पुणे जिल्ह्यातील लग्नाळू तरुणांना महाठगाने लावला चूना राहुरी पोलिसांत फसवणूक झालेल्या नातेवाईकांनी मांडले ठाण
नायक वृत्तसेवा, राहुरी
सध्या लग्नाळू मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने लग्नासाठी भावी वधू शोधणार्या लग्नाळू मुलांना हळद लागण्याऐवजी राहुरी तालुक्यातील एका ठगाने पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील तब्बल सहा कुटुंबातील मुलांना चक्क 60 हजारांचा चूना लावला आहे. अखेर फसवणूक झालेल्या लग्नाळू कुटुंबातील नातेवाईकांनी त्या ठगाचा शोध घेऊन थेट राहुरी पोलीस ठाण्याच्या बोहल्यावरच उभे केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील जवळपास सहा लग्नाळू मुलांना आमच्याकडे गरीब शिक्षीत मुलींची सेवाभावी संस्था आहे. या मुलींना आपल्यासारख्या चांगल्या घरातील मुलांशी लग्न करून संसार थाटण्याची इच्छा आहे. त्यासाठी या महाभागाने प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार या लग्नाळू मुलांनी प्रत्येकी दहा हजार रुपये ऑनलाईन खात्यावर टाकले. तसेच या लग्नाळू मुलांच्या पालकांनी लग्नानतंर या संस्थेला पन्नास हजार रुपयांची देणगी देण्याचेही कबूल केले होते.
त्या अनुषंगाने या ठगाने पुन्हा दहा हजार रुपयांची मागणी करून लग्नाची तयारी करून अहमदनगरला येण्याचे सांगितले. लग्नाळू मुलांनी भावी वधूचे स्वप्न रंगवत ते सहा पीडित कुटुंब अहमदनगरला आल्यानंतर या ठगाने त्यांना काही मुलींच्या वडिलांचे संपर्क क्रमांक दिले. त्यांनी संपर्क करून नवरी मुलीबद्दल विचारणा केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुळशीकरांनी या ठगाला शोधून राहुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलिसांत रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. तर ते पीडित कुटुंब पोलीस ठाण्यातच ठाण मांडून बसलेले होते.