जोर्वेनाका हल्ला प्रकरणी आणखी चौघांना अटक! एलसीबीची धरपकड; ‘त्या’ सोळाजणांना ‘दोन’ पर्यंत कोठडी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रविवारी जोर्वेनाका परिसरात दोन टप्प्यात आठजणांना बेदम मारहाण करण्याच्या प्रकरणात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आणखी चारजणांना अटक केली आहे. या प्रकरणाशी संबंध असल्याच्या कारणावरुन मंगळवारी पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले होते. चौकशीअंती त्यातील चौघांचा सहभाग आढळल्यानंतर उर्वरीत तिघांना सोडून देण्यात आले. या प्रकरणी एकूण दीडशे आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून आत्तापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. आधी अटक केलेल्या सोळाजणांना न्यायालयाने 2 जूनपर्यंत तर मंगळवारी रात्री अटक केलेल्या चौघांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले.

रविवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ या तीन तासांच्या कालावधीत घडलेल्या दंगलीच्या दोन घटनांनी शहरासह तालुक्याचे वातावरण गढूळ केले आहे. संगमनेर शहराला हिंदू-मुस्लिम सौहार्दाचा मोठा इतिहास आहे, मात्र अगदीच किरकोळ कारणांतून झालेली मारहाण आणि त्यात दीडशेहून अधिक जणांचा सहभाग यामुळे विश्वासाच्या या परंपरेलाही तडा गेला आहे. त्याचाच परिपाक ही घटना केवळ जोर्वेनाका ते जोर्वे इतकीच मर्यादीत न राहता आसपासच्या डझनभर गावांपर्यंत पोहोचली आणि त्याची धग गावागावातून उसळलेल्या रोषातून जाणवली.

घडलेली घटना अतिक्रमणांमधून आणि त्यातही सामुहिकपणे घडल्याने आणि त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातून आपल्या गावाकडे जातांना निंबाळे, रहिमपूर, कनोली, मनोली, वाघापूर, रायते, ओझर खुर्द आणि बुद्रुक, कनकापूर, जाखूरी, पिंपरणे, देवगाव, उंबरी बाळापूर आणि कोल्हेवाडी या गावांमधील रहिवाशांना कधीतरी असा अनुभव आलेला असल्याने ही घटना एकाचवेळी सार्वत्रिक रोष उसळवणारी ठरली. त्यामुळे सुरुवातीपासूनच या घटनेतील दोषींचा शोध अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) आपल्याकडे घेतला.

गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी तीसहून अधिक जणांची चौकशी केली असून त्यातील वीस जणांना अटक करण्यात आली आहे. एलसीबीने मंगळवारी दुपारी सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर रात्री उशिराने त्यातील अरबाज करीम शेख (वय 23, रा.रहेमतनगर), काशिफ असद कुरेशी (वय 24, रा.भारतनगर), हुजीब शब्बीर शेख (वय 28) व फैसल महंमद शेख (वय 27, दोघेही रा. नाईकवाडपूरा) या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

सोमवारी (ता.29) रात्री अटक केलेल्या आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला. गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्यातून बिघडलेली सद्भवना यावर सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने अटक केलेल्या नईम कादर शेख (वय 47, रा.उन्मतनगर), रेहान गुलफान पठाण (वय 21), अमीर रफिक शेख (वय 27), इस्माईल निसार पठाण (वय 24, तिघेही रा.नाईकवाडपूरा), शहबाज याकूब शेख (वय 24), मोबीन मुबारक शेख (वय 24), नफीस अनिस पठाण (वय 24), तौफिक रफिक शेख (वय 23), अबुजर बिलाल शेख (वय 35), अल्ताफ मुस्तफा अन्सारी (वय 36), सलमान साजीद शेख (वय 25), शकिल नासीर पठाण (वय 45, सर्व रा.रहेमतनगर), इम्रान उस्मान पठाण (वय 28, रा.अकोले नाका), अमजद गुलामनबी शेख (वय 45), शहेबाज गफार शेख (वय 24) व अहद सय्यद आद (वय 23, तिघेही रा.लखमीपूरा) या सोळाजणांना 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जोर्वे नाक्यावरील प्रकार संगमनेर शहरासह तालुक्याची सामाजिक शांतात गढूळ करणारा होता. त्याचा दीर्घकाळ परिणाम होवू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा मुळापासून तपास करण्यासाठी आपल्या नियंत्रणातील स्थानिक गुन्हे शाखेलाही जोडले आहे. सध्या सुरु असलेले अटकसत्र त्यांच्याकडूनच सुरु असून या प्रकरणाचा सूत्रधार शोधण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे पोलिसांकडून सुरु असलेली धरपकड यापुढेही काही दिवस अशीच सुरु राहणार असल्याचे दिसत आहे.

