काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरावर दरोडा! सुमारे 50 लाख रुपयांचे दागिने लंपास; संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
संगमनेर तालुक्यातील निमोण गटात असलेल्या काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात आज (ता.9) पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून देवीच्या 50 ते 60 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दोन किलो वजनाचा चांदीचा मुखवटा लंपास केला आहे. धक्कादायक म्हणजे चोरीकरुन पळून जाताना चोरट्यांनी डिव्हीआरही पळविल्याने चोरट्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सदरची घटना समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह आणि ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज (ता.9) पहाटेच्या सुमारास हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निमोण भागातील काकडवाडीच्या श्री महालक्ष्मी मंदिरात घडली. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास मंदिराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आंत प्रवेश केला व देवीच्या अंगावरील नियमित दागिन्यांसह कपाटात ठेवलेले सुमारे 50 ते 60 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन किलो वजनाचा देवीचा मुखवटा असा सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन तेथून पळ काढला. धक्कादायक म्हणजे या मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत, याची कल्पना असल्यागत चोरट्यांनी आपला कार्यभार उरकल्यानंतर कार्यालयातील ‘डीव्हीआर’ही गायब केला आहे. त्यामुळे या घटनेचा शोध लावताना पोलिसांचा कस लागणार आहे.
आज सकाळी मंदिराचे पुजारी नियमित पूजा करण्यासाठी आले असता सदरचा प्रकार समोर आला. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनाही देण्यात आली असून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह ठसे तज्ञ व शानपथकाला घटनास्थळी पाठविले आहे. काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावर परिसरातील नागरिकांसह हजारो भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी देवीची यात्राही मोठ्या उत्साहाने भरते व त्यात हजारों भाविक सहभागी होतात. याच मंदिरात चोरट्यांनी डाव साधल्याने मंदिराच्या इतक्या मोठ्या देवस्थानाच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
Visits: 346 Today: 3 Total: 1106955

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *