श्रीरामपूरमध्ये दीड लाख रुपयांचा गुटखा पकडला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अवैध धंदेचालकांत उडाली खळबळ
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहारतील सूतगिरणी फाट्यावर पोलिसांनी छापा टाकून दीड लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य दोेघे पसार झाले आहेत. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईने अवैध धंदेचालकांत खळबळ उडाली आहे.
सूतगिरणी फाटा येथे दुर्गानगर परिसरात मोईज पठाण व मुनीर पठाण हे त्यांच्या घरात गुटख्याची चोरून विक्री व साठवण करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर सीताराम गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, रोहित येमूल, सागर ससाणे, लक्ष्म खोकले व वाहन चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत जाऊन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे राजेश बडे यांना कळविले.
त्यानंतर पथकातील पोलिसांनी सूतगिरणी फाटा येथे जाऊन छापा टाकला असता तेथे एक व्यक्ती त्याच्या घरामध्ये हिरा कंपनीचा पानमसाला गुटखा आणि रॉयल 717 नाव असलेली तंबाखू गोण्यांमध्ये मिळून आली. त्याने मोईज मुनीर पठाण असे नाव सांगितले. झडती घेऊन हा गुटखा व तंबाखू कोण विक्री करतो याबाबत विचारपूस केली असता, हा पानमसाला गुटखा हा आपले वडील मुनीर अब्बास पठाण हे अशोकनगर येथील शाहरुख माजिदखान पठाण याच्याकडून घेतात व हे दोघे गुटखा साठवण करून विक्री करतात, असे त्याने सांगितले.
याठिकाणी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा हिरा पान मसाला गुटखा व 30 हजार रुपये किंमतीचे तंबाखूचे पुडे असा 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले व पुढील कारवाई कामी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना कळविले. याप्रकरणी शहर पोलिसांत मोईज मुनीर पठाण (वय 22), त्याचे वडील मुनीर अब्बास पठाण व शाहरुख माजिदखान पठाण यांच्याविरुध्द भा. दं. वि. कलम 328, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे हे करीत आहेत.