सिन्नरच्या तरुणांकडून संगमनेरातील तरुणीचे अपहरण व अत्याचार? मुख्य संशयितासह चौघांनाही अटक; सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रस्त्याने पायी चालत जात असतांना पाठीमागून आलेल्या स्वीफ्ट कारमधील चौघांनी आपले अपहरण केले, त्यानंतर गुंगीचे औषध पाजून सिन्नरमधील एका लॉजवर मारहाण व अत्याचार केले. नाशिकला नेवून दमदाटी करीत विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर बळजोरीने सह्या घेतल्या, पुन्हा सिन्नरमध्ये आणून शारीरिक अत्याचार करीत पोटावर सिगारेटचे चटके दिले. संगमनेर पोलीस ठाण्यात ‘बेपत्ता’ असल्याची नोंद झाल्याने ‘त्या’ संशयीतांनी पुन्हा दमदाटी करीत सिन्नर पोलिसांसमोर हजर केले व ‘आपण मर्जीने पळून आल्याचा’ जवाब नोंदविण्यास भाग पाडले अशा आशयाच्या तक्रारीवरुन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सिन्नर येथील चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या सर्वांना अटकही करण्यात आली आहे. न्यायालयाने 10 डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत पाठविले आहे. या वृत्ताने संगमनेरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांनाही उधाण आले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना गेल्या 30 नोव्हेंबररोजी सकाळी नऊच्या सुमारास संगमनेर महाविद्यालयाजवळ घडली. शहरातील उपनगरात राहणारी एक एकोणावीस वर्षीय तरुणी महाविद्यालयाजवळून जात असताना पाठीमागून आलेल्या पांढर्‍या रंगाच्या स्वीफ्ट कारमधील चौघांनी बळजबरीने त्या तरुणीचे अपहरण करुन तिला सिन्नर (जि.नाशिक) येथे नेले. तेथील सदानंद लॉजवर नेवून मुख्य संशयित प्रवीण अरुण लगड याने तिला मारहाण करीत पीडितेच्या पोटावर सिगारेटचे चटके दिले, बळजबरीने तिला गुंगीचे औषध पाजून त्यानंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व यासर्व कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरणही केले.

दुसर्‍या दिवशी (1 डिसेंबर) त्या चौघांनीही पीडित तरुणीस पंचवटी (नाशिक) येथे नेले. तेथे गेल्यावर त्या तरुणीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपी प्रवीण लगड याच्याशी तिचे बळजबरीने लग्न लावून विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर तिच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर हे सर्वजण पुन्हा सिन्नर येथे आले. संशयित आरोपी प्रवीण लगड याने तिला पुन्हा सिन्नरमधील ‘साई सावली’ लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार करीत त्याचे चित्रीकरण केले. 2 डिसेंबर रोजी पीडितेला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत सिन्नर पोलिसांसमोर हजर होवून ‘आपण आपल्या मर्जीने घरातून निघून आलो आहोत’ असा जवाब नोंदविण्याचा दबाव टाकण्यात आला व तसा जवाबही नोंदविण्यात आला. या प्रक्रियेनंतर सिन्नर पोलिसांनी संगमनेर पोलिसांशी संपर्क साधून संगमनेरातून ‘बेपत्ता’ असलेली तरुणी सिन्नर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे कळविले. तिच्या नातेवाईकांनी तेथे जावून मुलीला ताब्यात घेतले व 2 डिसेंबर रोजी घर गाठले.

