विलगीकरणात अडकली संगमनेर बसस्थानकाची स्वच्छता! पालिकेची ‘घंटागाडी’च येईना; प्रवाशांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘स्वच्छ भारत अभियानात’ डझनभर बक्षिसे पटकावणार्या संगमनेर शहरात कचर्याच्या विलगीकरणाची सक्ती सुरु झाल्याने अस्वच्छता निर्माण होवू लागली आहे. स्वच्छतेच्या क्षेत्रात डोंगरा एवढ्या कामाचा अनुभव घेवून संगमनेरात आलेल्या मुख्याधिकार्यांनी विलगीकरणाशिवाय कचरा स्वीकारण्यास मज्जाव केला आहे. त्याचा परिणाम संगमनेर शहरातील गल्ली-बोळामध्ये पुन्हा कचर्याचे साम्राज्य निर्माण होवू लागले असून या नियमाचा फटका सार्वजनिक ठिकाणांनाही बसला आहे. त्यातही दररोज हजारों प्रवाशांचा राबता असलेल्या संगमनेर बसस्थानकाची अवस्था तर अतिशय बिकट असून दररोज हजारो लोकांकडून प्रशस्त आवारात कोठेही होणार्या घाणीचे विलगीकरण कसे करावे असा प्रश्न व्यवस्थापकांना पडला आहे. मात्र सफाई कर्मचारी विलगीकरण असल्याशिवाय कचराच घेणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याने संगमनेर बसस्थानकात येणार्या प्रवाशांच्या आरोग्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या गंभीर समस्येतून तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकार्यांनी लवचिक भूमिका स्वीकारण्याची गरज आहे.

दीडशे वर्षांहून अधिक मोठा इतिहास असलेल्या संगमनेर नगरपरिषदेने गेल्या दशकभरात स्वच्छतेच्या क्षेत्रात भरीव काम केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी सुरु केलेल्या देशव्यापी स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत पालिकेने आजवर कोट्यवधी रुपयांची बक्षिसेही पटकावली आहेत. गेल्याकाही वर्षात झपाट्याने वाढणार्या शहरी लोकवस्तीतून दररोज जमा होणार्या शेकडों मेट्रिकटन घनकचर्याचे संकलन करुन त्यावर संगमनेर खुर्दनजीकच्या कंपोस्ट डेपोत प्रक्रिया केली जाते. गेल्या दशकापर्यंत हा डेपोही स्थानिकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरला होता. मात्र पालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन या परिसरातील दुर्गंधी शून्य टक्क्यापर्यंत खाली आणली. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी घरोघरी जावून ओला आणि सुका अशा दोन भागात कचर्याचे विलगीकरण करण्याबाबत जागृती केली. तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर, राहुल वाघ यांनीही शहर स्वच्छतेच्या विषयात मोलाची भूमिका बजावली. संगमनेर कचरा डेपोचे रुपडे पालटून संगमनेर खुर्दच्या रहिवाशांना दिलासा देण्यात मुख्याधिकारी बांगर यांचा सिंहाचा वाटा होता.

गेल्यावर्षी मुख्याधिकारी राहुल वाघ यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या रामदास कोकरे यांनीही पूर्वीच्या कर्तव्यावर उल्लेखणीय काम केल्याचा आलेख आहे. शताब्दीतील सर्वोत्कृष्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरवही झाला आहे. शहराला ‘कचरा मुक्त’ करण्याचे लक्ष्य ठेवून त्यांनी पदभार घेताच त्याची अंमलबजावणीही सुरु केली. गेली अनेक वर्ष ओला आणि सुका अशा वर्गीकरणाची सवय लागलेल्या संगमनेरकरांना अचानक पाच-सहा प्रकारांमध्ये विलगीकरणाच्या सक्तीने नाराजी निर्माण होवू लागली. घंटागाड्यांवरील कर्मचार्यांना वर्गीकरणाच्या सक्तीचे फर्मान असल्याने त्यांच्याकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना नागरिकांशी खटके उडाल्याचीही उदाहरणे आहेत. अनेकांनी उगाच कटकट नको म्हणून जुन्या सवयींना उजाळा देत रात्रीच्या अथवा पहाटेच्या अंधारात पुन्हा गल्ल्या आणि चौकांचे कोपरे कचराकुंडीत परावर्तीत करण्यास सुरुवात केली.

