं अपेक्षित असतानाच शिवसेना आणि ठाकरे मंडळाच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दीक हमरीतुमरी होवून प्रशासनासमोरच दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे पोलीस अधिकारी संतप्त झाले होते.