म्हैसगावच्या लोकनियुक्त सरपंचाविरुद्धाचा अविश्वास ठराव मंजूर
म्हैसगावच्या लोकनियुक्त सरपंचाविरुद्धाचा अविश्वास ठराव मंजूर
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्यावरील अविश्वास ठराव सहा विरुद्ध दोन मतांनी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (ता.23) म्हैसगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी सभा घेण्यात आली. म्हैसगाव येथे तीन वर्षांपूर्वी नऊ सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित जनसेवा मंडळातर्फे जनतेतून सरपंच व दोन सदस्य विजयी झाले. विरोधी भाजपाप्रणित विकास मंडळातर्फे सात सदस्य विजयी झाले. यापैकी विकास मंडळाच्या दोन सदस्यांचे सदस्यपद जात पडताळणी दाखला दिला नाही व शासकीय जमिनीत अतिक्रमण केल्याच्या कारणाने रद्द झाले. त्यामुळे विकास मंडळाचे पाच सदस्य राहिले. दोन सदस्य पदाच्या जागा रिक्त आहेत.
सोमवारी (ता.21) विकास मंडळाचे पाच व जनसेवा मंडळाचा एक अशा सहा सदस्यांनी सरपंच गागरे ग्रामपंचायत कारभारात विश्वासात घेत नाहीत. या कारणामुळे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी मतदान घेण्यात आले. उपसरपंच सागर दुधाट, सदस्य रूपाली दुधाट, सरुबाई निकम, सुभाष मुसळे, शांताबाई जाधव, सुनंदा गोडे, अश्विनी चोपडे व सरपंच महेश गागरे, ग्रामविकास अधिकारी थोरात, मंडलाधिकारी दत्ता गोसावी उपस्थित होते.
मला जनतेने मतदान करून निवडून दिले. मी सदस्यांच्या मतदानावर सरपंच झालो नाही. त्यामुळे सदस्यांनी माझ्यावर आणलेला अविश्वास ठराव जनतेच्या मतांचा अपमान आहे. त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
– महेश गागरे (मावळते सरपंच, म्हैसगाव)