पालिकेने अचानक राबवलेल्या या प्रकाराने गेली अनेक वर्ष स्वच्छतेचा जाप करण्याच्या प्रकारालाच नख लागल्याने त्याला मोठा विरोध झाला. त्यातून पालिकेच्या आरोग्य विभागाने काहीशी नरमाईची भूमिका घेतलेली असताना आता याच विलगीकरणाच्या कारणावरुन जिल्ह्यातील सर्वात प्रशस्त आणि देखण्या ठरलेल्या संगमनेर बसस्थानकाच्या स्वच्छेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या कक्षेतील जागेत स्वच्छतेसाठी चार कर्मचारी सेवेत असून त्यांच्याकडून बसस्थानकाच्या संपूर्ण आवारात नियमितपणे स्वच्छता केली जाते. त्यातून साठणारा कचरा अतिशय विस्तीर्ण असलेल्या जागेत त्या-त्या ठिकाणी एका बाजूला गोळा करुन ठेवला जातो. गेल्याकाही महिन्यांपर्यंत पालिकेची घंटागाडी (ट्रॅक्टर) नियमितपणे सकाळी बसस्थानकात जावून दररोज गोळा होणारा कचरा त्या-त्या ठिकाणी जावून उचलून घेत होती. मात्र अलिकडे त्यावरुन दररोज शाब्दीक तुंबळ घडू लागल्या असून बसस्थानकातील कचरा व्यवस्थापकांसाठी डोकेदुखी ठरला आहे.

नाशिक-पुणे आणि मुंबई या त्रिकोणीय रचनेतील सर्वाधीक वर्दळीचे बसस्थानक म्हणून संगमनेरचा लौकीक आहे. संगमनेर बसस्थानकातून दररोज स्वतःच्या 60 बसेससह राज्यातील अन्य स्थानकातून येणार्या जवळपास चारशे आणि त्यात कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसेसमधून सरासरी रोज 25 हजार आणि महिन्याकाठी तब्बल 7 लाख 93 हजार 50 प्रवाशी प्रवास करतात. सद्यस्थितीत बसस्थानकात फेरीविक्रेत्यांना मनाई आहे. मात्र बाहेरील बाजूस अगदी चिकन रोलपासून पाववड्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या खाद्यान्नाची दुकानं असल्याने लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणारे प्रवाशी ‘पार्सल’ नेवून त्यातील टाकवू कचरा, फळांची सालपटं, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि अन्य बरंच काही बसमधून हात काढून फलटांवर अथवा आसपासच्या भागात टाकून देतात. 24 तास बसेसची वर्दळ असलेल्या या स्थानकात अहोरात्र अशीच प्रक्रिया सुरु असते.

त्यातून ओला आणि सुका अशा वर्गीकरणाशिवाय सगळ्याच प्रकारचा घनकचरा एकत्रित होतो. त्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात दररोज गोळा होणार्या या कचर्याचे वर्गीकरण करण्याची सक्ती अशक्यच. मात्र संगमनेर बसस्थानकात अलिकडच्या काळात हा प्रकार घडू लागला आहे. नव्याने आलेल्या मुख्याधिकार्यांनी घंटागाडीवरील कर्मचार्यांना वर्गीकरणाशिवाय कचरा स्वीकारण्यास मज्जाव केल्याने आजवर सुरळीत असलेल्या बसस्थानक आणि पालिका सफाई कर्मचार्यांच्या व्यवस्थेत बाधा आली आहे. त्याचा परिणाम बसस्थानकाची दररोज स्वच्छता होवूनही जमा झालेल्या कचर्याची विल्हेवाट कशी लावावी असा प्रश्न निर्माण होत असल्याने आगार व्यवस्थापकांची डोकेदुखी वाढली आहे. मुख्याधिकार्यांनीच या प्रश्नी पुढाकार घेवून किमान सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी जमा होणार्या कचर्याचे विलगीकरण करण्याची सक्ती शिथील करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा रोजच्या या एकत्रित कचर्यातून दुर्गंधी निर्माण होवून दररोज या स्थानकाचा वापर करणार्या हजारों प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

संगमनेर नगरपरिषदेला ज्याप्रमाणे मोठा इतिहास आहे, त्याप्रमाणे संगमनेर बसस्थाकनालाही आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये या बसस्थानकाचे संपूर्ण नूतनीकरण झाल्याने संगमनेरच्या वैभवात मोठी भर पडली आहे. संगमनेर बसस्थानक उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणार्या मार्गातील महत्वाचे शहर असल्याने प्राचीनकाळापासून दळणवळणाच्या केंद्रस्थानी राहीले आहे. त्यामुळेच संगमनेर बसस्थानकातून दररोज चारशेहून अधिक बसेसमधून सरासरी 25 हजार प्रवाशांची ये-जा सुरु असते. त्यामुळे हे ठिकाण संगमनेरच्या दृष्टीने प्रतिष्ठेचेे असून दोन व्यवस्थांच्या परस्पर असमन्वयातून त्याला नख लागता कामा नये. यासाठी मुख्याधिकार्यांनी पुढाकार घेवून हा प्रश्न मार्गी लावावा अशी स्थानिक प्रवाशांना अपेक्षा आहे.

