संगमनेरात ‘बनावट’ रेमडेसिवीर लशीची विक्री करणारी टोळी सक्रीय! संबंधित रुग्णालयाची चुप्पी; तर अन्न व औषध प्रशासनाची भूमिका पुन्हा संशयात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील कोविड रुग्णवाढीच्या संख्येसह त्यांना लुटणार्‍या पांढर्‍या वेशातील लुटारुंची संख्याही दररोज वाढत आहे. या कडीत अगदी डॉक्टरांपासून ते रुग्णवाहिकेच्या चालकापर्यंत सर्वांचाच ‘वाटा’ ठरलेला असल्याने कोविडच्या भयाने रुग्णालयाची पायरी चढणारा रुग्ण आणि त्याचे नातेवाईक अक्षरशः कंगाल होवूनच ‘बरे’ होत असल्याचे भयानक चित्र तालुक्यातील काही ‘डिसीएचसी’ मध्ये पहायला मिळत असतांना आता गंभीर रुग्णांच्या जीवाशी खेळून पैसे कमावण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. यातून तालुक्यात ‘बनावट’ रेमडेसिवीर लस विकणार्‍यांची टोळी सक्रीय असल्याचेही स्पष्ट झाले असले तरीही जिल्ह्यातील ‘अन्न व औषध प्रशासना’च्या डोळ्यावरील झापडं उघडलेली नाहीत. विशेष म्हणजे सदरचा धक्कादायक प्रकार संगमनेरातील ओम गगनगिरी या डॉ.सतिश वर्पे यांच्या रुग्णालयात समोर आला, मात्र या घटनेला चार दिवस उलटूनही संबंधित रुग्णालयाने याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्याही विषयी संशय निर्माण झाला आहे.


सध्या कोविडच्या संक्रमणामुळे संपूर्ण तालुका कोविडमय झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिकांना कोविडची लागण होत असल्याने व त्यातील निम्म्याहून अधिक जणांना थेट ऑक्सिजनची गरज पडत असल्याने तालुक्यातील 48 डेडिकेटेड कोविड रुग्णालये तुडूंब झाली आहेत. त्यातच फुफुसातील संसर्गाची मात्रा अधिक असलेल्या रुग्णांना ‘रेमडेसिवीर’ची लस दिली की ते लगेच बरे होतील असा नागरिकांचा भाबडा समज झाल्याने गेल्या दिड-दोन महिन्यांपासून रेमडेसिवीर लशीचा तुटवडा होवून मोठ्या प्रमाणात त्याचा काळाबाजार सुरु झाला आहे. आपले आई, वडिल, भाऊ, बहिण, पती, पत्नी, मुलगा, मुलगी अथवा अन्य जवळचे कोणीतरी कोविडने जायबंदी होवून ऑक्सिजनवर असल्याच्या विचारानेच घाम फोडणार्‍या या स्थितीचा मात्र काही रुग्णालये (डिसीएचसी) आणि नफेखोरी करणारे असामाजिक तत्त्व चांगलाच फायदा घेत असल्याचे विदारक चित्रही समोर आले आहे.


गेल्या रविवारी (ता.9) संगमनेरातून असाच धक्कादायक प्रकार शहरातील ओम गगनगिरी या डॉ.सतिश वर्पे यांच्या रुग्णालयातून समोर आला आहे. या रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला रेमडेसिवीर द्यावे लागेल या विचाराने संबंधिताच्या पत्नीने ते कोठे मिळेल याबाबत विचारणा केली असता त्यांना एक मोबाईल क्रमांक मिळाला. सदरचा क्रमांक रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचार्‍याकडून रुग्णाच्या पत्नीला मिळाल्याची माहिती दैनिक नायकला समजली. त्याची खातरजमा करतांना संबंधित रुग्णालयाचे संचालक डॉ.वर्पे यांच्याकडेच चौकशी केली असता त्यांनी असा प्रकारच घडला नसल्याचे सांगत चक्क कानावरच हात ठेवले. मात्र त्यानंतर काही वेळाने शहरातील एका प्रतिष्ठीत नागरिकाने दैनिक नायकच्या क्रमांकावर फोन करुन डॉक्टरांना सदरचा प्रकार माहिती नसल्याचा खुलासा केला.


