राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान ः डॉ. शेखर पाटील इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार वितरण उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्राच्या उभारणीत ज्ञानदान करणार्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे म्हणूनच सामर्थ्यसंपन्न राष्ट्रनिर्मिती करणार्या शिक्षकांना राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्याचे इनरव्हील क्लबचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी केले.

इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरतर्फे जिल्ह्यातील 42 शिक्षकांना इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने व पाच शाळांना पर्यावरणपूरक, उपक्रमशील व आनंदी शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वृषाली कडलग तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इनरव्हील जिल्हा 313 च्या अध्यक्षा रचना मालपाणी, काजळे ज्वेलर्सचे संचालक ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, प्रकल्पप्रमुख सुनीता कोडे, शुभलक्ष्मी बेलापूरकर उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या शूरवीर सरसेनापती संताजी या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.

आपल्या भाषणात डॉ. बी. जी. शेखर पुढे म्हणाले, सद्यस्थितीत समाजात कुटुंब व्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांना विभक्त पती-पत्नींना समुपदेशन करून एकत्र आणण्याचे कार्य करावे लागत आहे. कुटुंब व्यवस्था चांगली राखण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुण असतात ते हेरून त्यांना प्रोत्साहन दिल्यास व त्यांचा आत्मविश्वास वाढविल्यास बलशाली राष्ट्रनिर्मिती होईल. आपण शिक्षणाकडे गुंतवणूक म्हणून बघितले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती आहे. गावोगावी मंदिरे बांधली जातात त्याला माझा विरोध नाही. मात्र शिक्षण मंदिरांची अवस्था बिकट होत असताना ती बांधण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. इतर शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली असल्याचा दावा माजी आमदार तांबे यांनी केला. सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले तर शुभलक्ष्मी बेलापूरकर यांनी इनरव्हील प्रार्थना सादर केली. सुनीता कोडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन वैशाली खैरनार यांनी केले.
