काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरावर दरोडा टाकणारी टोळी पकडली! स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; हिवरगावपावसा येथील म्होरक्यासह सहाजणांना अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रविवारी संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा घालून देवीचे दागिने, पानं आणि मुखवटा असा लाखों रुपयांचा ऐवज लांबवला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा समांतर तपास अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता. त्यानुसार शाखेने तपास कामी विशेष पथक स्थापन करुन प्रकरणाचा तपास सुरु केला असतानाच या प्रकरणाचा सूत्रधार हिवरगाव पावसा येथील सुयोग दवंगे असल्याचे समोर आले. त्याचा माग काढीत असताना तो आज रोजी आपला साथीदार सचिन मंडलिक याच्या मदतीने चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी लोणीमार्गे अहिल्यानगर येथे जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी लोणी ते कोल्हार रस्त्यावर लावलेल्या सापळ्यात आरोपी अडकले. यातील तिघांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यात 26 लाख 12 हजार 900 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून यापूर्वी या टोळीने सिन्नर तालुक्यातील दोन मंदिरांमध्ये अशाच प्रकारे चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. अवघ्या चार दिवसांतच गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास लावल्याने तालुका पोलिसांची फाटलेली लक्तरं वेशीवर जाण्यापासून वाचली आहेत.
गेल्या रविवारी (ता. 9) तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा घालून देवीच्या दागदागिन्यांसह मुकुट आणि अन्य असा लाखों रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. जाताना चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्हीशी जोडलेला डीव्हीआरही पळवल्याने या प्रकरणाचा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. त्यातच तालुका पोलीस ठाण्याला अतिशय निष्क्रिय पोलीस निरीक्षक लाभल्याने त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास लागण्याची सुतराम शक्यता नव्हती. हिच गोष्ट ताडून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेनंतर तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकाला घटनास्थळी पाठवून समांतर तपास सुरु करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक तयार करुन त्यांना या प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने अविश्रांत तपास करीत विविध ठिकाणचे सीसीटीव्ही आणि अन्य तांत्रिक विश्लेषणावर एकएक धागा जोडीत संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावशापर्यंत मजल मारली. योगायोगाने आरोपी आजच चोरीतील 199 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि एक हजार 665 ग्रॅम वजनाचे चांदीचे असे एकूण 26 लाख 12 हजार 900 रुपयांचे दागिने घेऊन लोणीमार्गे अहिल्यानगर येथे ते विकण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने आरोपींच्या मागावर खबरे सोडून कोल्हार ते लोणी या रस्त्यावर सापळा रचला. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळ्या रंगाची वॅक्स वेगन कंपनीची पोलो (क्र.एम.एच.04/एच.एफ.1661) कार दृष्टीपथात येताच पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यानुसार चालकाने काही अंतर आधीच वाहन उभे करुन त्यातील तिघांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या. तर, वाहनात बसलेल्या तिघांना जागीच धरण्यात आले. यावेळी वाहनातून वरीलप्रमाणे दागदागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. या सर्वांना संगमनेर तालुका पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावून हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरावर दरोडा घालणाऱ्या टोळीचा परदाफार्श करुन संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोळी प्रमुख सुयोग अशोक दवंगे (वय 21), सचिन दामोदर मंडलिक (वय 29, रा. संगमनेर), संदीप किसन साबळे (वय 23, रा. पाचपट्टा, ता. अकोले), संदीप निवृत्ती गोडे (वय 23, रा. सोमाटणे, ता. अकोले), अनिकेत अनिल कदम (वय 21) व दिपक विलास पाटेकर (वय 24, दोघेही रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे) अशा सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून उद्या त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात चोरट्यांच्या या टोळीने काकडवाडीतील मंदिरावर दरोडा घालण्यापूर्वी सहा मार्च रोजी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडीतील बालाजी मंदिर व नाशिक-पुणे महामार्गावरील वज्रेश्वरी मंदिरातही अशाच पद्धतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.
एकीकडे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या बेकायदा धंद्यांमुळे गुन्हेगारी घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी मोठी नाराजी असतानाच त्यात नियमित घडणाऱ्या चोरीच्या घटनांचे तपासही लागत नसल्याने तालुक्याच्या या निष्क्रिय पोलीस निरीक्षकांची बदली व्हावी अशी नागरिकांना अपेक्षा होती. काकडवाडी प्रकरणातही या अधिकाऱ्याकडून काहीही होणार नाही हे माहीत असल्याने नागरिकांच्या नाराजीत मोठी भर पडली होती. त्याचा उद्रेक होण्याची शक्यता असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा झटपट तपास लावून तालुका पोलिसांसह पोलीस निरीक्षकांची वेशीवर जाण्याआधीच वाचवली आहे.