‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्गावर कोणताही आक्षेप नाही! जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण; रेल्वेमंत्र्यांची भूमिका मात्र संशयास्पद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गामुळे खोडद जवळील रेडिओ दुर्बिण प्रकल्पाला बाधा निर्माण होईल. प्रस्तावित मार्गावरुन जलदगती रेल्वे धावणार असल्याने तेथील शास्त्रज्ञांना रेडिओ लहरी मिळवण्यात अडचणी येतील अशी कारणं समोर करीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन महिन्यांपूर्वी हा प्रकल्पच रद्द करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून रेल्वेमंत्रालया विरोधात नाराजी निर्माण झाली असून आजी-माजी खासदारांसह विधान परिषदेचे सदस्य, आमदार सत्यजीत तांबे यांनीही ही रेल्वे संगमनेरमार्गेच धावावी यासाठी तीनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत संवाद सुरु केला आहे. अशातच विज्ञानदिनाच्या औचित्याने आयोजित एका कार्यक्रमात या प्रकल्पातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जे.जे.सोळंकी यांनी जीएमआरटी प्रकल्प विकासकामांच्या विरोधात नसल्याचे व प्रस्तावित मार्ग प्रकल्पाच्या 491 चौरस किलोमीटरच्या क्षेत्राबाहेरुन गेल्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी सदरचा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरुन घेतला असा संशय निर्माण झाला आहे.

पुणे-नाशिक या दोन शहरांना जोडणार्या रस्तेमार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासह अधिक जलद वाहतूक व्यवस्था निर्माण करुन तीन महानगरांची त्रिकोणीय श्रृंखला निर्माण होण्यासाठी पुणे-नाशिक व्हाया संगमनेर या रेल्वेमार्गाची नितांत गरज आहे. गेल्या तीन दशकांपासून त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरुन मागणीही होत आली आहे. शिरुर आणि नाशिकच्या आजी-माजी खासदारांनी या प्रकल्पासाठी सातत्याने संसदेत आवाज उठवल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबेही पुढे सरसावले असून त्यांनी प्रस्तावित रेल्वेमार्गाचा लाभ मिळणार्या पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद सुरु केला आहे. त्यातून व्यापक जनआंदोलन उभारुन रेल्वेमंत्र्यांना त्यांचा निर्णय बदलण्यास भाग पाडले जाण्याचा प्रयत्न सुरु आहे.

‘जीएमआरटी’चे कारण सांगून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्र्यांची दिल्लीत भेट घेत एकवेळ जीएमआरटीचे शास्त्रज्ञ आणि रेल्वेच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रशिक्षणासाठी दिल्लीत गेलेल्या आमदार अमोल खताळ यांनीही रेल्वेमंत्र्यांची भेट घेत त्यांना प्रस्तावित मार्गात कोणताही बदल करु नये अशी विनंती केली. त्यावेळीही त्यांनी सर्वांना विश्वासात घेवूनच पुढील निर्णय घेण्याची हमी दिल्याने जवळजवळ रद्द झालेल्या या प्रकल्पाबाबत थोडीफार धडधड सुरु असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे खासदार कोल्हेंच्या सूचनेनुसार संयुक्त बैठक झाल्यास त्यातून तोडगा निघेल व आंदोलनातून जनरेटा वाढेल असे चित्र निर्माण झालेले असतानाच आता खूद्द जीएमआरटीच्या वरीष्ठ शास्त्रज्ञांनीच या प्रकल्पाबाबत मोठे भाष्य केल्याने सदरचा प्रकल्प रद्द करण्याचा रेल्वेमंत्र्यांचा निर्णय संशयाच्या फेर्यात अडकला आहे.

जागतिक विज्ञानदिनाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात खोडदच्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या प्रकल्पाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जे.जे.सोळंकी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या ‘पुणे-नाशिक’ रेल्वेप्रकल्पाच्या विषयाला हात घालताना जीएमआरटी प्रकल्प विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करणार नसल्याचे स्पष्ट केले. येथील प्रकल्पाच्या 491 चौरस किलोमीटर अंतराच्या परिघाबाहेरुन सदरचा रेल्वेमार्ग गेल्यास दुर्बिणीच्या कामकाजात कोणताही अडथळा येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या दरम्यान त्यांनी 1987 ते 1989 या काळात जुन्नर तालुक्यातील खोडदजवळ 400 हेक्टर जागेत अवघ्या 50 लाख रुपयांच्या खर्चात उभारलेल्या या प्रकल्पाची आणि तेथील दुर्बिणीतून आजवर केलेल्या वेगवेगळ्या संशोधनाची माहितीही उपस्थितांना दिली.

सध्या पुणे-नाशिक या प्रस्तावित रेल्वेमार्गावरुन हायस्पीड रेल्वे धावल्यास या प्रकल्पाला मिळणार्या रेडिओ लहरींमध्ये अडथळा येईल अशा चर्चा सुरु आहेत. मात्र हा प्रकल्पही विना अडथळा कार्यरत राहील आणि थोडाफार बदल केल्यास प्रस्तावित रेल्वमार्गालाही काहीच अडचण येणार नाही असा मध्यममार्ग त्यांनी यावेळी सूचवला. त्यांच्या या विधानाने प्रस्तावित रेल्वमार्गाच्या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवणार्या लोकप्रतिनिधींना पाठबळ मिळाले असून डॉ.सोळंकी यांच्या स्पष्टीकरणानंतर आता प्रस्तावित मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यातून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव संशयाच्या पडद्यावर आले असून त्यांनी शास्त्रज्ञांशी कोणतीही चर्चा न करता ऐकीव माहितीवर प्रस्तावित प्रकल्प थेट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे आता दिसू लागले आहे. त्यामुळे या प्रकल्पालाही राजकारण आडवे येते की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे.

खोडदजवळील चारशे हेक्टरच्या परिसरात असलेला जीएमआरटी प्रकल्प पाथ फाइंडर टेक्नोलॉजी म्हणून जगात पहिल्या क्रमांकावर गणला जातो. 1987 ते 89 याकाळातील शास्त्रज्ञांनी आत्मनिर्भरतेची चुणूक दाखवली व त्यातून हा महाकाय प्रकल्प साकारला. देशातील विकासकामांना शास्त्रज्ञांनी कधीही विरोध केलेला नाही. या उलट प्रस्तावित असलेला ‘पुणे-नाशिक’ रेल्वेप्रकल्प जीएमआरटीच्या 491 चौरस किलोमीटरच्या परिघाबाहेरुन गेल्यास दुर्बिणीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. अशाप्रकारचा बदल जीएमआरटी आणि रेल्वे अशा दोन्ही प्रकल्पांसाठी पोषक ठरेल.
डॉ.जे.जे.सोळंकी
शास्त्रज्ञ : जीएमआरटी, पुणे

