खारघरच्या वेदनेकडे दुर्लक्ष करुन किसान सभा लाँग मार्चवर ठाम! अकोले पोलिसांची आयोजकांना नोटीस; दुर्घटना घडल्यास कारवाईचा इशारा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भर उन्हात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने अनेकांचे बळी जावून महाराष्ट्र वेदनांनी विव्हळत असताना अखिल भारतीय किसान सभेने मात्र आपले इप्सित साधण्यासाठी शेतकर्‍यांचा वापर करणारच असल्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांच्या या भूमिकेला जिल्हा प्रशासनाने मात्र विरोध दर्शविला असून अशाप्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सद्यस्थितीत त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला. मात्र या आंदोलनाचे निमंत्रक कॉ. डॉ. अजित नवले यांनी सरकारकडेच बोटं दाखवले असून प्रशासनाची विनंती धुडकावली आहे. त्यामुळे अकोले पोलिसांनी त्यांना फौजदारी संहितेच्या अधिकारांचा वापर करुन 149 अन्वये नोटीस बजावली असून एखाद्याही आंदोलकास उष्माघाताचा त्रास झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

शेतकरी, शेतमजूर, कामगार व श्रमिकांचे विविध प्रश्न घेवून दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय किसान सभेने नाशिक ते मुंबईपर्यंत लाँगमार्चचे आयोजन केले होते. त्यावेळी सदरील मार्च मुंबईत पोहोचण्यापूर्वीच सरकारने आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन प्राधान्याने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समितीची स्थापनाही केली होती. मात्र त्यानंतर मोठा कालावधी उलटूनही अपवाद वगळता आंदोलकांच्या मागण्या आजही तशाच असल्याने किसान सभेचे निमंत्रक कॉ. डॉ. अजित नवले यांनी आज (ता.26) अकोल्यापासून लोणीपर्यंत पायी मोर्चाचे व त्यानंतर लोणीत महामुक्काम आंदोलनाचे आयोजन केले असून त्यासाठी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील अनेक आदिवासी व शेतकरी अकोल्यात हजर झाले आहेत.

गेल्या 16 एप्रिल रोजी मुंबईतील खारघर येथे राज्य सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. सकाळी दहा वाजता नियोजित असलेला हा कार्यक्रम साडेअकरा वाजता सुरु होवून भरदुपारी दीड वाजता संपला. प्रचंड उष्णतेच्या या कालावधीत उपस्थितांसाठी सावलीची व्यवस्था नसल्याने अनेकांना उन्हाचा चटका बसला. त्यातूनच शासकीय आकडेवारीनुसार 13 जणांचा उष्माघाताने बळी गेला तर अनेकांना त्याचा प्रचंड त्रासही झाला. राज्य सरकारने भरउन्हात हा कार्यक्रम घेतल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीने सरकारवर टीका करीत राजीनामाही मागितला. अवघ्या राज्याला वेदना देणार्‍या या दुर्घटनेतून महाराष्ट्र सावरत असतानाच आता किसान सभेनेही राज्य सरकारच्या पावलावर पाऊल ठेवीत प्रचंड उष्णतेच्या काळातच आपल्या मागण्या रेटण्यासाठी गोरगरीब शेतकरी, कामगार, मजूर व श्रमिकांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरविले आहे.

खारघर दुर्घटनेनंतर देशभरातून राज्य सरकारवर टीका झाल्यानंतर अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत असताना किसान सभेच्या ‘अकोले ते लोणी’ लाँगमार्चला विरोध दर्शविला आहे. या आंदोलनापासून किसानसभा परावृत्त व्हावी यासाठी संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार सतीश थेटे व पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले यांची भेट घेवून त्यांना नियोजित आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून पदयात्रेचा कालावधी दुपारी तीननंतर सुरू करुन शक्यतो सावली आणि रात्रीचा प्रवास करण्याचा पर्याय दिला आहे.

मात्र सद्यस्थितीत हा मोर्चा निघूच नये अशी प्रशासनाची भूमिका असल्याने या मोर्चाचे आयोजक व निमंत्रक कॉ. डॉ. अजित नवले यांना फौजदारी संहितेच्या अधिकारांचा वापर करुन अकोले पोलिसांनी 149 अन्वये नोटीस बजावली असून त्यात खारघरच्या दुर्घटनेचा विचार करता उष्माघाताचा तसाच प्रकार घडण्याची व त्यातून जिल्ह्याच्या शांतता व सुव्यस्थेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या उपरांतही सदरील मार्च निघाल्यास व त्यातून एखादी घटना समोर आल्यास अथवा शांतता व व्यवस्था भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या सर्व घडामोडी घडूनही किसान सभा आपल्या भूमिकेवर ठाम असून आंदोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.25) रात्रीपासूनच आदिवासी, शेतकरी, कामगार, मजूर व श्रमिकांचे जथ्ये अकोल्यात दाखल होत आहेत. आज दुपारी तीन वाजता अकोल्यातून त्यांचा मार्च मार्गस्थ होणार असून तेथून ते संगमनेरात पहिला मुक्काम करुन 28 एप्रिल रोजी लोणीत पोहोचून तेथे महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने अकोल्यात मोठा फौजफाटा तैनात केला असून बाजारतळाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सूचना डावलून किसान सभा हे आंदोलन तडीस नेते का याकडे अवघ्या राज्याचे लक्ष्य केंद्रीत झाले आहे.


आम्ही उन्हात चालणार आहोत याची सरकारला खूपच चिंता लागली आहे. उन्हात तळपून शेतकर्‍याने मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला आज कवडीमोल भाव आहे, माय-मावलीच्या कष्टाला दामच नाही याची मात्र सरकारला काळजी वाटत नाही. आज मात्र हजारो शेतकरी, कष्टकरी सरकारच्या काळजीचा बुरखा फाडण्यासाठी रस्त्यावर उतरत असताना सरकारला अचानक शेतकर्‍यांचा कळवळा आला आहे. आमच्या आंदोलनात खारघरसारखी घटना घडणार नाही, त्यासाठी आम्ही दुपारी तीननंतर चालण्याचा आणि प्रवासासाठी अधिकाधिक रात्रीचा वापर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
– कॉ. डॉ. अजित नवले
निमंत्रक : अ. भा. किसान सभा, अकोले

Visits: 6 Today: 2 Total: 27282

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *