संगमनेरात महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूका अशक्य? एकहाती सत्तेत भागीदारीचे गणित भविष्यात डोकेदुखी ठरण्याची शक्यता..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कच्च्या प्रभागरचनेची मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप सुरु होण्यासह पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत मुदत संपणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूकीची लगबग सुरु झाली आहे. एकीकडे प्रशासकीय पातळीवरुन निवडणूकांची तयारी सुरु असतांना दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातील ‘महाविकास आघाडी’चे सूत्र संगमनेरातही लागू होईल अशी आशा वर्तविली जात आहे. मात्र त्याचवेळी गेल्या तीन दशकांपासून संगमनेर नगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसकडून त्यासाठी स्वीकृती मिळेल का? याबाबत साशंकताही कायम आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र भविष्यात कितीकाळ टिकेल याबाबत मतभिन्नता असल्याने प्रस्थापितांकडून हक्काच्या मतांमध्ये ‘वाटा’ मिळण्याची शक्यता खुप कमी असल्याचेही राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे संगमनेरात महाविकास आघाडीच्या बॅनरखाली सहकारी पक्षांना सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता धुसर असल्याचेही बोलले जात आहे.


डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मुदत संपणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनांचा कच्चा आराखडा 30 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते, त्याची मुदत मंगळवारी (ता.30) संपली. त्यानंतर आयोगाने आता निवडणूका होणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांना येत्या 5 डिसेंबररोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेे आहेत. या बैठकीत कच्च्या प्रभागरचनांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून त्यानंतर नवीन प्रभागनिहाय मतदार याद्या, हरकती आणि अंतिम मतदार याद्या या क्रमाने निवडणूकीची पुढील प्रक्रीया राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरुन हालचाली सुरु झाल्या असून लोकसंख्येनिहाय प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.


एकीकडे निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु असतांना दुसरीकडे संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी अस्तित्त्वात येणार का? याचीच अधिक चर्चा आहे. संगमनेर नगर पालिकेवर गेल्या तीन दशकांपासून राज्याचे विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यातही कधीकाळी पालिकेच्या सभागृहात निम्मी-अर्धी असलेली विरोधकांची सदस्य संख्या कमीकमी होत आजच्या स्थितीत अवघ्या दोन सदस्यांवर आली आहे. त्यामुळे पालिका सभागृहात विरोधकांचा आवाज येईल इतकेही संख्याबळ नाही. असे असतांना काँग्रेसचे नेतृत्त्व गेल्या वेळच्या निवडणुकीत विरोधात उभ्या ठाकलेल्या पक्षांना आपल्या हक्काच्या मतातील वाटा देणार का? अशी शंकाही निर्माण झाली आहे.


सन 2016 साली झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला एकूण झालेल्या मतदानातील तब्बल 47 टक्के मते मिळाली होती व या पक्षाचे 28 सदस्य संख्येपैकी तब्बल 26 सदस्य एकट्या काँग्रेसच्या पारड्यात आहेत. शिवसेना व भाजपा यांचा प्रत्येकी एकच सदस्य सभागृहात असून दोन्ही सदस्य महिला असल्याने सभागृहात त्यांचा आवाज फारसा कानी पडलेला नाही. गेल्या निवडणुकीचा विचार करता काँग्रेसनंतर भाजपाने सर्वाधीक (17.27 टक्के) मते मिळविली होती. मागील निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या. त्यात शिवसेनेला 11.17 टक्के तर राष्ट्रवादीला अवघे 7.43 टक्के मते मिळाली होती. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत काँग्रेससोबत बंडखोरी करणार्‍यांनाही तब्बल 15 टक्के मते प्राप्त झाली होती हे विशेष.


संगमनेर नगरपालिकेच्या सदस्य संख्येत या निवडणुकीच्या माध्यमातून दोघांची भर पडली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत असणार्‍या प्रभागांच्या संख्येतही एकने भर पडून ती आता पंधरा झाली आहे. मागील निवडणुकांचा अभ्यास करतांना एकूण पाच प्रभागांमधील दहा सदस्य संख्या मुस्लिम बहुल विभागातून निवडून येते, तर दोन प्रभागातील चार जागा संमिश्र असून मुस्लिम मतांशिवाय या प्रभागातून विजयप्राप्त करणे अशक्य आहे. यात प्रभाग क्र.11 व 13 चा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिम मतांचे गणितही मोठे असल्याने व बहुतेक मुस्लिम बहुल प्रभागात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने हे सर्व प्रभाग काँग्रेसचे बालेकिल्ले समजले जातात.


मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या निवडणूक चिन्हावर सर्वाधीक 20 उमेदवार रिंगणात उतरवले होते. या सर्वांना मिळून या पक्षाला एकूण 5 हजार 192 मते मिळाली. भारतीय जनता पार्टीने 18 उमेदवार उभे करतांना 12 हजार 73 मते प्राप्त केली, तर शिवसेनेने 13 उमेदवार देत 7 हजार 809 मते मिळविली. या निवडणुकीत काँग्रेसचा मुकाबला करतांना भाजप सर्वाधीक 10 जागांवर दुसर्‍या क्रमांकावरचा पक्ष ठरला, तर प्रभाग क्र.11 (ब) मधून पक्षाच्या मेघा भगत या एकमेव उमेदवाराला विजय मिळाला. दुसर्‍या क्रमांकावर शिवसेनेच्या प्रियंका भरीतकर (प्रभाग क्र.9 ब) व लखन घोरपडे (प्रभाग क्र.10 अ) मधून विजयी झाले. सेना एकूण पाच जागांवर दुसर्‍या स्थानावरील पक्ष ठरला. नंतरच्या काळात जातप्रमाणपत्रावरुन घोरपडे यांची निवड रद्द झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रसेने पटकाविली.


एकंदरीत मागील निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली मतांची टक्केवारी जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास असल्याने पालिकेवर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व अधोरेखीतच आहे. भारतीय जनता पार्टीशी कोणत्याही स्थितीत युती केली जाणार नसल्याचे शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केलेले असल्याने महाविकास आघाडीचे सूत्र न जुळल्यास संगमनेरातील निवडणुक बहुरंगी होवून काँग्रेसला गेल्यावेळे प्रमाणेच घवघवीत यश मिळण्याची शक्यता असल्याने आघाडीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी देव पाण्यात बुडविले असले तरीही त्याचा कितपत फायदा होईल याबाबत मात्र साशंकता कायम आहे.


गेल्या चार दशकांपासून संगमनेर विधानसभा मतदार संघातील सर्व संस्थांवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकहाती अंमल आहे. राज्य विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा जनाधारही चढत्याक्रमाचाच राहीला आहे. असे असतांना राज्यात प्रासंगिक कारणानेे झालेल्या आघाडीचे सूत्र ते आपले संपूर्ण प्राबल्य असलेल्या आणि राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या पालिकेत राबवतील याबाबत जाणकारांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे संगमनेरात महाविकास आघाडीच्या बँनरखाली काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता अत्यंत धुसर असल्याचे बोलले जात असल्याने यंदाच्या पालिका निवडणुकाही बहुरंगी होण्याचीच अधिक शक्यता आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 118177

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *