अकोलेत मंत्री सत्तारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला मारले जोडे कोल्हार-घोटी रस्त्यावर आंदोलन करुन वक्तव्याचा केला निषेध
नायक वृत्तसेवा, अकोले
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. याच्या निषेधाचे राज्यभर पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी प्रतीकात्मक पुतळा दहन, जोडे मारो, निषेध सभा होत आहेत. अकोले शहरातही आज आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मंत्री सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करुन वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ रास्ता रोको आंदोलन करुन प्रतीकात्मक पुतळ्याला महिला पदाधिकार्यांनी जोडे मारले. तत्पूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा जाळण्यापासून रोखले. यावेळी पन्नास खोके एकदम ओके, अब्दुल सत्तार मुर्दाबाद, अब्दुल सत्तारचं करायचं काय, खाली डोकं वरच पाय यांसह विविध निषेधाच्या जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर निषेध सभा होवून आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मंत्री सत्तारांचा चांगलाच समाचार घेतला. संबंधित पक्षाने तत्काळ त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा अब्दुल सत्तारांना महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही असे म्हणाले.
तसेच महिला पदाधिकार्यांनी देखील वक्तव्याचा तीव्र निषेध केला. केवळ खासदार सुळे नव्हे तर समस्त महिलांचा सत्तारांनी अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा धिक्कार असो, अशी टीका केली. या आंदोलनात आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, वसंत मनकर, स्वाती शेणकर, नीता आवारी, भाग्यश्री आवारी, जयश्री देशमुख आदिंसह राष्ट्रवादीच्या सर्वच विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.