कोपरगाव पालिकेला स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये देशात अठरावे मानांकन

कोपरगाव पालिकेला स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये देशात अठरावे मानांकन
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
देशपातळीवर सर्व शहरांसाठी स्वच्छतेच्या विविध पैलूंनुसार सन 2019-20 मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कोपरगाव नगरपरिषदेने सहभाग घेतला होता. सेवा स्तर प्रगती, दस्तावेज प्रमाणीकरण, नागरिकांचे अभिप्राय व केंद्रीय पथकाद्वारे पाहणी या बाबींचा समावेश असलेल्या एकूण 6 हजार गुणांच्या या स्पर्धेच्या निकालाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतीच केली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा या पश्चिम विभागातील पाच राज्यांतील पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या एकूण 139 तर राज्यातील एकूण 48 नगरपरिषदांपैकी कोपरगाव नगरपरिषदेस एकूण 3873.03 इतक्या गुणांसह देशात 18 वे, राज्यात 17 वे तर नाशिक विभागात 16 वे मानांकन प्राप्त झाले आहे.


सन 2019-2020 यावर्षी कोपरगाव नगरपरिषदेने शहरात घनकचर्‍याचे व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम राबविला. शहरातील निर्माण होणार्‍या ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खतनिर्मिती केली तर सुका कचरा विलगीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. शहरामध्ये असलेली सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक मुतार्‍या स्वच्छ ठेवल्या होत्या. तसेच या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन तक्रारींचा निपटारा करण्यात देखील नगरपरिषदेने आघाडी घेतली होती. इतर कामात देखील कायम सातत्य ठेवल्याने कोपरगाव नगरपरिषदेचे नाव देशाच्या पटलावर प्रमुख स्थानी आले आहे. या मानांकनासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Visits: 84 Today: 1 Total: 1103717

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *