नूतन अधिकार्‍यांना वाळू तस्करांचे खुले आव्हान! वाळूतस्करी थांबता थांबेना; दिवसाढवळ्या राजरोस उपसा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या कित्येक वर्षांपासून संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रातून सुरु असलेला वाळू उपसा राज्यात आदर्श वाळू धोरण जाहीर होवूनही थांबत नसल्याचे दुर्दैवी चित्र आजही दिसत आहे. गेल्या महिन्यात काही पर्यावरणप्रेमींनी गंगामाई परिसरात आंदोलन पुकारल्यानंतर घाटांच्या परिसरातून होणारा वाळू उपसा थांबला आहे. मात्र आता त्याच तस्करांनी आवर्तन सुरु असतांनाही संगमनेर खुर्द लगतच्या प्रवरा पात्राचा ताबा घेतला असून या परिसरातून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाचा तस्करांवरील धाक संपल्यात जमा असून दिवसाढवळ्या वाळू चोरी करुन तस्करांनी नव्याने रुजू झालेल्या महसूल अधिकार्‍यांनाच खुले आव्हान दिल्याचे चित्र सध्या या परिसरात दिसत आहे.

मागील काही वर्षात संगमनेरात वाळू चोरांच्या टोळ्या तयार झाल्या असून त्यांच्याकडून प्रवरा, म्हाळुंगी, मुळा, आढळा आणि कस अशा पाचही नद्यांच्या पात्रातून अविरतपणे उपसा करण्यात येतो. बिनभांडवली असलेल्या या उद्योगात अलिकडच्या काळात पांढरपेशा तस्करांचाही प्रवेश झाल्याने त्यातून तालुक्याच्या गुन्हेगारी घटनांमध्येही सातत्याने वाढ होत असल्याचेही समोर आले आहे. मात्र संगमनेरातील वाळू उपसा बंद करण्यात कोणत्याही अधिकार्‍याला यश आल्याचे आजवर दिसून आलेले नाही. त्यामागे महसूलमधील काही अधिकारी व कर्मचार्‍यांचे आर्थिक हितसंबंधही कारणीभूत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.

राज्याच्या महसूल मंत्री पदावर विराजमान असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या 1 मे पासून राज्यात नवीन आदर्श वाळू धोरण जाहीर करुन सामान्यांना अवघ्या सहाशे रुपयांत एक ब्रास वाळू देण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी वाळू डेपो निर्माण करुन वितरण व्यवस्था उभारण्याचीही घोषणा केली होती. मात्र या सर्व घडामोडींना बराचकाळ लोटूनही शासकीय धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने आजही अव्वाच्या सव्वा किंमतीत नागरीकांना वाळू विकत घ्यावी लागत आहे. त्याचा परिणाम वाळू धोरण जाहीर होवूनही संगमनेरातील वाळू तस्करी तस्सूभरही कमी झाली नसल्याचे चित्र दिसत आहे.

वाळू चोरीतून बक्कळ पैसा मिळत असल्याने या धंद्यात आता अनेक टोळ्या निर्माण झाल्या असून त्यांच्यात एकप्रकारे पात्राचे वाटप झाल्याचेही दिसत आहे. त्यातून तस्करांच्या एका टोळीकडून गेल्या काही वर्षात संगमनेर शहरालगतच्या वडगणपती पासून ते पुणे-नाशिक महामार्गाच्या कासारवाडी शिवारातील पूलापर्यंतच्या परिसरात अहोरात्र वाळू चोरी सुरु होती. त्यातून अनेक प्राचीन घाटांचे अस्तित्वच धोक्यात आल्याने गेल्या महिन्यात संतप्त झालेल्या काही पर्यावरणप्रेमींनी गंगामाई परिसरात आंदोलन करीत घाटांच्या परिसरातून राजरोसपणे वाळू उपसणार्‍या तस्करांना पिटाळून लावले होते.

या आंदोलनाचा परिपाक म्हणून पालिकेने गंगामाई घाटाकडून नदीकडे येणार्‍या रस्त्यावर प्रवेशद्वार उभारल्याने या परिसरातील वाळूतस्करी तूर्ततः बंद झाली आहे. मात्र घाटांच्या परिसरातून होणारी तस्करी थांबली असली तरीही तस्करांनी दोनशे मीटर लांब जात आता संगमनेर खुर्दच्या परिसराचा ताबा घेतला असून नदीपात्रात आवर्तनाचे पाणी वाहत असतानाही दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरु आहे. त्यामुळे संगमनेरात नव्याने रुजू झालेल्या प्रांताधिकारी शैलेश हिंगे व तहसीलदार धीरज मांजरे यांना वाळूतस्करांनी खुले आव्हानच दिल्याचे चित्र सध्या पुणे नाक्यावरील जुन्या पुलाच्या परिसरात दिसून येत आहे.

Visits: 7 Today: 3 Total: 30174

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *