‘अखेर’ रेंगाळलेल्या महामार्गाच्या कामाला गवसला मुहूर्त! पुढील पंधरवड्यात ‘जंगी मोहीम’; पन्नासहून अधिक अतिक्रमणधारकांना नोटीसा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पारंपरिक मतपेढी ते संवेदनशील परिसर अशा वेगवेगळ्या कारणांनी मंजुरी मिळूनही गेल्या दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या ‘पुणे-नाशिक’ या शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या तिसर्या टप्प्यातील नूतनीकरणाला ‘अखेर’ मुहूर्त गवसला आहे. याबाबत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी महामार्ग प्रशासनासह स्थानिक अधिकार्यांशी समन्वय साधुन पुढील पंधरवड्यात प्रलंबित असलेल्या ‘अतिक्रमण हटाओ’ मोहीमेला हिरवा कंदील दिला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या नूतनीकरणात अडथळा निर्माण करणार्या सुमारे 50 पक्क्या अतिक्रमणधारकांना नोटीसाही बजावल्या आहेत. त्या शिवाय पालिकेच्यावतीने पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून या मोहीमेदरम्यान शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी आवश्यक बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सततच्या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या वाहनचालकांना नववर्षात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कधीकाळी मृत्यूघंटा म्हणून ओळखल्या गेलेल्या ‘पुणे-नाशिक’ राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाला 2011 साली मंजुरी मिळाल्यानंतर पुढच्याच वर्षी भूसंपादनासह त्याच्या कामाला सुरुवात झाली. कर्हे, चंदनापुरी, माहुली अशा अपघातप्रवण घाटांना टाळून बहुतांशी हा महामार्ग नव्याने बांधला गेला. त्यातही पूर्वी संगमनेर शहरातून जाणार्या या महामार्गावर शहरातील वाहनांचीही भर पडत असल्याने गर्दीच्यावेळी अपघातही घडतं. त्यातून आजवर अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. त्यामुळे नव्याने आकारात येणारा महामार्ग शहराबाहेरुन जावा अशीही रचना केली गेली. पाचवर्ष चाललेल्या कामानंतर 70 टक्के पूर्णत्त्वाच्या अटीवर 1 जानेवारी 2017 रोजी नव्याने तयार झालेला ‘खेड ते सिन्नर’ हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.

शहरातून जाणार्या जुन्या महामार्गावरील वाहतुकीवर मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यातच पर्यायी रस्ता निर्माण झाल्याने जुन्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमणं थाटण्यासह पक्की बांधकामं करुन जागोजागी आपले मालकी हक्क प्रस्थापित केले. त्याचा परिणाम नूतनीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या नवीन महामार्गाचा ‘मृत्यूघंटा’ ही ओळख पुसण्याचा प्रयत्न फसला आणि शहराच्या वाहतुकीची अवस्था होती तशीच कायम राहीली. या दरम्यान माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकाळात अमृतवाहिनी ते रायतेवाडी फाटा या शहरातून जाणार्या जुन्या महामार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयासह राज्य सरकारकडून मंजुरी मिळवताना अमृतवाहिनी ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्याचे कामही त्यांनी पूर्ण केले.

या महामार्गाच्या दुसर्या टप्प्यात बसस्थानक ते रायतेवाडी फाटा या रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गवंडीपूरा मशिद, तीनबत्ती चौकातील मशिदीसह नवघरगल्ली ते पुणेनाका पर्यंतच्या परिसरातील अतिक्रमणं हटवल्यास त्याचा आपल्या मतपेढीवर विपरित परिणाम होईल अशी भीती स्थानिक नेत्यांच्या मनात निर्माण झाल्याने दीर्घकाळ दुसर्या टप्प्याचे काम खोळंबले. त्याला पर्याय म्हणून ऐन निवडणुकांच्या पूर्वी रायतेवाडी फाटा ते प्रवरा पूल (पिंपरणे फाटा) या रस्त्याचे कामही आटोपण्यात आले. मात्र ज्या भागातून वाहने हाकताना वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण होते, वारंवार वाहतुकीची कोंडी, भांडणं आणि अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागते अशा मार्गाचे काम मात्र दीर्घकाळ रेंगाळत ठेवले गेल्याने संगमनेरकरांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. त्यातूनच ‘संवेदनशील’ हा विषय जन्माला घातला गेला आणि एकप्रकारे हा रस्ता नूतनीकरणापासून प्रलंबित ठेवला गेला.

मात्र या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय शहरातंर्गत वाहतुकीची समस्या सुटण्याची कोणतीही शक्यता नसल्याने अखेर संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ-पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, पालिका व पोलीस या सर्वांशी समन्वय साधून निधी उपलब्ध असतानाही दीर्घकाळ नूतनीकरणाचे काम रेंगाळत ठेवल्याबाबत आगपाखड करीत लवकरात लवकर काम सुरु करण्याच्या सूचना केल्या. त्याला शासकीय विभागांनीही तत्काळ प्रतिसाद दिला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने बसस्थानक ते पुणेनाका परिसरापर्यंत महामार्गावरील सरकारी जागेत पक्की अतिक्रमणं करुन घरं, दुकानं थाटणार्या जवळपास 50 अतिक्रमणं धारकांना नोटीसा बजावून आपापली अतिक्रमणं काढून घेण्यास सांगितले आहे.

त्याशिवाय पालिका प्रशासनानेही या भागातील कच्च्या अतिक्रमणांसह टपर्या, पथार्या, दुकानं हटवताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी स्थानिक पोलिसांसोबत पत्रव्यवहार केला असून ‘अतिक्रमण मोहीमे’साठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. दैनिक नायकला मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे पुढील पंधरवड्यात 15 ते 17 जानेवारी दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरील बसस्थानक ते पुणेनाका या तिसर्या टप्प्यातील रस्त्यावर येणारी सर्वप्रकारची अतिक्रमणं हटवली जाणार आहेत. त्यामुळे गेल्या दीर्घकाळापासून पारंपरिक मतपेढी ते संवेदनशील परिसराचा बाऊ करुन रेंगाळत ठेवलेल्या शहरातंर्गत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरण कामाला मुहूर्त लागण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या तीन वर्षांपूर्वी शहरातून जाणार्या पुणे-नाशिक महामार्गावरील अमृतवाहिनी ते रायतेवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यातून अमृतवाहिनी ते शासकीय विश्रामगृह आणि रायतेवाडी फाटा ते प्रवरा पूलापर्यंतच्या रस्त्याचे कामही पूर्ण झाले. मात्र शहराच्या वाहतुकीची मूळ समस्या असलेल्या बसस्थानक ते पुणेनाका या रस्त्याच्या कामाबाबत मात्र वेळोवेळी राजकीय अनास्थाच दिसून आल्याने हा रस्ता नूतनीकरणाशिवायच राहील अशीही स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता अनिश्चिततेचे मळभ दूर गेले असून येत्या 15 जानेवारीपासून या मार्गावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे संगमनेरकरांना प्रतिक्षा असलेल्या या मार्गाचे कामही सध्या दृष्टीपथात दिसू लागले आहे.