गेल्या रविवारी (ता.5) पीडित तरुणी आपल्या कुटुंबियांसह शहर पोलीस ठाण्यात हजर झाली व तिने वरीप्रमाणे घटनाक्रम कथन केला. तिच्या म्हणण्यानुसार वरील चारही संशयितांविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम 376(2)(एन), 420, 366, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करीत मुख्य संशयित प्रवीण अरुण लगड याच्यासह त्याचे जोडीदार संकेत भगवान राणे, दर्शन शिवाजी हिरे व राहुल कैलास वाघमारे (सर्व रा.सिन्नर, जि.नाशिक) यांना ताब्यात घेत संगमनेरात आणले. यावेळी आरोपी लगड याने पंचवटीत झालेल्या विवाहाची छायाचित्रे, नोंदणी प्रमाणपत्र अधिकार्‍यांना दाखवले. मात्र संबंधित तरुणीने हा सर्व प्रकार बळजबरीने घडल्याची तक्रार नोंदविल्याने गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत पोलिसांनी त्या चौघांनाही गजाआड करीत सोमवारी न्यायालयासमोर उभे केले. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्या सर्वांना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरच्या प्रकरणाची चर्चा शहरात वेगाने पसरली असून शहरात खळबळ उडण्यासह उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दाखल तक्रारीनुसार सदरची घटना 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सतत वर्दळ असणार्‍या संगमनेर महाविद्यालयाच्या परिसरात घडूनही त्याबाबत कोठेही वाच्चता झाली नाही. विशेष म्हणजे सदरची तरुणी बेपत्ता झाल्याबाबत तिच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ झाल्याची तक्रार दाखल केली (अपहरण केल्याची नाही.). संबंधित तरुणीला संगमनेरातून सिन्नरमध्ये नेण्यात आले. दोन दिवसांत तेथील गजबजलेल्या भागातील दोन वेगवेगळ्या लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. नाशिक शहराचे हृदय असलेल्या आणि भाविकांच्या गर्दीने नेहमी फुललेल्या पंचवटीसारख्या ठिकाणी नेवून त्या तरुणीसोबत आरोपी प्रवीण लगड याने गांधर्व पद्धतीने विवाह केला, त्याची नोंदणीही झाली. त्यावर प्रवीण लगड सोबत असलेल्या त्याच्या तिघा साथीदारांनी साक्षीदार म्हणून सह्या देखील केल्या आणि विवाह झाल्याचे प्रमाणपत्रही मिळविले.

या सर्व गोष्टी घडल्यानंतर कथित अपहरण घडल्याच्या तिसर्‍या दिवशी मुख्य संशयित आरोपी असलेल्या प्रवीण लगड याने पुन्हा पीडितेला दमदाटी केली, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत चक्क सिन्नर पालिसांसमोर आणून उभे केले व समोर पोलीस असतानाही पीडितेने ‘त्या’ चौघांना घाबरुन त्यांनी सांगितल्याप्रमाणेच जवाब नोंदवला. सिन्नर पोलिसांनी कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतरही तीन दिवसांनी 5 डिसेंबर रोजी पीडित तरुणी संगमनेर पोलीस ठाण्यात आली व तिने वरीलप्रमाणे घटनाक्रम सांगत सिन्नर येथे राहणार्‍या चार तरुणांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडे देण्यात आला असून या घटनाक्रमातील संगमनेर महाविद्यालय, सिन्नरमधील ‘त्या’ दोन्ही लॉज व पंचवटी अशा विविध ठिकाणी प्रत्यक्ष जावून तेथील साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे या तक्रारीतील सत्य समोर आणण्याचे दिव्य त्यांना पेलावे लागणार आहे.

पायी चाललेल्या एखाद्या व्यक्तिचे बळजबरीने अपहरण आणि ते देखील वर्दळीच्या भागातून होण्याची आणि तरीही ते कोणालाही न समजण्याची दुर्मिळ घटना संगमनेरातून समोर आली आहे. या प्रकरणात सिन्नरमधील दोन लॉजचाही उल्लेख आला असून त्या दोन्ही लॉज अत्यंत गजबजलेल्या आणि लोकांची नेहमी वर्दळ असलेल्या भागात आहेत. या प्रकरणात अत्याचाराचा आरोप केवळ एकावर असून उर्वरीत तिघांनी केवळ आपल्या साथीदाराला साहाय्य केल्याचे स्पष्ट आहे. तक्रारीनुसार पंचवटीत विवाहही झाला आणि त्याची नोंदणीही झाली आहे आणि सिन्नर पोलिसांसमोर ‘मर्जीने घर सोडल्याचा’ जवाबही नोंदविला गेला आहे. इतक्या सगळ्या घडामोडी बळजबरीने घडूनही वरील कोणत्याही भागातील नागरिकांच्या त्या लक्षात आल्या नाहीत, त्यावरुन संबंधित तरुणांनी पीडितेवर खरोखरी इतकी दहशत निर्माण केली होती की, हा सगळा प्रकारच संगनमताने झाला होता याचा शोध घेण्याचे आव्हान तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांना पेलावे लागणार आहे.

Visits: 138 Today: 1 Total: 1116521

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *