प्रेयसीचे अनेकांशी संबंध ठरले मुलाच्या हत्येचे कारण? विद्यार्थ्याच्या खुनाचा प्रकार; हत्येमागील ‘गुढ’ उकलण्याचे आव्हान..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या तरुणाचे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेसोबत सुत जुळले आणि त्यातून तिने पोटच्या मुलासह पतीचा त्याग करुन संगमनेर गाठले. वर्षभर प्रेमात आकांत बुडाल्यानंतर महिलेची भूक वाढली आणि त्यातून तिने इतरांशीही संबंध निर्माण केले. वर्षभरापूर्वी पहाटेच्यावेळी आरोपी जेव्हा तिच्या घरी पोहोचला, त्यावेळी तिचा भलत्याशीच सुरु असलेला प्रणय पाहुन तो खवळला आणि त्याने थेट तिच्यावरच कोयत्याने वार केला. मात्र त्यानंतरही तिच्या वागण्यात कोणताही बदल न झाल्याने चवताळलेल्या प्रियकराने तिला अद्दल घडवण्यासाठी थेट आंबेगावात जावून तिच्या मुलाचे अपहरण केले. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावे अशा या भयंकर घटनेत मात्र निष्पाप असलेल्या अवघ्या बारा वर्षीय विद्यार्थ्याचा हकनाक जीव गेला. या प्रकरणी पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाचा गुन्हा आता खुनात परावर्तीत होणार असून आरोपीने मात्र तत्पूर्वीच आत्महत्या करुन कायद्याच्या जगातून पळ काढला आहे.


गेल्या पंधरवड्यापूर्वी (11 डिसेंबर) आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन विक्रम चव्हाण (वय 12) या इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याचे तेथील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयाच्या प्रवेशद्वारातून दुपारी साडेबाराच्या सुमारास अपहरण झाले. या प्रकरणी अपहृत मुलाचे वडिल विक्रम चव्हाण यांनी त्याच दिवशी सायंकाळी पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शाळेतून विद्यार्थ्याचे अपहरण होणं म्हणजे अतिशय गंभीर प्रकार असल्याने पारगावचे सहाय्यक निरीक्षक नेताजी गंधारे यांनी तत्काळ प्रकरणाचा तपास हाती घेत उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्यासह तपासाला सुरुवात केली असता अपहृत विद्यार्थी संशयीतासह चालत जात असल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले.


त्यामुळे संशय बळावलेल्या पोलिसांनी फिर्यादी विक्रम चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता संशयीत आरोपीचे त्यांच्या घरी येणंजाणं असल्याने त्याच्याशी मुलाची ओळख असल्याची बाब समोर आली. मात्र पालकांच्या संमतीशिवाय त्याला परस्पर शाळेतून घेवून जाण्याचा प्रकार गंभीर असल्याने पोलिसांनीही गोपनीय माहिती व तांत्रिक विश्‍लेषणावरुन संगमनेरात येवून आरोपी राजेंद्र रोहिदास जंबुकर (वय 27, रा.ढोलेवाडी, ता.संगमनेर) याच्या राहत्या घरासह त्याच्या असण्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे घातले. या दरम्यान पारगाव पोलिसांनी त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमीही तपासली असता अपहृत मुलाची आई आणि आरोपी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे व त्यातून दोघेही गेल्या काही वर्षांपासून संगमनेरातच वास्तव्यास असल्याचे समोर आले.


वर्षभरापूर्वी पहाटेच्या सुमारास आरोपी राजेंद्र जंबुकर दारुच्या नशेत तर्राट होवून अपहृत मुलाची आई आणि त्याची प्रेयसी असलेल्या ‘त्या’ महिलेच्या कासारवाडी रस्त्यावरील घरी पोहोचला. यावेळी त्याने आपल्या प्रेयसीला खोलीचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले असता ती भलत्याच तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे त्याने पाहीले. त्यामुळे त्याचा पारा चढला आणि त्याने आपल्या जवळील कोयत्याने तिच्यावर वार करीत तिची दोन बोटं छाटली. हा प्रकार चाळीसारख्या असलेल्या भागात घडल्याने त्याची मोठी चर्चा झाली. त्यातून आरोपी राजेंद्र जंबुकर विरोधात शहर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल होवून त्याला अटकही झाली. कारागृहातील त्याच्या मुक्कामात त्याच्या मनात प्रेयसीविषयीचा राग अनावर होत गेला आणि तेव्हाच त्याने काहीतरी मोठं करुन तिला अद्दल घडवण्याचा चंग बांधला असावा असा संशय आहे.


त्या प्रकरणात जामीनावर सुटल्यापासूनच दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे अशीही चर्चा असून तिच्या मुलाचे निरगुडसर (ता.आंबेगाव, जि.पुणे) येथून अपहरण होण्याच्या दोन दिवसांआधी सोमवारी (9 डिसेंबर) त्यांच्यात कडाक्याचा वाद झाला. त्याचा राग मनात धरुन त्याने बुधवारी (ता.11) प्रेयसीच्या मूळगावी जावून शाळा सुटण्याच्या वेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास आईने बोलावल्याचे कारण सांगून त्याला सोबत घेतले आणि थेट संगमनेर गाठले. या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होवून गेल्या पंधरवड्यापासून अपहृत विद्यार्थ्याचा शोध सुरु असतानाच मंगळवारी (ता.24) सकाळी दहाच्या सुमारास आरोपी राजेंद्र रोहिदास जंबुकर (वय 27) याने ढोलेवाडीतील आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.


तत्पूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत प्रेयसीने विश्‍वासघात केल्याचा वारंवार उल्लेख असलेला मजकूर लिहून ठेवला. मात्र त्याच्या आत्महत्येनंतरही अपहृत मुलाबाबत कोणतीही माहिती समोर न आल्याने त्याने ‘त्या’ मुलाचे काहीतरी बरेवाईट केले असावे असा संशय निर्माण झाला. त्यामुळे आत्महत्येचा प्रकार समोर आल्यापासून पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे शहर पोलिसांच्या मदतीने ढोलेवाडीसह आसपासच्या निर्जन परिसरात अपहृताचा शोध घेवू लागले. या दरम्यान मंगळवारी (ता.24) सायंकाळी आठच्या सुमारास राजापूर रस्त्यावरील गुंजाळवाडी शिवारात जयंतराव हारोजी गुंजाळ-पाटील यांच्या काटवनाने भरलेल्या माळरानातील एका कोरड्या विहिरीत अल्पवयीन मुलाचा कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह दिसून आला.


यावेळी पोलिसांनी आसपासच्या परिसरात पाहणी केली असता जवळजवळ निर्मनुष्य असलेल्या या भागात कोणीही फिरकत नसल्याचे व काटवनात अनेकदा बिबट्यांसह अन्य श्‍वापदांचे दर्शनही घडत असल्याची माहिती समोर आली. त्या शिवाय विहिरीच्या जवळच अपहृत असलेल्या आर्यन विक्रम चव्हाण याचे निरगुडसरच्या पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयाचे ओळखपत्रही आढळले. पोलिसांनी रात्रीच सदरचा मृतदेह बाहेर काढून पाहीला असता दहा ते बारा दिवसांपूर्वी म्हणजेच अपहरण घडल्याच्या अथवा त्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी ‘त्या’ विद्यार्थ्याचा खून झाल्याचा संशय आहे.


मात्र अपहरणाच्या घटनेनंतर पारगाव (कारखाना) पोलिसांनी वारंवार संगमनेरात छापे घातल्याने खुनाच्या आरोपातून आपली सुटका अशक्य असल्याची जाणीव होवून आरोपी राजेंद्र जंबुकरने गळफास घेवून आपले जीवन संपवले व सोबत सोडलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीतून या संपूर्ण प्रकाराला त्याची प्रेयसी आणि मयत विद्यार्थ्याची जन्मदात्रीच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यासही तो विसरला नाही. त्यामुळे या प्रकरणात ‘त्या’ महिलेचीही चौकशी होणं क्रमप्राप्त असून तिच्या मुलाला संगमनेरला बोलावण्यामागे तिचा काही संबंध आहे का? याचाही पोलिसांकडून शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र दोघांच्या अनैतिक संबंधात कोणताही दोष नसलेल्या निष्पाप आणि निरागस विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेल्याने संगमनेरसह आंबेगाव तालुक्यातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.


सदर प्रकरणात पारगांव (कारखाना) पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरु असतानाच मंगळवारी अपहृत मुलाचा मृतदेह आढळून आल्याने संगमनेर पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करुन पुढील तपास पारगाव पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. सदरील विद्यार्थ्याचा खून दहा ते बारा दिवसांपूर्वीच झाल्याचा संशय असून श्‍वापदांनी लचके तोडल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. या घटनाक्रमात संशयीत असलेल्या आरोपीने तत्पूर्वीच आत्महत्या केली असून त्याने लिहिलेल्या चिठ्ठीनुसार पारगावसह संगमनेर पोलिसही अधिकचा तपास करीत आहेत. या घटनेतील आरोपी राजेंद्र जंबुकर याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
रवींद्र देशमुख
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

Visits: 5 Today: 5 Total: 162592

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *