आता पराभूत उमेदवारानेच उपटले राज ठाकरेंचे कान! माजीमंत्र्यांच्या पराभवावरील वक्तव्य; ‘जनतेचा कौल’ मान्य करण्याचा सल्ला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकसभा निवडणुकीत राज्यात पीछेहाट झालेल्या महायुतीने त्यानंतर अवघ्या पाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवले. त्यातून राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असतानाच विरोधकांकडून ‘ईव्हीएम’ आणि शेवटच्या तासात झालेल्या मतदानावर बोटं ठेवले जात असून हा जनतेचा कौल नसल्याचे आरोप होत आहेत. या वादात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही उडी घेतल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी त्यांना ‘मुंबईतून बाहेर पडा आणि एकदा संगमनेरला या’ असे सांगत संगमनेर मतदारसंघात येण्याचे आमंत्रणही दिले. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलेले असतानाच आता याच निवडणुकीत खताळ यांच्याविरोधात उमेदवारी करणार्या मनसेच्या पराभूत उमेदवारानेही ‘राजसाहेब, जनतेचा कौल मान्य करा’ अशा शब्दात त्यांचे कान उपटले आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यात घवघवीत यश मिळवणार्या विरोधकांना त्यानंतर अवघ्या पाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या यशाची आशा होती. मात्र प्रत्यक्षात निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात विरोधकांची अक्षरशः धूळधाण उडाली. त्यावेळी विरोधकांना राज्यात सत्ता परिर्वतनासह महाविकास आघाडीला किमान 170 पेक्षा अधिक जागा मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र त्या निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव होण्यासह राज्यातील अनेक दिग्गजांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. या अनपेक्षित निकालाने सैरभैर झालेल्या महाविकास आघाडीने राज्यात दुसर्या व तिसर्या क्रमांकाची मतं घेणार्या आपापल्या उमेदवारांच्या मतदारसंघात ‘ईव्हीएम’ पडताळणीचे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर काही दिवसांतच ज्येष्ठनेते शरद पवार यांनी या निर्णयापासून अंतर साधले. तर, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनीही आपले पडताळणीचे अर्ज माघारी घेतले.
त्यातून विधानसभा निवडणूक निकालाचा मुद्दा ‘थंडावल्या’चे चित्र दिसत असतानाच शनिवारी (ता.1) मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुन्हा एकदा निकालांकडे दृष्टीक्षेप केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा दाखला देताना सलग आठवेळा 70 ते 80 हजार मताधिक्क्य घेवून विजयी होणार्या थोरातांचा 10 हजार मतांनी पराभव होण्यामागे ‘शंका’ उपस्थित केली. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे ‘ईव्हीएम’बाबत संशय घेताना पार पडलेली विधानसभा निवडणूक आणि त्याचे निकाल लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगत सणसणाटीही निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभा निवडणूक निकाल अध्यायाला पुन्हा हवा मिळत असतानाच बाळासाहेब थोरात यांचा पराभव करुन विजयी झालेल्या आमदार अमोल खताळ यांनी ट्विटरवर त्याबाबतची प्रतिक्रिया देताना ‘राजसाहेब, संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते. मतांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनी खर्याअर्थी परिवर्तन घडवून दाखवले. कोणाच्यातरी सांगण्यावरुन पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा थोरातांच्या पराभवाची खरी कारणं समजुन घेण्यासाठी तुम्ही एकदा मुंबईच्या बाहेर या, संगमनेर पहा. मी तुम्हाला संगमनेरला आमंत्रित करतोय..’ असे म्हणत त्यांना जोरदार टोला हाणला. या दरम्यान माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही राज ठाकरेंच्या वक्तव्याचे स्वागत करताना अशीच शंका सगळ्याच पराभूत उमेदवारांसह कार्यकर्ते आणि जनतेलाही असल्याची पृष्टी त्यांनी जोडली.
निवडणूक संपल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांचा काळ उलटत असताना ठाकरेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीचा दारुण पराभव आणि त्यावेळच्या ईव्हीएम बाबतच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाल्याने संगमनेरसह राज्यातील राजकारण तापत असतानाच यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अधिकृत उमेदवारी करणार्या योगेश सूर्यवंशी या पराभूत उमेदवाराने सोशल माध्यमात केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. सूर्यवंशी यांनीही ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा धागा पकडून ‘राजसाहेब, संगमनेरच्या काँग्रेसला जनतेने घरी बसवले आहे आणि महायुतीला निवडून दिले आहे. तुम्ही संगमनेरात दिलेल्या मनसेच्या उमेदवाराची बाजू मांडली पाहिजे होती. परंतु, आपण काँग्रेसची बाजू मांडत आहात याचे दुःख वाटले. हा जनतेचा कौल आहे हे मान्य करायला हवे. कारण इथे हिंदुत्त्वाची गरज होती, जय श्रीराम’ असे म्हणत त्यांनी आपल्याच पक्षप्रमुखांचे कान उपटले आहेत.
निवडणुकीला इतका मोठा कालावधी लोटल्यानंतर अचानक पुन्हा जिवंत झालेल्या निवडणूक निकालांनी संगमनेरच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांचे धुमारे फूटत असतानाच चक्क मनसेच्या पराभूत उमेदवारानेच आपल्या पक्षप्रमुखाचे वक्तव्य खोडून त्यांनाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केल्याने संगमनेरात राजकीय चर्चांनाही उधाण आले असून चौकाचौकात या विषयावरुन चर्चेचे फड रंगात येवू लागले आहेत.
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालांबाबत थेट भाष्य करताना राज्यातील अनेक ठिकाणच्या निकालांबाबत संशय व्यक्त केला होता. त्यासाठी दाखला देताना त्यांनी संगमनेर मतदार संघात सलग आठवेळा 70 ते 80 हजार मताधिक्क्याने निवडून येणार्या बाळासाहेब थोरात यांचा 10 हजार मतांनी पराभव होणं शक्य आहे का? असा सवाल उपस्थित मनसैनिकांना केला होता. त्यांच्या या विधानावरुनच सध्या राज्याचे राजकारण तापले असून विरोधकांच्या आरोपांना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.