मात्र मिळालेली माहिती अत्यंत विश्‍वासार्ह असल्याचे व सदरचा प्रकार ओम गगनगिरी रुग्णालयातच घडल्याचे त्यांना सांगीतल्यानंतर त्यांनी असा प्रकार घडल्याचे मान्य केले. मात्र सदरचा प्रकार रुग्णालयाच्या परिचारिकेनेच उघड केल्याचे व त्यानंतर सदरचे बनावट रेमडेसिवीर पुरविणार्‍याला बोलावून संबंधित रुग्णाचे संपूर्ण पैसे परत केल्याचेही सांगण्यात आले. म्हणजे बनावटखोरी सुरु असूनही, रेमडेसिवीरचा काळाबाजार समोर येवूनही तो उघड करण्याऐवजी रुग्णालय व्यवस्थापनाने संबंधित बनावट औषधांच्या पुरवठादाराला परत बोलावलं आणि पैसे परत घेवून या अतिशय गंभीर प्रकरणावरच पडदा टाकण्याचे काम केले. विशेष म्हणजे मनात चोर असतांनाही बनावट विक्रेता आला आणि रुग्णालयाच्या सांगण्यावरुन त्याने संबंधित रुग्णाकडून घेतलेले सगळे पैसेही परत केले हा घटनाक्रम मात्र संशय निर्माण करणारा आहे. या प्रकरणात सध्यातरी रुग्णालयाचा हात असल्याचे आमचे म्हणणे नाही, पण तसे असेल तर रुग्णालयाने हा भयानक प्रकार प्रशासनाच्या लक्षात का आणून दिला नाही हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहीला आहे.


संबंधित महिलेचा पती रुग्णालयात श्‍वासांची लढाई लढत असतांना त्याच्या पत्नीच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार घडला. त्या महिलेला रुग्णालयातच काळ्या बाजाराचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर फोन करताच काही वेळातच केवळ नावच ऐकू येणारं रेमडेसिवीरचं इंजेक्शनही समोर आलं, त्याबदल्यात तब्बल 30 हजारांची रक्कमही मोजण्यात आली. प्रत्यक्षात जेव्हा ती लस देण्याची प्रक्रीया सुरु झाली तेव्हाच लस बनावट असल्याची बाब रुग्णालयातीलच आरोग्यसेवकांनी समोर आणली. तेव्हा मोठा गदारोळ झाला आणि पुरवठादाराला पुन्हा बोलावण्यात आले. संबंधित रुग्णाला मिळालेली रेमडेसिवीरची लस बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर त्याचा पुरवठा करणारा ‘बनावटखोर’ रुग्णालयात आला आणि त्याने पैसेही परत केले, मग त्याचवेळी रुग्णालयानेच त्याच्या मुसक्या का आवळल्या नाहीत असाही सवाल आता निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी या रुग्णालयाच्या औषधालयाने जिल्हा यंत्रणेने पाठविलेल्या रेमडेसिवीरचे वितरण केले नाही म्हणून त्यांना प्रशासनाने नोटीसही धाडली होती हे विशेष.


तालुक्यासह जिल्ह्यात आजही रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा आहे. या लशीचा काळाबाजार होण्यासह रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावनांचा आधार घेवून काहीजण बनावट लशींचीही विक्री करीत आहे. संगमनेरातील ओम गगनगिरी रुग्णालयात चार दिवसांपूर्वीच हा प्रकार घडला आहे. मात्र हे सर्व थांबविण्याची जबाबदारी असलेल्या जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाला आणि त्यांच्या सहाय्यक आयुक्तांना या गोष्टीची साधी भणकही लागलेली नाही त्यामुळे या विभागाच्या जिल्ह्यातील अस्तित्त्वावरच प्रश्‍नचिन्ह उभे राहीले असून जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा मानवजातीला वाचवण्यासाठी जीवाचे रान करीत असतांना या विभागाची सुस्ती संशय निर्माण करणारी आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेवून बनावट रेमडेसिवीरची तालुक्यातील टोळी उध्वस्त करण्याची गरज आहे.

कोविडवरील औषधांचा आणि रेमडेसिवीर लशीचा काळाबाजार सुरु असूनही जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाची झोप अजूनही उडायचे नाव घेईना. आतातर या काळ्या बाजाराला बनावटगिरीचीही किनार लाभल्याने जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या जीवाशीच खेळ सुरु झाला आहे. आतातरी तो रोखण्याची थेट जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने झोपेतून जागे होवून रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे, अन्यथा असे वाढते प्रकार नागरी उद्रेकाचे कारणही ठरु शकतात.

Visits: 27 Today: 1 Total: 115637

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *